पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटा

तळेगाव ढमढेरे परिसरातील बहरलेली पेरूची बाग.
तळेगाव ढमढेरे परिसरातील बहरलेली पेरूची बाग.

पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या हद्दीवरील पेरणे फाटा येथील अनेक शेतकरी पेरूची थेट विक्री करत आहेत त्यामुळे हे ठिकाण पेरूसाठी चांगलेच प्रसिद्ध होत आहे. ग्राहक कमी असला तरी थेट विक्री केल्यामुळे पेरूला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ लागला आहे.   पुणे शहरापासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर पेरणे फाटा येथे वाघमारे वस्तीजवळ बंद पडलेला टोल नाका आहे. या गावातून नगर - पुणे रस्ता असल्याने कायमस्वरूपी वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या भागातील गावांना चांगले महत्त्व आले आहे. पूर्वी टोलनाका असल्याने बहुतांशी सर्वच वाहने येथे थांबत होती. त्यामुळे या गावातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी व किरकोळ विक्रेत्यांनी थांबणाऱ्या प्रवाशांना थेट पेरू विकण्याचा व्यवसाय निवडला. सुरवातीला मागणी कमी होती. परंतु, पेरूची गुणवत्ता व चव चांगली असल्याने हळूहळू पेरूला मागणी वाढत गेली. पेरूसाठी प्रसिद्ध गावे पेरणे फाटा परिसरातील बऱ्याच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरूच्या बागा आहेत. त्यामुळे पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पेरणे फाटा परिसरातील गावनिहाय पेरूचे क्षेत्र (एकरामध्ये)

  • गाव ः क्षेत्र
  • सणसवाडी ः २० -२२
  • कर्डेनिबुनी ः १० -१२
  • वडगाव शिंदी, आष्टापूर ः ६-७
  • तळेगाव ढमढेरे, चऱ्होली ः ५-६
  • गणेगाव वाघळ ः ४-५
  • मोराची चिंचोली ः ३-४
  • जातेगाव, मुखई, न्हावरे ः २-३
  • मरकळ ः १-२
  • किरकोळ विक्रेत्यांकडून पेरूची थेट खरेदी ः अनेक पेरू उत्पादक शेतकरी पुण्यातील मार्केटमधील व्यापाऱ्यांना थेट विक्री करत. मात्र, व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांना जागेवरच पेरूची विक्री करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पेरूला मार्केटपेक्षा दहा ते वीस रुपये अधिक मिळू लागले. किरकोळ विक्रेते ४० ते ८० रु. किलो दराने शेतकऱ्यांकडून पेरूची खरेदी करतात. ग्रेडिंग करून विक्री ः किरकोळ विक्रेते पेरूच्या आकारानुसार व वजनानुसार ग्रेंडिग करतात. प्रामुख्याने लहान, मोठे आणि मध्यम आकाराचे आणि अतिपिकलेले पेरू अशा तीन ते चार प्रकारांमध्ये आकर्षक पद्धतीने पेरूची मांडणी केली जाते. मध्यम ते मोठ्या आकाराच्या पेरूला चांगली मागणी असली तरी पिकलेल्या पेरूलाही कमी - अधिक प्रमाणात मागणी असते. पेरूच्या प्रकारानुसार दर ः प्रकार ः दर (रु. प्रतिकिलो)

