चॉकी संगोपनातून रेशीम शेतीत यशस्वी वाटचाल...

तुती लागवडीत कपिल सोनटक्के
तुती लागवडीत कपिल सोनटक्के

रेशीम शेतीमध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन भेंडेगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील तरुण शेतकरी कपिल सोनटक्के यांनी बाल्य रेशीम कीटक संगोपन गृह (चॅाकी रेअरिंग सेंटर) सुरू केले आहे. हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाल्य रेशीम कीटकांचा पुरवठा करून कोष उत्पादनाच्या तुलनेत चॉकी रेअरिंग सेंटर सुरू करून रेशीमशेती अधिक फायदेशीर केली आहे. याशिवाय जोखीम कमी झाल्यामुळे कमी वेळेत कोष उत्पादन मिळत असल्याने नवरेशीम उत्पादकांचाही फायदा होत आहे.   हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पारंपरिक शेती पद्धतीतून उत्पादन तसेच बाजारभावातील घसरणीमुळे उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल शेतीपूरक आणि महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वाढला आहे, त्यामुळे जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार होऊ लागला आहे. भेंडेगाव येथील तरुण शेतकरी कपिल शंकरराव सोनटक्के यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. त्यांचे पाच सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. सोनटक्के कुटुंबीयांची भेंडेगाव शिवारात २२ एकर जमीन आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची संपूर्ण शेती जिरायती होती. त्या वेळी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भात आदी पिके घेतली जात असत.

