समाजकारणासह प्रयोगशील शेतीचा व्यासंग जपलेला एेंशी वर्षांचा तरुण

मावकर यांचे तंदुरुस्त आरोग्य वयाच्या एेंशीतही मावकर यांची उर्जा आणि ठणठणीत प्रकृती तरुणांना लाजवेल अशीच अाहे. सकाळी प्राणायाम व अन्य योगासने नियमाने करतात. कसलेही व्यसन नाही. क्वचितप्रसंगी होटेलचा अपवाद वगळता घरचेच अन्न सेवन करण्यावर भर असतो. आजही शेती उपक्रम, मेळावे आदींसाठी बसने प्रवास करतात. प्रत्येकवेळी जेवणाचा डबा सोबत ठेवायचा हा रिवाज कित्येक वर्षांपासून जपला आहे.
वयाच्या एैंशीतही मावकर शेतीत उत्साहाने काम करतात. डाळिंब बागेचे निरीक्षण करताना.
वयाच्या एैंशीतही मावकर शेतीत उत्साहाने काम करतात. डाळिंब बागेचे निरीक्षण करताना.

पुणे जिल्ह्यातील चांडोली बुद्रुक येथील रामचंद्र नाना मावकर यांनी शेतीत प्रयोगशीलता जोपासत त्यातील व्यासंग वाढवलाच. स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादीत न राहता शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनातही भाग घेतला. बटाटा, डाळिंब, सीताफळ तसेच अन्य व्यावसायिक पिके घेत त्यासाठी हमखास बाजारपेठही तयार केली. शेती व समाजकारण अशी दुहेरी सांगड घालणारे मावकर आज वयाच्या एेंशीतही समस्त शेतकऱ्यांसाठी अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. पुणे जिल्ह्यातील कांदा-बटाट्यासाठी प्रसिद्ध मार्केट असलेल्या मंचरपासून (ता. आंबेगाव) सुमारे पाच किलोमीटरवरील चांडोली बुद्रुक हे रामचंद्र नाना मावकर यांचे गाव. त्यांचे आजचे वय ८० वर्षे आहे. मात्र तरुणांनाही लाजवेल अशी ऊर्जा घेऊन ते अखंड कार्यरत आहेत. शेती व समाजकारण अशी उत्तम सांगड घालत आपले आयुष्य आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा अनेक स्तरांवर त्यांनी यशस्वी केले आहे. संघर्षाची कहाणी मावकर यांचा जन्म मुंबईचा. वडील गिरणी कामगार. घरची अत्यंत आर्थिक गरिबी. साधारण १९४५ ते ४९ चा तो काळ. आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी आई अखंड कष्ट वेचत होती. इयत्ता चौथीतील स्कॉलरशीपसाठी शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. मुंबई महानगरात ते वरच्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. ही गोष्ट सांगताना मावकर यांचा ऊर आजही भरून येतो. परिस्थितीपुढं हतबल मावकर कुटूंब १९५०- ५२ या काळात उदरनिर्वाहासाठी गावी परतलं. तिथं शाळेच्या काहीच सुविधा नव्हत्या. सातवीची परीक्षा द्यायला जुन्नरला जावं लागायचं. जात्याच हुशार असलेले मावकर या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. थोरला भाऊही शिकत होता. मजुरीचे अनुभव घेतले घरचा प्रपंच सुरू ठेवण्यासाठी मावकर लहानवयापासूनच आईसोबत कष्ट उपसू लागले. शेतात पडेल ती मजुरी करायचे. सहा- आठ आणे रोजंदारी हाती पडायची. खड्डे खोदण्याचा एक रुपया मिळायचा. मशीनवरील शिलाई काम, सायकल दुरुस्ती अशी कामेही केली. कुटुंबाची त्या वेळी १५ एकर संयुक्त शेती होती. सगळी कोरडवाहूच. दरम्यान बैल घेतला. दुष्काळात चारा आणायला दूर भटकंती करावी लागे. कष्ट अंगवळीच पडले होते. मातीच्या घरात थाटला संसार लग्न झालं. कच्च्या वीटमातीच्या, गव्हाच्या काडांनी शाकारलेल्या घरात मावकर यांच्या संसाराची गाडी मार्गाला लागली. पावसाळ्यात घर जागोजागी गळायला सुरवात होई. एकीकडे चूल झाकण्यासाठी धडपड आणि दुसरीकडे मुलांना मांडीवर घेऊन त्यांना पावसापासून संरक्षण द्यायचं. आयुष्य असं सुरू होतं. समाजकारणाचे संस्कार थोरले बंधू राष्ट्रीय सेवा दलाचे कार्य करीत. त्यांचा प्रभाव मावकर यांच्यावर पडला. साने गुरुजी आदर्श होते. पुस्तकांचा मोठा संग्रह झाला होता. मग वाचनालय सुरू केले. पण ज्यांनी पुस्तके नेली त्यांनी ती परत केलीच नाहीत. कष्टातून गावात पत तयार करीत मावकर यांनी पुढे सरपंचपदाची निवडणूक लढवली. तब्बल दहा वर्षे सरपंचपद भूषवलेच शिवाय पंचवीस वर्षे ते ग्रामपंचायतीचे सदस्यही राहिले. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण सरळ, पारदर्शी स्वभावाच्या मावकरांना पैसा, राजकारण यातलं काहीच जमलं नाही. प्रगतीकडे वाटचाल आता वाट्याला सात ते आठ एकर शेती आली. लसूण, बटाटा अशी पिकं घेणं सुरू होतं. पुढे ग्रामशिक्षण समितीचं अध्यक्षपद चालून आलं. साधारण १९८०- ८५ हा काळ. द्याल ते काम अत्यंत जबाबदारीनं, पूर्ण क्षमतेनं आणि प्रामाणिकपणे करायचं ही वृत्ती. त्यातून गावातील शाळेचा संपूर्ण कारभार, विविध उपक्रम, देवस्थान ट्र्स्टचं अध्यक्षपद अशा जबाबदाऱ्या वाढत राहिल्या. सर्वांना सोबत घेऊन काम करताना गावाला जिल्हा, राज्य पुरस्कारही मिळाले. भ्रष्टाचार मुक्तीची चळवळ शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी मंचरला यायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली चाकणला कांदा फेक आंदोलन झाले. मावकर यांनी या चळवळीला वाहून घेतले. कर्जमुक्ती अभियान असो की अन्य काही, राज्यभरातील दौऱ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. परखडपणा व भ्रष्टाचाराची चीड असलेल्या मावकर यांनी पुढे ज्येष्ठ सामाजिक नेते आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनात भाग घेतला. त्यांच्यासोबत दौरे केले. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सात वर्षे सभासद व जिल्ह्याचे अध्यक्षपदही पार पाडले. अनेक गरजूंना न्याय मिळवून दिला. शेतीतील प्रयोगशीलता

