दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केट

प्लॅस्टिक बेडसमधूनही गांडूळखत तयार केले जाते. दर्जेदार गांडूळ खताला ग्राहकांची चांगली मागणी असते.
प्लॅस्टिक बेडसमधूनही गांडूळखत तयार केले जाते. दर्जेदार गांडूळ खताला ग्राहकांची चांगली मागणी असते.

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल) येथील सौ. रूपाली माळी या उच्च पदवीधर शेतकरी महिलेने शेतीसह गांडूळखत व निंबोळी, करंज पेंड असलेल्या खतनिर्मितीची जबाबदारी पेलली आहे. गेल्या बारा वर्षांपासून कौशल्य व ग्राहकांची मागणी ओळखत व्यवसायाला आकार देत त्यात स्थिरता मिळवली आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात कागल-इचलकरंजी मार्गावर कसबा सांगाव (ता. कागल) येथे माळी कुटुंबाची सुमारे अडीच एकर शेती आहे. या शेतीची जबाबदारी सौ. रूपाली विजय माळी या युवा महिला शेतकरी सांभाळतात. त्यांचे पती ग्रामविकास अधिकारी आहेत. सौ. माळी यांनी शेतीबरोबरच गांडूळखत निर्मिती, तसेच निंबोळी, करंज पेंड व जीवाणूंचा समावेश असलेल्या खताची निर्मिती करतात. सुमारे १२ वर्षांपासून त्यांचा या क्षेत्रातील अनुभव तयार झाला आहे. स्वतःच्या शेतीपासून सुरुवात माळी कुटुंब सुरुवातीला गांडूळखत तयार करायचे. पण त्याचा वापर स्वतःच्या शेतीसाठीच व्हायचा. थोडीफारच विक्री व्हायची. पण पुढे पुढे ग्राहकांची संख्या वाढू लागली. मग मोठ्या प्रमाणात खत तयार करण्यास सुरुवात झाली. सध्या आठ बेडसच्या माध्यमातून गांडूळखताची निर्मिती होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारे गांडूळ कल्चर आणून व्यवसाय सुरू केला होता. खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून आर्थिक अनुदान घेतले. सुमारे नऊ लाख रुपयांची तरतूद या व्यवसायासाठी केली. व्यवसायाचा विस्तार आज गांडूळखत निर्मितीसह निंबोळी पेंड, करंज पेंड, लेंडी खत, जीवाणू खत आदींच्या मिश्रणातून सेंद्रिय खतदेखील सौ. माळी तयार करीत आहेत. आज आपल्या खतांसाठी ग्राहकांची संख्या वाढविण्यातही त्या यशस्वी ठरल्या आहेत. आठ जनावरांच्या शेणखताआधारे सुरू झालेला हा व्यवसाय आता विस्तारला आहे. येत्या काळात देशी गायींचा वापर करण्यावर भर आहे. व्यवसायातील ठळक बाबी

  • खतांची विक्री प्रामुख्याने जूनच्या प्रारंभापासून.
  • त्यासाठी उन्हाळ्यात ‘स्टॉक’ करून ठेवला जातो.
  • दूरध्वनी व प्रत्यक्ष संपर्क यातून विक्रीचे नियोजन होते.
  • घरगुती व रोपवाटिका अशा दोन्ही प्रकारचे ग्राहक.
  • गांडूळखत वर्षाला सुमारे २० टनांपर्यंत तयार होते.
  • किलोला १२ रुपये दराने त्याची विक्री.
  • दर्जा चांगला असल्याने महाराष्ट्रासह गोवा, पुणे, कर्नाटकातील शेतकऱ्यांकडूनही खताला मागणी
  • सुमारे सहा महिलांना मिळाला रोजगार
  • घरासह शेतीकामातही कुशलता