  • भोपळा ः ५०-७०
  • गावराण ः ६५ - १२०
  • लाल पेरू (कबूतर) ः ९०-१२०
  • खोबरा ः १००-१२०
  • या कालावधीत असते सर्वाधिक मागणी ः पेरूचा हंगाम प्रामुख्याने जून ते जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत असतो. मात्र जून ते डिसेंबर या कालावधीत सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे या कालावधीत अधिक दर मिळण्यास मदत होते. अनेकवेळा बसमधील ग्राहक सुटे दोन ते तीन पेरूची खरेदी करतात. काही ग्राहक थेट किलोने खरेदी करत असले तरी त्यांची संख्या कमी असते. परंतु कार, ट्रक, जीप या चार चाकी गाड्यांतील ग्राहकांची संख्या अधिक असते. हे ग्राहक थेट गाडी बाजूला लावून पेरूची किलोने खरेदी करतात. त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. दर महिन्याला चांगली उलाढाल ः फेरूला ८० ते १०० रु. किलो दराने भाव मिळत असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना दर महिन्याला दहा ते बारा हजार रु. मिळतात. पेरूचा हंगाम संपल्यानंतर म्हणजे साधारणपणे जानेवारी ते जून या कालावधीत अनेक किरकोळ विक्रेते हे पुण्यातील बाजार समितीतील व्यापाऱ्याकडून पाच ते दहा रु. जादा दराने पेरूची खरेदी करून जादा दराने पेरूची विक्री करतात. प्रतिक्रिया मी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पेरू विक्रीचा व्यवसाय करतो. आम्ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपेक्षा किलोमागे दहा ते वीस रुपये अधिक देतो. त्यामुळे अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. जोडलेले शेतकरी दरवर्षी पेरूचे उत्पादन सुरू झाल्यानंतर आवर्जुन सांगतात. त्यातून आम्हालाही चांगला नफा मिळतो. मधुकर हातागळे, किरकोळ विक्रेते, संपर्क ः ९०७५१८६७०७ वर्षभरात सात ते आठ शेतकऱ्यांकडून पेरू घेतो. पेरूची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. ग्राहकांना बाराही महिने फक्त पेरणे फाट्यावरच पेरू मिळतो. त्यामुळे ग्राहकांची विश्वाससार्हता तयार होऊन संख्या वाढली आहे. विशाल दुरंधरे, किरकोळ विक्रेते, संपर्क ः ९८६००६९०६० तळेगाव ढमढेरे येथील पेरू उत्पादक शेतकरी गिरीश आनंदराव भुजबळ सांगतात, माझ्याकडे एकूण दहा ते बारा एकर शेती आहे. त्यामध्ये टोमॅटो, मिरची, बीट, कांदा, सीताफळ, शेवगा, पेरू ही पिके आहेत. एक एकर क्षेत्रामध्ये २००२ साली लागवड केलेली पेरुची दीडशे झाडे आहेत. तिसऱ्या वर्षांनंतर पेरूचे उत्पादन सुरू झाले. गेल्या चौदा वर्षांपासून झाडाच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ होत आहे. शेततळ्यातून ठिंबकद्वारे पेरू बागेला पाण्याची व्यवस्था केली आहे. चालू वर्षी गेल्या पंधरा दिवसांपासून पेरूचे उत्पादन सुरू झाले आहे. दररोज २०० ते २५० किलो पेरू मिळतात. अजून एक ते दीड महिना पेरूचे उत्पादन सुरू राहील अशी अपेक्षा आहे. मात्र, उत्पादित केलेल्या पेरूची विक्री स्थानिक फेरीवाल्यामार्फत केली जात आहे. प्रतिकिलो पेरूला ३५ ते ४० रूपये दर मिळत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागेत पाचटाचे अच्छादन केले होते. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ झाली असून दुष्काळावर मात करता आली. परंतु, गेल्या चार ते पाच महिन्यांत झालेल्या पावसामुळे फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी, किलोमागे गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा रुपयांने वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे मार्केटमध्ये पेरूची विक्री केली जात असे. त्याला दहा ते पंधरा रुपये दर मिळत होता. त्यामुळे मार्केटमध्ये पेरूची विक्री करणे परवडत नव्हते. परंतु, दोन वर्षांपासून किरकोळ विक्रेत्यांना थेट जागेवर विक्री केल्यामुळे वाहतुकीचा, आडत, हमाली असा खर्च वाचला असून उत्पन्नात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षी पेरूचे एकरी पाच ते सहा टनाचे उत्पादन मिळते. त्यासाठी वर्षाला ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता एका एकरातून साधारणपणे दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते, असे भुजबळ यांनी सांगितले. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com