लेअर कुक्कुटपालनातून मिळवली आर्थिक सक्षमता

अंडी गोळा करताना रोठे दांपत्य.
अंडी गोळा करताना रोठे दांपत्य.

माळीसागज (जि. औरंगाबाद) येथील भाऊसाहेब रोठे यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला लेअर कुक्कुटपालनाची जोड दिली. व्यावसायिक पद्धतीने एक हजार लेअर कोंबड्याचे संगोपन करून अंडी विक्रीतून महिन्याला २५ ते ३० हजारांचे उत्पन्न मिळवून उत्पन्नाचा खात्रीशिर मार्ग शोधला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरपासून ३४ किमी अंतरावर माळीसागज (ता. वैजापूर) हे तसे आडवळणी गाव. येथील भाऊसाहेब शेषराव रोठे यांची दोन भावांमध्ये मिळून वडिलोपार्जीत साडेआठ एकर शेती आहे. भाऊसाहेब यांचे बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण झाले आहे. शेतीमध्ये कपाशी, मका या हंगामी पिकासोबत पाणी असेल तर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. केवळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा खर्च भागत नसल्याने भाऊसाहेबांनी नातेवाइकाच्या सल्ल्याने कुक्कुटपालन व्यवसायात उतरण्याचे ठरविले. या गावातील बरेच शेतकरी ब्रॉयलर कुक्कुटपालन करतात. परंतु भाऊसाहेब यांनी २०१६ पासून व्यावसायिक स्तरावर एक हजार लेअर कोंबड्याचे संगोपन सुरू केले. लेअर कुक्कुटपालनाला सुरुवात भाऊसाहेबांचे नातेवाईक अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्याच्याकडून धडे घेत आणि अनुभवातून शिकत शेतातच ७० फूट लांब, २५ फूट रुंद व १२.५ फूट उंचीचे शेड बांधले. या शेडसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. कोंबड्यांवर ताण येऊ नये, भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळावा म्हणून शेतातच शेड उभारण्याचा निर्णय घेतला. पिंजरा पद्धतीने संगोपन गादी पद्धतीने कोंबडीपालन न करता आधुनिक पिंजरा पद्धतीने लेअर कोंबड्याचे संगोपन केले जाते. या पद्धतीत कोंबड्यांची हालचाल कमी होत असल्याने खाद्य कमी लागते, मजुरी कमी लागते व विष्टेचा व कोंबड्यांचा संपर्क येत नसल्याने रोगराई येत नाही व औषधांवर खर्च कमी येतो. एका पिंजऱ्यात पाच कोंबड्या बसतात. तीन थरामध्ये त्यांनी पिंजरे ठेवले आहेत. शेडमध्ये पिंजऱ्याची दोन भागात मांडणी केली आहे. दोन पिंजऱ्यामध्ये अडीच फूट अंतर ठेऊन ६० फूट लांबीमध्ये पिंजरे बसवले आहेत. या पिंजऱ्याची खरेदी व फिटींगसाठी त्यांना २ लाख ६० हजार रुपये खर्च आला. या पिंजऱ्याच्या पुढे खाद्य ठेवण्यासाठी पन्हाळ आहे. तसेच पाणी देण्याची पण व्यवस्था आहे. या पिंजऱ्याची एकूण २ हजार १६० कोंबड्या ठेवण्याची क्षमता आहे. सर्व कामे मजुरांशिवाय घरीच केली जातात. यासाठी भाऊसाहेबांना पत्नीची मदत होते. पाण्यासाठी निप्पल सिस्टीम हवे तेवढे पाणी पक्षांना घेता यावे म्हणून पिंजऱ्यामध्येच पाइपलाइनद्वारे पाणी व्यवस्था केली आहे. या पाइपलाइनवर