Agriculture success story in marathi potato market of pune agriculture produce market committee | Agrowon

स्थानिकसह परराज्यांतील बटाट्यासाठी प्रसिद्ध पुणे मार्केट  

गणेश कोरे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाट्याचा हंगाम सुरू झाला आहे. येथील बाजारपेठ आग्रा, इंदूरसह स्थानिक आवकेवर अवलंबून असते. लागवड कालावधीनुसार विविध चार हंगामांमध्ये विविध वाणांच्या बटाट्याचा व्यापार इथे चालतो. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्याचा हा घेतलेला आढावा.

पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाट्याचा हंगाम सुरू झाला आहे. येथील बाजारपेठ आग्रा, इंदूरसह स्थानिक आवकेवर अवलंबून असते. लागवड कालावधीनुसार विविध चार हंगामांमध्ये विविध वाणांच्या बटाट्याचा व्यापार इथे चालतो. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्याचा हा घेतलेला आढावा.

पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीमध्ये बटाट्याचा पहिला हंगाम सुरू होतो तो सप्टेंबर महिन्यात. या महिन्यात कर्नाटक राज्यातील ‘हसन’ वाणाची आवक सुरू होतेच. शिवाय, पुणे जिल्‍ह्यातील राजगुरुनगर (खेड), आंबेगाव परिसरातून वेफर्ससाठीच्या, तर ज्योती या रोजच्या अन्नात उपयोगी येणाऱ्या बटाट्याची आवक सुरू होते. हा हंगाम साधारण नोव्हेंबरपर्यंत असतो. अर्थात, ‘हसन’ वाणाची आवक नगण्य म्हणजे एखादा ट्रक (१० टन), मात्र स्थानिक आवक त्या तुलनेत सुमारे २५० टन होत असते.  

कर्नाटकातून आवक घटतेय

सुमारे दहा वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातून हसन वाणाची दररोज सुमारे ७ ते ८ ट्रक आवक व्हायची. मात्र तेथील उत्पादन तुलनेने घटल्याने आणि स्थानिक पातळीवरच खरेदी होत असल्याने पुणे बाजार समितीत नगण्य आवक होत असल्याचे प्रमुख आडतदार राजेंद्र कोरपे यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशातून मोठी मागणी 

उत्तर प्रदेशात या हंगामात शीतगृहातील बटाटे उपलब्ध असतात. मात्र ग्राहकांकडून ताज्या बटाट्यांना पसंती असते, त्यामुळे तेथील व्यापारी दोन महिने पुण्यात मुक्कामी असतात. ते हा ताजा बटाटा खरेदी करून उत्तर प्रदेशात पाठवितात. एकूण आवकेच्या ७५ टक्के बटाटा झांशी, बरेली, आग्रा येथे पाठविला जातो.

 नोव्हेंबरचा दुसरा हंगाम 

पुणे बाजार समितीत बटाटा आवकेचा दुसरा हंगाम सुरू होतो तो नोव्हेंबर- डिसेंबर या कालावधीत. पुणे जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव परिसरात पावसाळा कमी झाल्‍यानंतर साधारण सप्टेंबरमध्ये लागवडी होतात. त्यात ‘पुखराज’ वाण असतो. या दुसऱ्या हंगामात सुरुवातीला १० टनांची आवक दररोज सुरू असते, त्यास साधारण १५ ते १८ रुपये दर मिळतो. हा हंगाम मार्चपर्यंत सुरू असतो. 

मुख्य आणि तिसरा हंगाम 

पुणे बाजार समितीमधील बटाट्याची बाजारपेठ प्रामुख्याने आग्रा आणि इंदूरच्या बटाट्यावर अवलंबून असते. जानेवारी- फेब्रुवारीत या भागातील बटाट्याची आवक सुरू होते. यामध्ये जानेवारीत इंदूर, तर फेब्रुवारीच्या अखेरीस आग्रा येथील बटाट्याची आवक सुरू होते. यामध्ये ज्योती, ३७-९७ आणि ३०२ या वाणांचा समावेश असतो. या भागातील शेतकरी एकूण उत्पादनातील सुमारे ८० टक्के बटाटा शीतगृहात ठेवतात, तर केवळ २० टक्केच बटाटा बाजारात पाठवितात. हंगामात इंदूरहून दररोज सुमारे १०० टन, तर आग्रा येथून सुमारे ३०० टन आवक होते. या वेळी इंदूरच्या बटाट्याला किलोला १३ ते १७ रुपये, तर आग्रा बटाट्याला १० ते १३ रुपये दर मिळतो. दरम्यान, बाजारपेठेतील मागणीनुसार शीतगृहातील बटाट्याची आवक सुरू असते. फेब्रुवारी- मार्चमध्ये शीतगृहात ठेवण्यात आलेला बटाटा किमान नऊ महिने नोव्हेंबरपर्यंत साठवला जातो. 

इंदुरी बटाट्याला वेफर्ससाठी मागणी

 इंदूरचा बटाटा आग्र्याच्या बटाट्यापेक्षा कमी गोड असल्याने त्याचा वापर वेफर्ससाठी अधिक होतो, यामुळे विविध वेफर्स उद्योगांकडून खरेदी होते. आग्रा बटाट्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे वेफर्स लाल रंगाचे होतात. साहजिकच उद्योगाकडून मागणी कमी असते.  