  • महिला म्हटले की घरची, मुलांची जबाबदारी प्राधान्याने सांभाळावी लागते. घरातील सर्व कामे आटोपून शेती व खतनिर्मिती सांभाळणे ही दुहेरी कसरत सौ. रूपाली कुशलपणे हाताळतात.
  • सकाळी नऊनंतर व्यवसायातील कामे सुरू होतात. यात एक मजूर जोडपेही काम करते.
  • खत निर्मितीतील प्रत्येक टप्प्यातील कामात सौ. रूपाली यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.
  • जनावरांचे व्यवस्थापनाचे त्याच पाहतात.
  • खताचा दर्जा टिकविला सुरुवातीच्या काळात खत तयार करताना शेणाबाबतच्या अडचणी आल्या. बाहेरून शेण आणून खत तयार करावे लागायचे. तांत्रिक माहिती नसल्याने न कुजलेल्या शेणाचा फटका बसू लागला. गांडुळांची संख्याही म्हणावी तशी नव्हती. परंतु अर्धवट कुजलेले शेण उपयुक्त असल्याचे समजताच त्याचा वापर सुरू केला. याचबरोबर जास्त उंचीचे बेड कमी केले. जाळीच्या बेडला प्राधान्य दिले. प्रत्येक वर्षी नव्या समस्या आल्या. त्यातून शिकत हा व्यवसाय स्थिर केला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविले गांडूळखताव्यतिरिक्त वर्षाला अंदाजे ५०० ते ६०० लिटर व्हर्मीवॉश तयार केले जाते. त्याचबरोबर गांडूळ कल्चरदेखील प्रति किलो ४०० रुपये दराने विकले जाते. अतिरिक्त उत्पन्नाचा हा स्रोत तयार झाला आहे. सेंद्रिय मिश्रण खत वर्षाला सात ते आठ टन इतक्या प्रमाणात तयार होते. त्याची विक्री २० रुपये प्रति किलो दराने करण्यात येते. प्रत्येक उत्पादनाच्या दर्जाबाबत दक्षता घेतली जाते. यामुळे या उत्पादनांचा ग्राहक वर्ग तयार झाला आहे. रोपवाटिकाचालक, फळबागायतदार, भाजीपाला उत्पादक, द्राक्ष बागायतदारांकडून या उत्पादनांना मागणी असते. प्रयोगशाळेत परीक्षणाद्वारे तपासणी आपली उत्पादने शेतकऱ्यांना कशी उपयुक्त आहेत हे पटवून देण्याचे आव्हान होते. त्यामुळे आपल्या शेतीत त्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे ग्राहक शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन होण्यास मदत झाली. याशिवाय कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांशी संपर्क करून व्यवसायवृद्धी केली जाते. वेळोवेळी आपल्या खतांची गुणवत्ता व त्यातील घटकांचे परीक्षण प्रयोगशाळेद्वारे केले जाते. त्याद्वारे ग्राहकांना उत्पादनांविषयी खात्री देता येते. सेंद्रिय शेतीची वाट समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर असलेल्या सौ. रूपाली माळी यांनी सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतू आज पूर्ण वेळ शेती व्यवसायावर लक्ष केंद्रित करीत सेंद्रिय पद्धतीची वाट धरली आहे. मध्यंतरीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कणेरी मठ व तेथील सेंद्रिय शेतीच्या संपर्कात त्या आल्या. आज मठातील कृषी विज्ञान केंद्राच्या सल्लागार समितीमध्ये त्या एकमेव महिला शेतकरी आहेत. याशिवाय विविध ठिकाणी प्रशिक्षणातूनही सेंद्रिय शेती, गांडूळखत निर्मिती या विषयावर त्या मार्गदर्शन करतात. पुरस्काराने गौरव सौ. रूपाली यांना विविध प्रदर्शने, सेवा संस्थांकडून उद्योजिका म्हणून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पतीसह सासूबाई लक्ष्मीबाई यांचेही त्यांना सहकार्य मिळते. व्यवसाय सांभाळूनच सोनल व समर्थ या इंग्रजी माध्यम शाळेत शिकणाऱ्या मुलांचा अभ्यासही त्या तितक्याच काटेकोरपणे घेतात. दोन एकर शेतीतही सेंद्रिय शेतीचे प्रयोगही सुरू आहेत. सेंद्रिय उसापासून सेंद्रिय गुळाचे उत्पादनही घेण्याचे व विक्री करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सौ. रूपाली माळी- ८८८८२५५२२१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com