नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरी

आपत्तीमधून संपत्ती मिळवण्याचे ध्येय निश्‍चित करुन शेतीतील प्रवास सुरू आहे. जी संधी मिळेल त्याचा सदुपयोग केला पाहिजे आहे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वतःला जे शक्य आहे, त्यानुसार शेतीत प्रयोग घडवून यशस्वी झालो आहे. - महादेव नरवणे
 महादेव नरवणे यांची आंतरपीक काळ्या मिरीची लागवड
महादेव नरवणे यांची आंतरपीक काळ्या मिरीची लागवड

रत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील नाखरे येथील महादेव अनंत नरवणे (नाना) नारळ, सुपारी या पिकांबरोबरच आंतरपीक काळी मिरी या पिकातही ‘मास्टर’ झाले आहेत. अभ्यास, मेहनत, प्रयोगशील वृत्ती, बाजारपेठांबाबतचे अद्ययावत ज्ञान यांच्या बळावर उत्पादन व उत्पन्न अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वी व प्रगतिशील होण्यात ते यशस्वी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावर असलेल्या नाखरे येथे महादेव अनंत नरवणे ऊर्फ नाना यांची सुमारे अडीच एकर शेती आहे. नारळ, सुपारी तसेच आंब्याच्याही त्यांच्या बागा आहेत. याच जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडीवरे येथे काळीमिरीच्या प्रयोगाबाबत त्यांना काही वर्षांपूर्वी माहिती मिळाली. मग भाट्ये येथील संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेतून पन्नुर जातीची पंधरा झाडे प्रति रोप १५ रूपये या दराने आणली. नारळ, सुपारीच्या झाडांवर हे वेल सोडले. तिथून मिरी लागवडीला सुरवात झाली. १४ वर्षांचा अनुभव वेलींची योग्य निगा राखण्यास सुरवात झाली. पाणी अधिक झाले तर पाळं कुजतात किंवा बुरशीचा त्रास होतो. त्यामुळे काटेकोर सिंचन सुरू केले. वर्षातून एकदा कंपोस्ट खत, हिरवा पाला, पालापाचोळा याच खतांचा मुख्यत्वे वापर सुरू होता. पाच वर्षांनी वेलांना मिरी लागली. बाजारपेठही असल्याने विक्रीची फारशी समस्या जाणवली नाही. असे करीत अनुभवातून शिकत, सुधारत नरवणे यांचा काळी मिरी पिकात सुमारे १४ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. अशी आहे काळी मिरीची शेती