  • समाजकारण सांभाळताना मावकर यांनी शेतीतील प्रयोगशीलतेलाही वाव दिला. यात घरच्यांची मोठी मदत होती.
  • कोणतेही नवे पीक, वाण, तंत्रज्ञान बाजारात आले की त्याचा वापर करण्यात त्यांचा हातखंडा तयार झाला. टोमॅटो असो की खडकाळ माळरानात उसात बटाटा अशी त्या भागात प्रचलित नसलेली पीकपद्धत त्यांनी यशस्वी केली.
  • उसात कलिंगड, फ्लाॅवर, खरबूज आंतरपीक पद्धतीचे प्रयोग
  • गादीवाफा, ठिबक सिंचनाचा काही वर्षांपासून वापर
  • वसतंदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे प्लॅस्टिक बॅगेत उसाची रोपे तयार करण्याच्या तंत्रावर काम सुरू होते. इकडे मावकर यांनीही त्या पद्धतीचा प्रयोग केला होता. ‘व्हीएसआय’मधील तज्ज्ञांना त्याची माहिती होताच मावकर यांच्या शेतातच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
  • कमी भांडवलाच्या शेतीकडे आज वयोमानामुळे प्रकृती पूर्वीसारखी साथ देत नसली तरी मावकर यांचे कष्ट थांबलेले नाहीत. शालेय जीवनापासून शेतीचे धडे गिरवलेला त्यांचा मुलगा विलास शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. आजची पीकपद्धती