निप्पल बसवले आहेत. या निप्पलला कोंबडीने चोचीनी दाबले की पाहिजे तेवढे पाणी पिता येते व चोच बाजूला केली की पाणी खाली पडत नाही. पाणीपुरवठ्यासाठी शेडमध्येच उंचावर २ हजार लिटर पाण्याची टाकी बसवली आहे. पाणी निर्जंतुक होण्यासाठी औषध टाकले जाते. पाण्यामध्ये कॅल्शिअम पण मिसळले जाते. लेअर पक्षाची खरेदी अंड्याचे चांगले उत्पादन देणाऱ्या ११०० संकरीत कोंबड्यांची त्यांनी संगमनेर तालुक्यातील हॅचरीमधून खरेदी केली. १०५ दिवसाची म्हणजे १५ आठवड्यांची, साधारणत: एक किलो वजनाची एक कोंबडी त्यांनी २०५ रुपयांना खरेदी केली. या कोंबड्या तुलनेने कमी वजनाच्या, खुडूक न बसणाऱ्या, कमी अन्नात अंड्याचे जास्त उत्पादन देणाऱ्या असतात. १८ ते १९ आठवडे वयाच्या कोंबड्या अंडी देण्यास सुरुवात करतात व पुढे ७२ आठवड्यांपर्यंत साधारणत: दिवसाला एक प्रमाणे अंडी देतात. अंडी द्यायला सुरू झालेल्या कोंबडीचे वजन साधारणत: १३०० ते १३५० ग्रॅम असते. कोंबड्यांसाठी संतुलित खाद्याची व्यवस्था कोंबड्यांना लेअर मॅश खाद्य दिले जाते. खनिज आणि जीवनसत्वयुक्त संतुलित खाद्य खरेदी केले जाते. ५० किलो खाद्यामध्ये ४५ किलो भरडलेला मका अधिक ५ किलो कॅल्शिअमयुक्त खाद्य मिसळून मिश्रण तयार केले जाते. प्रति कोंबडी प्रति दिन ११० ग्रॅम प्रमाणे हे मिश्रण कोंबड्यांना दिले जाते. सकाळी सात वाजता व दुपारी साडेचार वाजता असे दोनदा हे खाद्य दिले जाते. खाद्य देण्याचे, अंडी गोळा करण्याचे काम एक ते दीड तासात पूर्ण होते. या कोंबड्यांना साधारणत: १६ तास प्रकाश लागतो. संध्याकाळी ९ वाजता लाईट बंद केली जाते. अंड्याची विक्री अंड्याचे भाव दररोज बदलतात. दररोज मुंबई मार्केटमधील भावाप्रमाणे अंड्याची विक्री केली जाते. पहिल्या वर्षी त्यांनी ऑर्डरप्रमाणे किराणा दुकानदारांना अंडी विकली. परंतु मनुष्यबळ नसल्याने ते आता वैजापूर येथील व्यापाऱ्यांना अंड्याची ठोक विक्री करतात. व्यापारी पोल्ट्रीवर येऊन अंडी घेऊन जातात. सरासरी शेकडा अंड्यासाठी ३५० ते ४०० रुपये भाव मिळतो. त्यातून ३५ रु वाहतूक धर्च आणि कमीशन म्हणून वजा केले जातात. खर्च वजा जाता महिन्याला २५ ते ३० हजारांचे उत्पन्न त्यांना मिळते. कोंबड्या ७२ आठवड्यांच्या झाल्यानंतर त्या मांसासाठी व्यापाऱ्यांना नगाप्रमाणे विकल्या जातात. हिवाळ्यात १०० ते ११० रुपयांना तर उन्हाळ्यात ७० रुपयाप्रमाणे कोंबड्यांची विक्री केली जाते. कोंबड्यांची विष्ठा शेतामध्ये खत म्हणून वापरली जाते. लसीकरण १०५ दिवसांचे पक्षी आणल्याने बहुतांश लसीकरणाचे काम हॅचरीवरच झालेले असते. परंतु पक्षी पोल्ट्रीमध्ये आणल्यानंतर राणीखेत, हगवण हे रोग होऊ नये म्हणून लसीकरण केले जाते. तसेच कोंबड्यांना लिव्हर टॉनीक, कॅल्शिअम पण दिले जाते.   संपर्क : भाऊसाहेब रोठे, ९८८१४१११७४, ७०५७२०२०२९   (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com