पाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत हिरवाईची समृद्धी

सरंपच, ग्रामसेवक, ग्रामस्थांची एकदिलाने ग्रामविकासात साथ मिळाली.
सरंपच, ग्रामसेवक, ग्रामस्थांची एकदिलाने ग्रामविकासात साथ मिळाली.

हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून विविध विधायक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ग्रामस्वच्छता, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ‘वाॅटर मीटर’द्वारे पाणी , बंधिस्त गटारींद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, गावातील वृक्ष लागवड, भूमिगत वीजपुरवठा आदी उपक्रमांचा समावेश आहे. स्वच्छ, सुंदर, हिरवाईने नटलेले पर्यावरण संतुलित समृद्ध गाव म्हणूनही कुरुंदवाडीची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडूनही गावातील उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामविकासातून शेतीचीही प्रगती होत अर्थकारणाला गती मिळाली आहे.   हिंगोली जिल्ह्यात वसमत या तालुका ठिकाणापासून सुमारे २२ किलोमीटवर कुरुंदवाडी गाव वसले आहे. कुरुंदवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत वालाईनगर वस्तीचा समावेश होतो. गावशिवारात कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा अशी हंगामनिहाय पिके घेतली जातात. काही वर्षांपूर्वी ऊस, केळी या नगदी पिकांची लागवड केली जायची. परंतु सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागल्याने तुलनेने कमी पाण्यात किफातशीर उत्पादन देऊ शकणाऱ्या हळदीच्या लागवडीकडे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळला आहे. सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. गावाला जवळची वसमत ही हळदीची प्रसिद्ध मोठी बाजारपेठ आहे. साहजिकच हळदीच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या रेशीम उद्योगातही काही शेतकऱ्यांनी पाऊल टाकले आहे. संत्रा, पपई, सीताफळ, भाजीपाल्याचे उत्पादनही काही घेत आहेत. ग्रामस्वच्छतेचा वसा कायम गावात लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या कामगिरीसाठी गावाला शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. ग्रामस्थांनी घेतलेला स्वच्छतेचा वसा आजतायागत कायम आहे. गाव आणि वस्त्यांमधील पक्क्या रस्त्यांसाठी ‘पेव्हर ब्लॅाक्स’चा वापर करण्यात आला आहे. यामुळे पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरते. शिवाय एखाद्या कामासाठी रस्ता उखडून होणारे नुकसानही टाळले जाते. पाण्याचा मोजून काटेकोर वापर....... कुरुंदवाडीपासून चार किलोमीटरवरील डोणवाडा येथील तलावाजवळ गावाच्या नळपाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर आहे. तेथून जलवाहिन्यांद्वारे नव्या वस्त्यांमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी आणले जाते. गावातील वस्त्यांमध्ये जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी घरासमोर नळ जोडणी दिली आहे. नळाला वाॅटर मीटर बसविण्यात आले आहेत. केवळ एक पैसा प्रति लिटर दराने दररोज नियमित पाणीपुरवठा केला जातो. नळाच्या पाण्याचा दाब सर्वत्र सारखा राहण्यासाठी उपयायोजना केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून पाण्याचा काटेकोर वापर केला जातो. पाणी मीटरमुळे नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा हिशेब लागतो. ग्रामस्थांकडून पाणीपट्टीचा नियमित भरणा केला जातो. त्यामुळे नळपाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत आहे. बंधिस्त गटारद्वारे सांडपाणी विल्हेवाट प्रत्येक घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदिस्त असल्याने गटारांमध्ये काडी, कचरा, धूळ व अन्य घटक तुंबून राहात नाहीत. दुर्गंधी येत नाही. गटाराचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे मच्छरांचा त्रास कमी झाला आहे. शोषखड्यातील अतिरिक्त पाणी सिमेंटच्या गटारांद्वारे गावाबाहेर काढून देण्यात आले आहे. भूमिगत वीज वितरण प्रणाली.... पूर्वी गावामध्ये वीजपुरवठ्यासाठी लोखंडी खांब होते. परंतु उघड्या तसेच लोंबकाळणाऱ्या तारांमुळे होणारे अपघात, वादळ वारे, उंच वाहने खालून गेल्यामुळे तारा तुटून वीजपुरवठा खंडित होत असे. आता ग्रामपंचायतीने रोहित्रापासून संपूर्ण गाव आणि वस्त्यांमधील विजेचे खांब काढून टाकले आहेत. प्रत्येक कुटुंबास भूमिगत वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सौरऊर्जेचा वापर..... आपारंपारिक ऊर्जा स्रोतांच्या वापरांतर्गत १७ सौर पथदिवे उभारण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात सौर अभ्यासिकेची सुविधा आहे. गावातील ७० कुटुंबांकडे सौरकंदिलाचा वापर सुरू आहे. सुमारे ४५ कुटुंबे निर्धुर चुलीचा वापर करतात. घनकचरा व्यवस्थापन.... गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर कचरा जमा करण्यासाठी कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा जमा करण्यासाठी ग्रामपंचायतीचे वाहनदेखील आहे. संपूर्ण कचरा गावानजिक बांधलेल्या हौदामध्ये जमा केला जाते. त्या ठिकाणी निर्मिती केलेल्या कंपोस्टखताचा वापर शेतकरी करीत आहेत. हिरवाईने नटलेले गाव... पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेअंतर्गत गावात एक व्यक्ती, दहा वृक्ष या प्रमाणात नियोजन केले आहे. गाव परिसरात चार हजार ५०७ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुर्तफा शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक घरासमोर वृक्ष असल्यामुळे गाव हिरवाईने नटले आहे. ग्रामविकासासाठी सर्वांची साथ... गावाच्या विकासासाठी तसेच विविध उपक्रमांसाठी सरपंच दत्तराव पत्रे, उपसरपंच लक्ष्मण लांडगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पांचाळ, विमलबाई किसनराव शेंडेराव, शिवकांता आदिनाथ पांचाळ, अर्चना दुर्गादास डुकरे, अन्नपूर्णा केशवराव देलमाडे यांना ग्रामस्थांची एकदिलाने साथ असते. ‘डिजिटल’ शाळा गावात जिल्हा परिषदेची सहाव्या इयत्तेपर्यंत शाळा आहे. ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील धडे शिकविले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीत सुधारणा झाली आहे असे मुख्याध्यापक ए. एस. सालमोटे यांनी सांगितले. शाळेच्या प्रांगणात अंगणवाडी आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतागृहाची सुविधा