मुळशी बटाट्याचा हंगाम 

मुळशी तालुक्यात १० ते १२ वर्षांपासून बटाट्याची शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. डिसेंबरच्या सुमारास लागवड होते. मार्च- एप्रिलमध्ये या भागातील आवक सुरू होते. या भागातदेखील ‘पुखराज’ वाणालाच शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. हंगामात साधारण दररोज २०० टन आवक होते. किलोला ८ ते १२ रुपये दर मिळतो.

तळेगाव, वाठार बटाट्याचे नामकरण

इंग्रजांच्या काळात पंजाबातून बटाटा रेल्वेने आणला जाई. याकाळात पुणे जिल्ह्यातील तळेगाव (दाभाडे) रेल्वे स्टेशन आणि सातारा येथील वाठार रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबायची. या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी बैलगाड्या आणून बटाटा आणि बियाणे खरेदी करायचे. त्यामुळे या स्टेशनवरून तळेगाव आणि वाठार हे नाव बटाट्याला पडले. आजही पुणे जिल्‍ह्यातील आवक होणाऱ्या बटाट्याला तळेगाव, तर सातारा येथून आवक होणाऱ्या बटाट्याला वाठार नावाने ओळखले जाते. 

राजेंद्र कोरपे, ८७९३५०६७९७

बटाटा उत्पादकांचे अनुभव 

सात-आठ वर्षांपासून एक-दीड एकरवर लागवड करतो. यंदा बियाण्याचे दर दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत, त्यामुळे यंदा लागवड केली नाही. गेल्या वर्षी हे दर ८०० ते एक हजार रुपये होते. गेल्यावर्षी दर न मिळाल्याने केवळ खर्च निघाला. यंदा लांबलेल्या पावसाने शेतात अजून चिखल असून, वाफसा आलेला नाही, त्यामुळे लागवडी खोळंबल्या आहेत. आमच्या गावात १५ ते २० शेतकरी एकूण १० ते १५ एकरांत बटाटा उत्पादन घेतात. 

वसंत शेंडे, माले, ता. मुळशी -  ७७६७०६००९५

आम्ही दरवर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सात- आठ एकरांवर पुखराज वाणाच्या बटाट्याची लागवड करतो. मात्र जेव्हा आपला बटाटा बाजारात सुरू होतो त्याच काळात आग्रा, इंदूरचा सुरू होतो, त्यामुळे आपल्या बटाट्याला दर कमी मिळतो. सध्या बटाट्यापेक्षा कांद्याला दर जास्त मिळत असल्याने आम्ही कांद्याचे क्षेत्र वाढवले आहे. बटाट्याचे एकरी १२५ गोणी, तर कांद्याचे एकरी २२५ गोणी उत्पादन मिळते. त्यामुळे कांद्याला किलोला पाच रुपये व बटाट्याला १२ रुपये दर मिळाला तरी कांदाच परवडतो.यंदा बटाटा कमी करून कांदा वाढविला आहे. गेल्यावर्षी १७ ते १९ रुपये दर असणारे बियाणे यंदा ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहे. पुढील आठवड्यात दोन-तीन एकरांत लागवड करणार आहे. 

शांताराम गायकवाड, वडगाव पाटोळे, ता. खेड  ९८८१०५८६५०

सरासरी दैनंदिन आवक व दर (प्रतिकिलो) 

वाण आवक प्रतिकिलोचे दर
हसन  नगण्य  
वेफर्ससाठीचे पाच टन २५ ते ३५   
दोन वाण   
ज्योती १५० टन १० ते १५  

पुणे बाजार समितीतील उलाढाल (प्रातिनिधिक) दर (रुपये)
 

वर्ष आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी
२०१६-१७ १२ लाख १ हजार ७२१ ७०० १,६०० १,१५०
२०१७-१८ १६ लाख ७१ हजार ९२५ ५०० १,२०० ८५० 
२०१८-१९ २१ लाख ६७ हजार ६३८ ५०० १,३०० ९०० 

राजेंद्र कोरपे यांना मिळालेले नोव्हेंबरमधील दर (रुपये प्रतिकिलो)

वर्ष    वाण दर  वाण दर  वाण  दर 
२०१६ आग्रा ५-१० इंदौर १०-१२ तळेगाव ५-१० 
२०१७ आग्रा ५-८ इंदौर ६-८ तळेगाव ८-१२ 
२०१८ आग्रा ७-१५ इंदौर १५-१८ तळेगाव १६-१८ 
२०१९ आग्रा १०-१५ इंदौर १७-२० तळेगाव १४ -१८ 

आकडेवारी स्रोत - पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
रोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक...दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग...
रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा कृषी...नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या...
आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ (video...बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील...
केरळमधील शेतकऱ्यांनी जपल्या २५६ भातजाती...संकरित बियाण्यांच्या आगमनानंतर उत्पादनाची तुलना...
ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळखवनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची आवड असल्याने...
डोंगर फोडून संघर्षातून उभारले फळबागेचे...कमी पावसाच्या प्रदेशात डोंगर फोडून फळबागांचे...
उसातील आंतरपिकांतून उंचावले शेतीचे... वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी...
प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून...प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून...
मक्याला मागणी कायम, दरही टिकून जळगाव...जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मक्‍याचे...
स्थानिकसह परराज्यांतील बटाट्यासाठी...पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कुटुंबातील एकविचाराने कर्जरहित शेतीचा...सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील...
जवारी मिरचीने मिळवला किलोला ७०० रुपये...कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी...
खेकडापालन करा, घरबसल्या उत्पन्न कमवागोड्या पाण्यातील खेकडापालनाचा यशस्वी व्यवसाय...