दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगती

दुग्धप्रक्रिया व्यवसाय सांभाळणारे आहेर कुटुंबीय.
दुग्धप्रक्रिया व्यवसाय सांभाळणारे आहेर कुटुंबीय.

पुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि धनश्री या आहेर दांपत्याने शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत दूध संकलनासह दुग्धजन्य पदार्थ निर्मितीला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात पाऊच पॅकिंगमध्ये दूध, दही, लस्सी आणि तुपाची विक्री केली. आता मागणीप्रमाणे खवा, श्रीखंड, पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. २०० लिटरपासून सुरू केलेले दूध संकलन आता सुमारे ७ हजार लिटरपर्यंत वाढविण्यात आहेर दांपत्याला यश आले आहे. 

औद्योगिकीरणामुळे वढू (ता. शिरूर) शिवारात विविध लहान मोठे उद्योग उभे राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे या भागातील जमिनीला सोन्याचे भाव आहेत. त्यामुळे पारंपरिक शेती कमी होत आहे. मात्र काही शेतकरी अजूनही पांरपरिक शेतीसह पूरक व्यवसाय करू लागले आहेत. यातीलच एक तरुण सुनील आहेर. सुनील यांची पिंपळे जगताप रस्त्यालगत सुमारे १२ एकर वडिलोपार्जित शेती आहे. शेतीत ऊस, बाजरी, कांदा, लसूण या पिकासह हंगामी पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेती न विकता सुनील यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुनील यांनी पाच वर्षांपूर्वी उद्योगांना शुद्ध पाण्याचे (आरओ) जार, बाटल्या पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात जम बसविल्यानंतर शिवारातील शेतकऱ्यांना फायदेशीर व्यवसाय करण्याचा विचार सुनील करत होते. अभ्यास केल्यानंतर एक वर्षापूर्वी आहेर फुडस नावाने दूध संकलन आणि प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. व्यवसायाला सुरुवात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शेतकरी, दूध संकलन आणि प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांशी चर्चा करून व्यवसायाला सुरुवात केली. परिसरात विविध मोठ्या उद्योगांची दूध संकलन केंद्रे होती. मात्र प्रक्रिया केंद्र ५० किलोमीटर लांब परिसरात होती. तर संकलन हे एका विशिष्ट ठिकाणी होत असल्याने शेतकऱ्यांना ५ ते १० किलोमीटरवरून संकलन केंद्रावर दूध द्यायला जावे लागत होते. ही शेतकऱ्यांची समस्या चर्चेतून समोर आली. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दूध संकलन सुरू केले. त्यामुळे दूध संकलन वाढण्यास मदत झाली. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेतले आणि एजन्सीद्वारे मशिनरी उभारली. व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी केवळ २०० लिटर दूध संकलन झाले होते. ते टप्प्याटप्प्याने आता सात हजार लिटरपर्यंत वाढले आहे. संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित  संपूर्ण प्रकल्प स्वयंचलित असून दूध, दही, तुप, लस्सी, ताक तयार केले जाते. त्याचे पॅकिंगदेखील मानवी हाताळणी शिवाय स्वयंचलित पद्धतीने होते. उत्पादन दर्जेदार करण्यासाठी संकलन झालेल्या दुधाच्या प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यांवर १० विविध चाचण्या केल्या जातात. यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा करण्यात आली असून, यासाठी स्वतंत्र केमिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्नीची मोलाची साथ सुनील यांना व्यवसायात पत्नी धनश्रीची मोलाची साथ आहे. सर्व प्रकल्पाचे व्यवस्थापन त्याच पाहतात. यामध्ये सकाळ, संध्याकाळचे दूध संकलन, प्रयोगशाळेतील विविध चाचण्या, पॅकिंग, स्वच्छता, कामगारांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. विक्री व्यवस्था आणि अर्थकारण सध्या सात हजार लिटर दुधापैकी पाच हजार लिटर दूध अर्धा आणि एक लिटरच्या पाऊच पॅकिंगमध्ये विक्री केले जाते. तर उर्वरित २ हजार लिटर पैकी १ हजार लिटरचे दही आणि १ हजार लिटरचे ताक, लस्सी आणि काही प्रमाणात श्रीखंड आणि तूप केले जाते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी ३० वितरक पिंपरी चिंचवड परिसर आणि शिक्रापूर, कोरेगाव, वडगावशेरी परिसरात आहेत. त्यांच्याद्वारे विक्री होत आहे. दुधाला लिटरला ३२ रुपये दर दिला जातो. शेतकऱ्यांच्या गोठ्यावरूनच दुधाचे संकलन होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचला आहे. व्यवसाय नवीन असल्यामुळे भांडवलावर खर्च झाला आहे, त्यामुळे सध्या खर्च वजा जाता महिन्याला ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळत आहे.

