शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधक

माणिकराव पांडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले बॅटरी व सौर ऊर्जेवरील फवारणी व तण नियंत्रण यंत्र
माणिकराव पांडे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले बॅटरी व सौर ऊर्जेवरील फवारणी व तण नियंत्रण यंत्र

जळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘भविष्यदर्शी नायक’ या शीर्षकांतर्गत चार दिवसीय संमेलन घेण्यात आले. शालेय वयातच मुलांना कृषी संशोधनाची आवड लागावी, त्यातून उत्तमोत्तम संशोधक भविष्यात घडावेत असा त्यामागील हेतू होता. विद्यार्थ्यांकडूनही विविध यंत्रांच्या निर्मितीतून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद लाभला. शेती विषयातील जाण, शेतकऱ्यांची नेमकी गरज याविषयी विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास याचा प्रत्यय या वेळी आला. बालवयात विद्यार्थ्यांवर कृषी व संशोधनाचे संस्कार घडावेत, शेती क्षेत्राला उमदे संशोधक, तज्ज्ञ मिळावेत, या उद्देशाने जळगाव येथील जैन हिल्स येथे ‘भविष्यदर्शी नायक’ अर्थात ‘फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ हे संमेलन घेण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स आणि नॅन्सी बेरी फाउंडेशन यांच्यातर्फे या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. त्याचे यंदाचे हे चौथे वर्षे होते. यंदा २० ते २४ एप्रिल अशा चार दिवसांच्या काळात शेतीविषयक संशोधनाचा जागर या निमित्ताने झाला. महाराष्ट्र, गुजरात राज्यातील मिळून आठवी व नववीमधील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. निकषांनुसार ५२५ विद्यार्थ्यांना या संमेलनात सहभाग घेण्याची संधी मिळाली. यातील ‘इनोव्हेशन’ किंवा नवनिर्मिती स्पर्धा विशेष चर्चेत राहिली. मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता स्पर्धा दोन टप्प्यांत घ्यावी लागली. नवनिर्मितीकडे विद्यार्थ्यांचा अोढा ‘इनोव्हेशन’ प्रकारात एकूण ६५ विद्यालयांनी सहभाग नोंदवून नवनवी कृषी यंत्रे सादर केले. यात बहुउद्देशीय कृषी यंत्र, विजेशिवाय चालणारे संत्रा प्रतवारी उपकरण आदी लक्षवेधी ठरली. त्यातील काही निवडक तंत्रज्ञानावर टाकलेला दृष्टिक्षेप. १) संत्रा प्रतवारी यंत्र निर्माते - न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, वरूड (जि. यवतमाळ) प्रज्योत म्हस्के, निर्भय कठाणे व अभिषेक खाडे यांनी हे उपकरण तयार केले आहे. ते चालवण्यासाठी विजेची गरज नाही. यात पाच पाईप्स हाताच्या पंजासारखे तीन ट्रेवर ठेवले आहेत. वेगवेगळ्या आकाराची संत्री किंवा मोसंबी या ट्रेमध्ये पडतात. हे उपकरण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शेतात कुठेही हलविणे शक्‍य होते. प्रतवारी गतीने व्हावी, यासाठी पाईपची संख्या व आकार मोठा करता येऊ शकतो. प्लॅस्टिक पाईप ऐवजी गोलाकार लाकडी किंवा लोखंडी पाईप्सचाही वापर शक्य आहे. पाईप्स ठेवण्याची रचना उताराची असून, त्यावरून संत्रे खाली येतील अशी व्यवस्था केली आहे. संपर्क - ७७९८७३६३७० २) बी व खत पेरणी यंत्र निर्मिती - अभिमानजी काळमेघ हायस्कूल, मांगरूळी, (ता. वरूड, जि. अमरावती) अनिकेत गुल्हाने, रोहित शिरभाते व चंद्रशेखर अंबाकर यांचा या यंत्र निर्मितीत सहभाग आहे. बैलजोडी चलित हे यंत्र बी व खते पेरणीचे काम करते. कापूस, ज्वारी, बाजरी, मका आदी पिकात त्याचा वापर करता येतो. लोखंडी