  • नारळाची ५० व सुपारीची २०० झाडे.
  • त्यात काळी मिरीचे आंतरपीक. त्याला देखभाल खर्च तुलनेने कमी.
  • किडी-रोगांचा, वन्यश्‍वापदांचा धोकाही कमी
  • काढणी, वाहतूक हाच मुख्य खर्च असतो.
  • एकदा लागवड केल्यानंतर किमान १५ वर्षे उत्पादन सुरू राहते. दरवर्षी लागवडीची गरज नाही.
  • मिरीचे उत्पादन - सुमारे १०० उत्पादनक्षम झाडांपासून वर्षाला ८०० किलो (ओले)
  • सुके उत्पादन - ३०० किलो
  • ओल्याचा दर - (हिरवे) १९० ते २०० रुपये प्रति किलो
  • सुकलेल्या मिरीचा दर - किलोला सुमारे ६०० रुपये.
  • मार्केट मुंबई किंवा स्थानिक हॉटेल व्यावसायिक
  • मिरीतील नफा- सुमारे ६० टक्के
  • काळी मिरी वाणाची वैशिष्ट्ये - लांब लोंगूर, दाणे ठशठशीत संप मिरीसाठी बाजारपेठ डिसेंबर व जानेवारी हा दोन महिन्यांचा मिरीचा हंगाम असतो. नाना यांचे मुंबईत आंबा व्यापारी आहेत. त्यांनाच ओल्या मिरीची विक्री होते. त्याचे दहा किलोचे बॉक्स तयार केले जातात. गरज भासल्यास मिरी सुकवूनही तिची विक्री करण्याचा पर्याय असतो. मात्र यामध्ये वजन घटून तीन किलो मिरीची एक किलो भरते. त्यामुळे ओली विक्रीच किफायतशीर ठरते. मंदी ठरली संधी गेल्यावर्षी मिरी विक्रीला मंदीचा फटका बसला होता. शेकडो किलो मिरी विक्रीसाठी तयार होती. मात्र मालाला उचल नसल्यामुळे मुंबईच्या नेहमीच्या व्यापाऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.असे संकट दरवेळी उदभवू नये यासाठी विक्रीची अन्य व्यवस्था करणे गरजेचे होते. स्थानिक होटेल्समधून मिरीला चांगली मागणी असते हे नानांनी ओळखले. होटेल व्यावसायिकांना भेटून त्यांच्याकडून मागणी घेण्यास सुरवात केली. ती यशस्वीही झाली. आता मिरीची मागणी व्यापाऱ्यांकडून घटली तर अन्य व्यावसायिकांचा चांगला पर्याय नानांपुढे तयार झाला आहे. सागवानाच्या शेतातही मिरीचा प्रयोग नानांनी पुढील पिढीसाठी म्हणजे भविष्यातील गुंतवणूक म्हणून सागवानाची दीडशे झाडे लावली आहेत. ती आता १५ ते १७ वर्षांची झाली आहेत. त्यातही मागील वर्षी मिरीच्या ८० झाडांची लागवड केली आहे. ही झाडे लावण्यासाठी डोंगरावर जलकुंभ तयार केले होते. त्यात सुमारे १८ हजार लिटर पाणी साठते. त्याचा वापर उन्हाळ्यात होतो. यासाठी कोणत्याही शासकीय मदतीचा लाभ घेतलेला नाही. सागवानाचे व्यावसायिक उत्पादन ४० वर्षांनी सुरू होते. मात्र त्यातील मिरीचे उत्पन्न काही काळात सुरू होणार आहे. गाईच्या तुपातून उत्पन्न तीन देशी गायीदेखील पाळल्या आहेत. त्यांची तीन लहान वासरे आहेत. एक गाय सुमारे आठ ते दहा लिटर दूध देते. घरात आवश्यक दुधाचा वापर केला जातो. उर्वरित दुधापासून तूप बनविण्यात येते. वर्षाला दीडशे किलोपर्यंत तूप बनवून ते पुण्यातील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येते. पुण्यात या देशी गाईच्या तुपाला किलोला दीड हजार रुपये दर मिळतो. वर्षाला त्यातून चांगले उत्पन्न मिळते. वर्षभर ओला चारा मिळावा यासाठी बागेच्या शेजारी यशवंत जातीच्या गवताची लागवड केली आहे. त्यासाठी ठिबक सिंचन केले आहे. हा हिरवा चारा गायींचे बारमाही पोषण करतो आहे. आंबा प्रक्रिया उद्योग आपल्या मर्यादीत क्षेत्रातही उत्पन्नाचे विविध स्त्रोत नानांनी तयार केले आहेत. त्यांची आंब्याची पारंपरिक शेती होतेच. आंब्याची तीनशे जुनी झाडे असून त्यातून दरवर्षी सातशे पेटी आंबा विविध ठिकाणी विकला जातो. त्यापासून पल्पही तयार केला जातो. त्यापासून आंबापोळी, आंबावडी आदी उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूर, पुणे भागातून त्यांना मागणी असते. नारळ, सुपारीचे उत्पादन नारळाचे प्रति झाड १०० फळे उत्पादन मिळते. सुपारीचे प्रति झाड दोन किलो उत्पादन मिळते. त्यास २५० रुपये प्रति किलो दर मिळतो. दोन्ही शेतमालास स्थानिक बाजारपेठ आहे. संपर्क - महादेव नरवणे - ७५०७३०९२७९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com