कपिल यांनी २००६ मध्ये शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर सिंचनाची सोय केली. सध्या त्यांच्याकडे २ विहिरी, २ कूपनलिका आहेत. गतवर्षी एक कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेच्या शेततळ्याची उभारणी केली आहे. एका विहिरीवर सौरपंप बसविण्यात आला आहे, त्यामुळे विजेच्या भारनियमनातही सिंचनासाठी अडथळे येत नाहीत. सिंचनाची सोय झाल्यामुळे ऊस, हळद, गहू आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तर २ एकरांवर आंबा, पेरु, सीताफळ या फळझाडांची लागवड केली आहे. रेशीम शेतीला सुरुवात.... उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून दर महिन्याला शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती व्यवसायाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रेशीम शेती करण्याचे निश्चित केले. जिल्हा रेशीम विकास कार्यालयातर्फे तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये सोनटक्के यांनी रेशीम शेतीचे १० दिवसांचे प्रशिक्षण घेतले. सन २०१५-१६ मध्ये दोन एकरांवर तुतीच्या व्ही १ वाणाची लागवड केली. शेतात रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी करून कोष उत्पादन सुरू केले. पहिले दीड वर्ष १५० अंडीपुंजांच्या ५ बॅचचे प्रत्येकी एक क्विंटलपर्यंत कोष उत्पादन घेतले. कर्नाटकातील बेंगलोरजवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये कोषाला सरासरी प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाला. चॅाकी रेअरिंग सेंटर  हिंगोली जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार होत आहे. दरवर्षी रेशीम शेतीमध्ये उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेक नवीन शेतकऱ्यांना रेशीम कीटकांच्या पहिल्या दोन अवस्थांमधील संगोपन व्यवस्थितरीत्या करता येत नाही. परिणामी कोष उत्पादन कमी मिळते, त्यामुळे नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सोनटक्के यांनी स्वतःचे कोष उत्पादन बंद करून बाल्य रेशीम कीटक संगोपन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने केंद्रीय रेशीम बोर्ड अंतर्गत म्हैसूर येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये तीन महिने बाल्य रेशीम कीटक संगोपन केंद्रविषयक प्रशिक्षण पूर्ण केले आणि २०१६-१७ मध्ये शेतामध्ये चॅाकी रेअरिंग सेंटर सुरू केले. बांधले पक्के संगोपनगृह बाल्य रेशीम कीटक संगोपनगृहाचे तापमान २१ ते २८ अंश सेल्सिअस, तर आर्द्रता ६० ते ९० टक्के राखणे आवश्यक असते, त्यासाठी शेतात विटा, सिमेंटचे पक्के बांधकाम करून त्यावर टिन पत्र्याचे छत असलेल्या ३० बाय ६० फूट आकाराच्या संगोपनगृहाची उभारणी केली. तापमानाची नोंद घेण्यासाठी थर्मामीटर बसविण्यात आले आहे. निवाऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पाइपचे कप्पे असलेले रॅक तयार केले. रॅकमध्ये प्लॅस्टिकचे ट्रे ठेवून अंडीपुंज उबवीत बाल्य रेशीम कीटकांची वाढ केली जाते. बाल्य कीटकांना तुतीची पाने बारीक करून द्यावी लागतात, त्यासाठी संगोपनगृहामध्ये पाने कापणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या संगोपनगृहाची एकावेळी १० हजार अंडीपुंज उबविण्याची क्षमता आहे. तीन जिल्ह्यांमध्ये चॉकीचा पुरवठा सुरुवातीला वसमत तालुक्यातील, तसेच हिंगोली जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाल्य रेशीम कीटकांचा पुरवठा करत असत. परंतु चॉकी रेअरिंग सेंटर नसल्यामुळे परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकरीदेखील सोनटक्के यांच्याकडे चॉकीची मागणी करतात. सध्या हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे, सिंदगी, कोठारी, कुरुंदवाडी, आंबा, परभणी जिल्ह्यातील चुडावा, शिर्शी, लोहिग्राम आदी गावांसह ३५ ते ४० गावांतील रेशीम उत्पादकांना बाल्य रेशीम कीटकांचा पुरवठा करतात. वर्षातील जून ते मार्च या कालावधीत बाल्य कीटकांचे संगोपन केले जाते. दर आठ दिवसाला पाच हजार अंडीपुंजापासून दोन अवस्थेतील बाल्य रेशीम कीटकांची निर्मिती केली जाते. चॅाकीची १०० अंडीपुंजाला २ हजार २०० रुपये दराने विक्री केली जाते. त्यातून संगोपन खर्च, वाहतूक आदी बाबींवरील खर्च वजा जाता महिन्याकाठी ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. बाल्य अवस्थेतील रेशीम कीटकांसाठी शेतकऱ्यांना काही दिवस आधी मागणी करावी लागते. त्यानंतर ठरलेल्या दिवशी सोनटक्के संबंधित शेतकऱ्यांना बाल्य अवस्थेतील रेशीम कीटक उपलब्ध करून देतात. यामुळे नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अंडीपुंज उबवून कोष उत्पादन घेण्यापेक्षा कमी वेळेत दर्जेदार कोष उत्पादन घेता येऊ लागले आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून चॅाकीची मागणी वाढत आहे. तुतीच्या विविध वाणांची लागवड बाल्य अवस्था कीटक संगोपनगृह सुरू केल्यानंतर सोनटक्के यांनी तुतीच्या क्षेत्राचा ८ एकरपर्यंत विस्तार केला. तुतीच्या व्ही १ वाणासोबतच जी २, एच ३६, जी ४ या वाणांची लागवड केली. तुतीच्या इतर वाणांपेक्षा व्ही १ वाण सरस असल्याचा सोनटक्के यांचा अनुभव आहे. बाल्य रेशीम कीटक संगोपनगृह सुरू केल्यापासून तुतीसाठी रासायनिक खतांचा वापर बंद केला. शेणखताचा वापर सुरू केला. घरची बैलजोडी आणि गायीचे शेणखत दर तीन महिन्यांनी तुतीला दिले जाते. कुटुंबीयांचे सहकार्य सोनटक्के यांच्या कुटुंबात ५ सदस्य आहेत. तुतीची मशागत, पाने तोडणे, कीटकांना खाद्य देणे, स्वच्छता राखणे आदी कामांसाठी पत्नी सुषमा, भाचा शिवप्रसाद माळवटकर, चुलत भाऊ बालाजी सोनटक्के मदत करतात. तुतीची पाने तोडण्यासाठी गरजेनुसार मजूर लावावे लागतात. त्याना जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, पर्यवेक्षक गोविंद वडवळे यांचे मार्गदर्शन मिळते. ‘अॅग्रोवन’ बनला मार्गदर्शक सोनटक्के यांनी शेती व्यवसायात पदार्पण केल्यानंतर २००६ पासून ते ‘अॅग्रोवन’चे वाचक आहेत. अॅग्रोवनमधील शेतकऱ्यांच्या यशोगाथांतून प्रेरणा घेत सोनटक्के यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारला. हवामान, बाजारपेठ, पीक लागवड तंत्रज्ञानाबात, तसेच रेशीम शेतीविषयक तांत्रिक माहिती मिळते. आजवरच्या वाटचालीमध्ये मार्गदर्शक म्हणून अॅग्रोवनची मोलाची मदत अजूनही होत आहे, असे सोनटक्के सांगतात.   संपर्क ः कपिल सोनटक्के ः ९८५०३९३८३६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com