  • गावात २४१ कुटुंबांपैकी २०३ कुटुंबांनी वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधली.
  • स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था
  • अनेक शेतकऱ्यांनी शेतातील वस्त्या, आखाडे या ठिकाणीही स्वच्छतागृहे बांधली.
  • साहजिकच गावशिवार हागणदारीमुक्त झाले आहे.
  • जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव शिवारात कृषी विभागातर्फे ९ तर जिल्हा परिषदेतर्फे नाला खोलीकरणाची तीन कामे करण्यात आली. यामुळे शिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. गावाजवळील सिमेंट नाला बंधाऱ्याचेही खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरी, बोअर्सची पाणी पातळी वाढली. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत पाच शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. फलोत्पादन विकास योजनेच्या अंतर्गंत एक शेततळे पूर्ण झाले आहे. शेततळ्यातील संरक्षित पाणीसाठ्यावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. हळद लागवड पद्धतीत सुधारणा... गावातील शेतकरी पारंपरिक सरी पद्धतीने हळदीची लागवड करायचे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रुंद वरंबा सरी पद्धतीने हळद लागवड होऊ लागली आहेत. ठिबक सिंचन पद्धतीचा अंगीकारही होत आहे. सरासरी उत्पादन पूर्वी एकरी १० ते १२ क्विंटल मिळायचे. आता ते २० ते २५ क्विंटल मिळू लागले आहे. सेलमसह कडाप्पा, राजापुरी वाणांच्या लागवडीचे प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत.   दृष्टिक्षेपात कुरुंदवाडी ग्रामपंचायत

  • एकूण लोकसंख्या - ११५९
  • स्च्छतागृहांची संख्या - २०३
  • पाणीपुरवठा साधने - हातपंप ९, विद्युत पंप १, सार्वजनिक विहीर १, नळयोजना १
  • अंगणवाड्या - २
  • भौगोलिक क्षेत्रफळ - ९२० हेक्टर
  • लागवडी योग्यक्षेत्र - ८७८ हेक्टर
  • जिरायती क्षेत्र - ५२१ हेक्टर
  • बागायती क्षेत्र - ३५७ हेक्टर
  • पिके - हळद (५६ हे.), ऊस (१२ हे.) अन्य संत्रा, केळी, आवळा, सीताफळ
  • कुरुंदवाडी ग्रामपंचायतीस मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार  

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा स्तर प्रथम पुरस्कार - २०१२-१३
  • हाच तृतीय पुरस्कार - २०१२-१३
  • निर्मलग्राम
  • महात्मा गांधी तंटामुक्तग्राम
  • गौरव ग्रामसभा पुरस्कार
  • कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत आबासाहेब खेडकर स्मृती विशेष प्रथम पुरस्कार
  • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सलग तीन वर्षे पात्र, पर्यावरणरत्न पुरस्कारासाठी पात्र
  • प्रतिक्रिया गावातील नागरिकांना वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेची सवय लागली आहे. आमच्या गावाचे रहिवासी तसेच अन्य ठिकाणी ग्रामसेवक पदी कार्यरत असलेले आदिनाथ पांचाळ यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे गावात सुधारणा झाली. ग्रामपंचायतीला मिळालेल्या विविध पुरस्काराची रक्कम, ग्रामनिधीतून ग्रामपंचायत कार्यालय तसेच व्यावसायिक गाळे बांधकाम केले. जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून आमच्या गावाचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. दत्तराव पत्रे - ९८२२९५२१४९. सरपंच, कुरुंदवाडी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ग्रामस्थ पाणीपट्टी, घरपट्टी आदी करांचा नियमित भरणा करतात. शंभर टक्के करवसुली होते. देखभाल दुरुस्तीसह अन्य कामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांना सोयी सुविधा देता येतात. बी. एम. कदम, ९८५०७०२६७४ ग्रामसेवक, कुरुंदवाडी, आमचे तीन भावांचे कुटुंब आहे. मी पांगमीरा शिंदे येथे ग्रामसेवक आहे. एक भाऊ शेती करतो. गेल्या वर्षी तीन एकरांत ८० क्विंटल हळद उत्पादन घेतले. आमच्या गावातील अनेक उपक्रम अन्य ग्रामपंचायती राबवत आहेत ही आमच्या गावाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. आदिनाथ पांचाळ, ७३५०३५०००३ आमची सव्वा दोन एकर जमीन आहे. संपूर्ण तूती लागवड केली आहे. घरीच रोजगार मिळाला आहे. शिवकन्या कांचनगिरे, रेशीम उत्पादक 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com