  • बटाटा- शेती सुरू केल्यापासूनचे पीक
  • डाळिंब- सुमारे ४५० झाडे
  • सीताफळ- ९० झाडे.
  • सुमारे २० ते ३० गुंठ्यात स्वीट कॉर्न- वर्षभर घेतात. त्यास प्रति किलो ५ ते १० रूपये दर. जनावरांनाही चारा होतो. साधारण ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न हे पीक देते.
  • दोन वर्षांतून एकदा बाजरी. ती घरच्यापुरते भरपूर देऊन जाते. खरिपात कोबी, फ्लॉवर
  • पूर्वी गव्हाच्या सुधारित जातींची लागवड व पायाभूत बियाणे उत्पादन. कृषी विभागाला ते पुरविले. त्याचे वाटप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाले. आता ही पीकपद्धती थांबवली आहे.
  • पाणी- घोडनदीवरून ‘लीप्ट इरिगेशन’. विहीर आहे.
  • दुग्धव्यवसाय, चारा पिके

  • पाच जनावरे, दोन कालवडी. घरच्यासाठी चार- पाच लिटर दूध ठेऊन दररोजचे २५ ते ३० लिटर दूध डेअरीला. या भागात डेअऱ्यांची मोठी संख्या असल्याने जागेवरून दूध घेतले जाते.
  • भाव खाणारा बटाटा

  • पेढ्यासारखा पिवळसर सोनेरी आकर्षक रंगाचा, चटकन नजरेत भरणारा. त्यामुळे मावकर यांच्या बटाट्याला बाजारात अन्य शेतकऱ्यांपेक्षा किलोला एक ते दोन रुपये दर जास्त मिळतो.
  • यंदा ७० गुंठे क्षेत्रात ३६० गोणी उत्पादन. प्रति गोणी सुमारे ५७ किलोची. दरवर्षी उत्पादन याच ‘रेंज’मध्ये.
  • काटेकोर निगा, पाणी, खते, लावणी, काढणी या बाबी नेमक्या वेळेत
  • बेण्याच्या निवडीवर उत्पादन व दर्जा अवलंबून. त्यावरच दर चांगले मिळतात असं मावकर सांगतात. पुकराज वाणाची निवड.
  • मंचरला बाजारात जाऊन बटाट्याचा आकार, डोळ्याची ठेवण यांचे सूक्ष्म निरीक्षण मावकर करतात. बेण्याचा आकार अंड्यासारखा असावा. डोळे खोल गेलेले नसावेत. कापून पाहिल्यानंतरचा रंग महत्त्वाचा अशा टीप्स ते देतात.
  • रासायनिक बेणेप्रक्रियेनंतरच लागवड
  • रासायनिक खतांचा वापर खूप कमी. ताग लावून ट्रॅक्टरच्या साह्याने पुढे जागेवर गाडला जातो. त्यानंतर त्या जागेत बटाटा. तीन एकरांत केवळ तागावर बटाटा घेतला. एकेवर्षी उसाची मळी चांगली रापवून एका वावरात वापरली.
  • बेडवर गांडूळखताचा वापर. अशा सेंद्रिय घटकांच्या वापराने जमीन इतकी भुसभुशीत झाली आहे की ढेकळं शोधूनही सापडणार नाहीत असं विलास सांगतात.
  • जमीन झालीय सुपीक

  • रासायनिक व सेंद्रिय पद्धतीचा सुरेख मेळ. घरपरिसरात गांडूळखत प्रकल्प. कुठंही नांगरायला जावं तर गांडूळेच दिसतील असं मावकर म्हणतात.
  • जनावरांचे शेण व मूत्र एका ठिकाणी संकलित केले जाते. साधारण तीनशे लिटर क्षमतेच्या टाक्या बनवून जीवामृत निर्मिती. स्लरी फडक्याने गाळून घेतली जाते. शेतात त्या त्या ठिकाणी ठिबकच्या व्हॉल्व्हमधून ती सोडली जाते.
  • सातही एकरांत ठिबक यंत्रणा .
  • कमी खर्चिक सीताफळ मावकर सांगतात की सीताफळाच्या झाडांचं वय तसं पंधरा वर्षांचं आहे. आधी या जागेत सागाची २१० झाडे लावली होती. त्यांच्या मोकळ्या जागेत सीताफळाची झाडं लावली. पण सागात ती पुरेशी वाढलीच नाहीत. साग काढल्यानंतर काही वर्षांनी ती चांगलं उत्पादन देऊ लागली आहेत. या पिकाला उत्पादन खर्च तसा फारसा नाही. सागाने आणली बंगल्याला शोभा अलीकडेच शेतात देखणा बंगला बांधला. दरवाजे, त्याच्या चौकटी, खिडक्या, घरातील टेबल, खुर्चा आदी फर्निचरदेखील घरच्या सागाच्या लाकडाचे करून बंगल्याच्या सौंदर्यात भर घातली. घरासमोर जनावरे व साठवणुकीचे शेड आहे. त्याचे वासेही सागाचेच आहेत. दर्जेदार मालाला मॉल्सकडूनच मागणी