रॉड, प्लॅस्टिकचे कंटेनर किंवा नरसाळ्यासम आकार, नळ्यांचा उपयोग यात केला आहे. वरच्या भागाला कॉक असून तो गरजेनुसार कमी अधिक प्रमाणात हलवता येतो. त्यानुसार हव्या त्या प्रमाणात खत किंवा बियाणे त्यातून पडते. संपर्क - ९७३०२९३४८५ सौर ऊर्जेवरील फवारणी व तण नियंत्रण यंत्र निर्माते - माणिकराव पांडे माध्यमिक विद्यालय, काळेगाव (ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) तेजस मांडवणे व पवन बावणकर यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. फवारणी व तण नियंत्रणाचे काम हे यंत्र सौर ऊर्जा आणि बॅटरीवर करू शकते. त्याला चार चाके असून चांगला वाफसा असला तर ते गतीने काम करते. लहान अवस्थेतील कापूस, ज्वारी आदी पिकांमध्ये ते चालविता येते. एक माणूस ते चालवू शकतो. गवत कापण्यासाठी खालच्या भागाला आडवे कटर आहे. ते ‘अडजस्टीव्ह’ असून गवत मोठे असले तर ते कमी अधिक उंचीवर बसविता येते. फवारणी करताना त्याचा फवारा यंत्रचालकाकडे उडू नये, यासाठी समोरच प्लॅस्टिकची फील्म किंवा प्लेट बसवली आहे. दोन किंवा तीन नोझल्स फवारणीसाठी लावता येतात. द्रावणाची टाकी यंत्रावरच लाकडी प्लेटवर ठेवली आहे. यंत्र हलके असावे यासाठी प्लॅस्टिकची टाकी व अन्य साहित्य वापरले आहे. आर्थिक क्षमतेनुसार लोखंडी साहित्यही वापरता येईल. संपर्क : ९०२१४५५९९१   बहुउद्देशीय यंत्र निर्माते - श्रीमती अनसूयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय, वऱ्हेदारणा (ता. निफाड, जि. नाशिक) शुभम शरद नाठे व गौरव नरेंद्र रुमणे यांनी हे यंत्र तयार केले आहे. एकाच वेळी गवत कापणी, माती भुसभुशीत करणे व माती लावण्याचे काम ते करते. पेट्रोल इंधनावर आधारीत इंजिन चालते. एक व्यक्ती ते हाताळू शकतो. ते सुरू करण्यासाठी इंजिनाला मजबूत दोरी आहे. ऊस, मिरची, टोमॅटो, केळी आदी पिकांत त्याचा वापर होऊ शकतो. गिअर, लोखंडी पाईप, लॉक पीन, दाते, पास, कटर यांचा वापर त्यात केला आहे. या यंत्राच्या निर्मितीत मुख्य साहित्य लोखंडी असून प्लेट व पाईप्स नट- बोल्ट वापरून घट्ट बसविले आहेत. पाईप्सही ‘वेल्डिंग’ही करून घेतल्या आहेत. त्याचा वेग कमी अधिक करायला ‘ॲक्सिलेटर’ दिला आहे. पुढे कटर व मागे वखरणीला किंवा माती लावायला पास लावता येते. संपर्क - ७०५७९२६९६३ मल्चिंग पेपर बहुउद्देशीय शेती यंत्र निर्माते - मराठा विद्या प्रसारक संस्थेचे आरूढ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हाळसाकोरे (ता. निफाड, जि. नाशिक) प्रतीक कणसे, परमेश्‍वर दिवे व साहिल पठाण यांनी हे यंत्र तयार केले आहे. बॅटरी व सौर ऊर्जेवर ते काम करते. एक व्यक्ती ते चालवू शकते. हे यंत्र बहुद्देशीय म्हणजे फवारणी करणे, खते टाकणे, मल्चिंग पेपर अंथरण्याचेही काम करते. फवारणीसाठी पाणी साठविण्यासाठी प्लॅस्टिकची दणकट टाकी एका प्लेटवर बसविली आहे. खते टाकण्यासाठी यंत्राच्या समोरील भागात ‘मिक्‍सर’ आहे. फवारणी व खते टाकण्याच्या दृष्टीने दोन स्वतंत्र इंजिन्स आहेत. निश्चित केलेल्या क्षमतेनुसार खते टाकल्यानंतर ‘मिक्‍सर’ सुरू करून ती समोर मातीत पडू लागतात. मल्चिंग पेपर गुंडाळण्यासाठी खालील भागात गोलाकार पाईप आहे. भेंडी, गवार, टोमॅटो, वेलवर्गीय पिकांमध्ये हे यंत्र काम करू शकते. फवारणीसाठी दोन ते तीन नोझल्स लावता येतात. वेळ व पैशांची बचत या यंत्रामुळे चांगल्या प्रकारे करता येते. संपर्क : ७७९६४०६३५३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com