टेलरिंग व्यावसायिक ते यशस्वी कांदा बीजोत्पादक, रामराव जाधवांचा प्रेरणादायी प्रवास

कांदा बीजोत्पादन प्लाॅटमध्ये रामराव जाधव.
कांदा बीजोत्पादन प्लाॅटमध्ये रामराव जाधव.

आपल्या किंवा इतरांच्या गरजेतून निर्माण झालेली बाब पुढे चालून प्रयत्नवादी माणसाच्या आयुष्याला कसे वळण देईल, याचं प्रारंभी काहीच सांगता येत नाही. मात्र, पिपोंडे बुद्रुकच्या रामराव जाधव यांचा टेलरिंग व्यावसायिक ते यशस्वी कांदा बीजोत्पादक हा प्रवास ‘रोवलेल्या बिजाचे, सर्वांनाच फलदायी अशा वृक्षात’ रुपांतर करणाराच आहे. 

सातारा जिल्ह्यातील पिपोंडे बुद्रुक येथील रामराव बाजीराव जाधव यांचा टेलरिंग व्यवसाय असल्याने दुकानात विविध शेतकऱ्यांची ये-जा असायची. त्यातून अनेक विषय समजायचे. यात अनेकवेळा बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणुकीचा विषय चिंतेचा असायचा. बियाण्यातील फसवणूक टाळण्यासाठी तसेच नवा प्रयोग करण्याच्या दृष्टीने रामराव यांनी फुरसुंगी गरवा या स्थानिक वाणाच्या कांद्याचे बीजोत्पादन करण्यास सुरवात केली. यात जस-जसे यश मिळत गेले, तस-तसे टप्पाटप्प्याने बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढवत नेले. विश्‍वासार्हता मिळून लागल्याने त्यांच्या बियाण्यास मागणी वाढू लागली. केवळ गावापुरताच हा विषय न राहता जुन्नर, फलटण, सोनगाव या भागांबरोबरच कर्नाटकच्या काही भागांतून त्यांच्याकडील बियाण्याला मोठी मागणी वाढू लागल्याने त्यांनी बियाणे विक्री सुरू केली. 

बीजोत्पादनाचा शाश्वत मार्ग 

मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही, हे लक्षात येता रामराव यांनी इतर शेतकऱ्यांना संघटित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कष्टाळू व व्यावसायिक पद्धतीने शेती करणारे १०० हून अधिक शेतकरी संघटित केले. यापैकी या व्यवसायासाठी ७५ शेतकऱ्यांची निवड केली. या शेतकऱ्यांना बीजोत्पादन शेतीतील संधी आणि शाश्वतता याबद्दल सविस्तर समाजावून सांगितले. तसेच, या शेतकऱ्यांसोबत करार शेती करण्यास सुरुवात केली. निवडलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे व अन्य मार्गदर्शन केले. उत्पादित होणाऱ्या सर्व बियाण्यांची चालू दराप्रमाणे खरेदी केली जाते. एकरी सरासरी दोन ते अडीच क्विंटलपर्यंत बीजोत्पादन मिळते. यातून शेतकऱ्यांना पाच महिन्यांत किमान एक लाख रुपये मिळतील याची काळजी घेतली जाते. बियाण्यास अधिक दर मिळाल्यास त्याचाही काही हप्ता शेतकऱ्यांना दिला जात असल्याचे रामराव सांगतात. गेल्या सहा ते सात वर्षांपासून या पद्धतीची करार शेती जाधव करत आहेत. आपल्यासह अन्य शेतकऱ्यांना चांगले मार्केट उपलब्ध केले आहे. त्यांच्या बियाण्याला महाराष्ट्रातील सुमारे सहा जिल्हे व अन्य पाच राज्यातील काही भागांतून मागणी आहे. विश्वास निर्माण झाल्यामुळे मागणीत वाढ होत असल्याचे रामराव जाधव सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून अभ्यासू वृत्तीतून चिकाटी, कष्ट आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर रामराव जाधव कांदा बीजोत्पादन यशस्वीपणे करत आहेत.  

यंदा झालेली एकूण लागवड 

  • कांदा बीजोत्पादन घेणारे दहा गावांतील ७५ शेतकरी करारामध्ये सहभागी . एकूण लागवड केलेल्या कांद्याचे वजन एक लाख २० हजार किलो. 
  • बीजोत्पादनासाठी ११० एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड. एकरी १० ते १२ क्विंटल कांदा लागतो. 
  • १० ते २० नोव्हेंबर दरम्यान कांदा लागवड केली जाते. मार्च ते एप्रिल मध्ये काढणी केली जाते. बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना पाच महिन्यांमध्ये कमीत कमी एकरी एक लाख नफा मिळेल, याची काळजी घेतली जाते.
  • अशी चालते कार्यपद्धती 

  •  प्रथम उत्कृष्ट कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यची निवड करून त्यांना लागवडीसाठी कांदा उपलब्ध करून दिला जातो. 
  •  लागवडीसाठी दिलेल्या कांद्याचे पैसे लागवड करताना घेतले जात नाहीत. शेतकरी जेव्हा बियाणे तयार करून देतील तेव्हा होणाऱ्या बियाण्यांच्या रकमेतून कांद्याचे पैसे वजा केले जातात. 
  •  वेळोवेळी लागवडीसाठी मार्गदर्शन, तसेच लागवड ते काढणी यामध्ये चार वेळा प्लॉट भेट देऊन पाहणी केली जाते. 
  •  तयार होणाऱ्या बियाण्यांची प्रतवारी करून त्याची उगवणशक्ती तपासली जाते. 
  •  शक्यतो बियाणे विक्री थेट शेतकऱ्यांना केली जाते. 
  •  ग्राहकांच्या मागणीनुसार एक किलोपासून ५० किलो पर्यंतच्या पिशव्या भरून पुरवठा केला जातो. 
  •  महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, सोलापूर  तर कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार व गुजरात राज्यांतील अनेक कांदा उत्पादक शेतकरी ग्राहक म्हणून जोडले आहेत. 
  • दर्जेदार बियाण्यांमुळे कांद्याची मागणी वाढली. या वाढलेल्या मागणीचा फायदा माझ्यासह अन्य शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने हा करारशेती बीजोत्पादनाचा उपक्रम राबवला. यास शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याने यश मिळत गेले. ग्राहक शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध होत असून, बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळत आहे. 

    - रामराव जाधव, प्रगतशील शेतकरी, पिंपोडे.  संपर्क : +91 90494 39093

    मी गेल्या सहा वर्षांपासून रामराव जाधव यांच्याकडे बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे. दरवर्षी एक ते दोन एकर क्षेत्रावर लागवड करतो. लागवडीसाठी बियाणे, मार्गदर्शन तसेच सहकार्य मिळण्याबरोबरच चांगले पैसे मिळत आहेत. 

    - सुधीर शेलार, कांदा बीजोत्पादक, राऊतवाडी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com