  • चांडोली बुद्रुक व मंचर परिसरात काही आघाडीच्या मॉल कंपन्यांची ‘कलेक्शन सेंटर्स’ आहेत. त्यामुळे विक्रीसाठी दूर जाण्याची गरज भासत नाही.
  • डाळिंबाच्या एकूण क्षेत्रातून यंदा सुमारे सहाशे क्रेट (प्रति क्रेट २० किलो) माल निघाला. प्रति झाड ४० ते ५० किलोपर्यंत उत्पादन मिळते. ए ग्रेडचा माल मॉलला दिला जातो. त्यास किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अलीकडे दर घसरले. मॉलने ५७ रुपयांप्रमाणे खरेदी केली.
  • यंदा १२०० किलो सीताफळे मॉलला दिली. तर ५०० किलो माल मुंबईला पाठवला. साधारण २० किलो प्रति झाड उत्पादन मिळते. सीताफळाचे वजन, दर्जा व गोडी चांगली असल्याने
  • मागील वर्षी किलोला १०० रुपये तर यंदा ७५ ते ७८ रुपये दर मिळाला.
  • बारा महिने चवळी केवळ सात ते आठ गुंठ्यांत लागवड असते. साधारण एक किलो बी लागते. दोन महिन्यांत प्लॉट सुरू होतो. पुढे दोन महिने चालतो. चवळीला मॉलकडून सतत मागणी असते. दोन फूट लांब शेंगा असतात. तीस ते ३५ रुपये प्रति किलो दर मिळतो. एक प्लॉट संपला की लगेच दुसऱ्या जागेत अशा प्रकारे वर्षभर हे पीक उत्पन्न देत राहते. प्रति हंगाम २५ ते ३० हजार रुपये मिळतात. शेतीत राबते सारे कुटूंब मावकर कुटुंबातील सर्व सदस्यांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो. दुधाच्या धारा काढणे, मग वावरात जाणे, शेतीबरोबर मार्केटिंग, विक्रीचं नियोजन यात विलास व्यस्त होऊन जातात. त्यात ‘लोडशेडींग’ची समस्या. रात्रीची वीज असली तर दिवसभर शेतात राबून पुन्हा रात्रीही शेताला पाणी द्यायला जायचं. मावकर यांचे दोन्ही नातूही शेतीकामात कुशल आहेत. एक आठवीला तर दुसरा नारायणगावला शेतीशाळेत आहे. विषमता दूर करणारी विचारसरणी वारकरी पंथाच्या या कुटुंबात हरिपाठ नित्याचा असतो. नातवांच्या गळातही माळा परिधान केलेल्या दिसतात. भले वाहनातून असेल पण पत्नीसोबत दरवर्षी पंढरीची आषाढ वारी मावकर चुकवत नाहीत. देव माणसात शोधा असे साने गुरूजींनी शिकवले. त्यामुळे समाज सन्मार्गाला लागतो. विषमता दूर होते ही गुरूजींची शिकवण मावकर यांनी आचरणात आणली आहे. अॅग्रोवनच्या स्थापनेपासूनचे स्नेहबंध ॲग्रोवन सुरू होण्यापूर्वी एक सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीपासून ते आजगायत माझे ॲग्रोवनसोबत घट्ट स्नेहबंध जुळले असल्याची भावना मावकर विषद करतात. समाधान नेमकं कशात? सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण समाधानाच्या शोधात धावतो आहे. पण ते सहजासहजी मिळत नाही. विलास यांची विचारसरणी याविषयी बरेच काही शिकवते. शेतात हे कर, ते कर अशी सतत धावाधाव करीत राहण्यापेक्षा भांडवली खर्चावर नियंत्रण ठेवणारी शेती मी निवडली आहे. कर्ज काढून व्याज भरत राहण्यापेक्षा साधं जीवन चांगलं. कसलं व्यसन नाही. चोवीस तास शेतीत असतो. राजकारण, गप्पा-टप्पा यात वेळ घालवत नाही. समस्या खूप आहेत. पण वृत्ती समाधानी ठेवली की जगणं सुलभ होतं असं ते म्हणतात. संपर्क- रामचंद्र मावकर- ९८२२७१२१५०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com