सुन्धा' ब्रॅण्डची निर्मिती दूध व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच सुनील यांनी स्वत:च्या आणि पत्नीच्या नावातील इंग्रजी अक्षरांचा मेळ साधत 'सुन्धा' ब्रॅण्डची निर्मिती केली. याच नावाने सर्व उत्पादनांची विक्री केली जाते.  

वितरक नियुक्तीसाठी विशेष कष्ट  दूध संकलन आणि प्रक्रिया केल्यानंतर वितरणाची मुख्य जबाबदारी आणि आव्हान होते. मात्र व्यवसाय नवीन असल्याने आपला नफा कमीत कमी ठेवत, वितरकांना जास्तीत जास्त नफा देण्याचे नियोजन केले. प्रस्थापित ब्रॅंडपेक्षा आम्ही आमचे कमिशन कमी ठेवल्याने एका वर्षात ३० वितरकांद्वारे विक्री सुरू आहे. यासाठी पाणी वितरणाच्या व्यवसायाचा अनुभव पाठीशी असल्याने शक्य झाल्याचे सुनील यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे परिसरातील २२ तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामधील सात तरुण पूर्ण वेळ, १५ जण अर्धवेळ कामाला आहेत. एका तरुणाला सरासरी १२ हजार रुपये पगार मिळतो.  गायी खरेदीसाठी मदत : दूध संकलन वाढावे आणि शेतकऱ्यांचाही दुग्ध व्यवसाय वाढावा म्हणून परिसरातील सुमारे १५ शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पैसे देत गायी खरेदी करण्यास मदत करत विश्‍वास निर्माण केला. शेतकऱ्यांना दूध संकलनाची हमी मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची एक दोन असणाऱ्या गायींची संख्या आता १० पर्यंत वाढली आहे. यामुळे परिसरातील ७० शेतकरी जोडले गेले आहेत. या शेतकऱ्यांकडून सकाळी आणि संध्याकाळी असे मिळून दररोज सुमारे सात हजार लिटर दूध संकलन होत आहे. 

पारंपरिक शेतीसोबत मी दोन गायींचे संगोपन करत होतो. आमच्या घराशेजारीच आहेर फुडस् नावाने दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यानंतर सुनील आहेर यांनी गायी वाढविण्यास मदत केली. टप्प्याटप्प्याने दोन गायींवरून १० पर्यंत गायींची संख्या वाढविली. मुक्त गोठा पद्धतीने गोपालन करून रोज १५० लिटर दूध संकलन केंद्रावर पाठवितो. — गणेश शिवले,  शेतकरी, ९८२३७५२३१० व्यवसायाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना सासू, सासरे आणि पतीचा पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे मी हा व्यवसाय जबाबदारीने करू शकते. पती वितरणाचे काम पाहत असताना, मी डेअरीचे सर्व व्यवस्थापन बघते. सध्या आमच्याकडे २२ जणांचा स्टाफ असून, या प्रकल्पासाठी बॅंकेचे ६० लाखांचे कर्ज घेतले आहे. — धनश्री आहेर, संचालिका,  व्यवस्थापक, आहेर फुडस् , ८८८८५६१०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com