‘अकोले’च्या भातशेतीत रुजतेय सुधारित ‘एसआरटी’ तंत्र

एसआरटी पद्धतीनुसार लागवड केलेले भातपीक दाखविताना कोदणी (ता. अकोले) येथील शेतकरी.
एसआरटी पद्धतीनुसार लागवड केलेले भातपीक दाखविताना कोदणी (ता. अकोले) येथील शेतकरी.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे सत्तर शेतकऱ्यांनी मागील वर्षापासून, तर यंदा तीस अशा एकूण १०० शेतकऱ्यांनी सगुणा भात तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. खर्च, मजुरी, पैसे, बियाणे यात बचत करून एकरी उत्पादनवाढीचे उद्दिष्ट त्यात आहे. पूर्वी एकरी १२ क्विंटलच्या दरम्यान असलेले उत्पादन आता एकरी १६ क्विंटलपर्यंत पोचले आहे. बायफ संस्थेने या प्रयोगासाठी तंत्रज्ञान व मार्गदर्शन पुरवले आहे. 

नगर जिल्ह्यात अकोले हा सर्वात निसर्गरम्य व आदिवासी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका आहे. पाऊस सर्वाधिक असल्याने भात हे तालुक्यातील प्रमुख पीक आहे. रोपे तयार करण्यापासून चिखलणी, लागवड, आवणी आदींसह भातशेतीची कामे कष्टाची, खर्चिक आहेत. त्यामुळे येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीपेक्षा सुधारित तंत्राचा वापर करू लागला आहे. त्यासाठी बायफ संस्थेची त्यांना मदत होत आहे. संस्थेचे विभागीय कार्यक्रम अधिकारी जितीन साठे यांच्या मार्गदर्शनातून मागील वर्षापासून सगुणा भात तंत्रज्ञान (एसआरटी) उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी ७० शेतकरी यात सहभागी झाले होते. यंदा त्यात तीस शेतकऱ्यांची भर पडली आहे. प्रत्येकी क्षेत्र सुमारे २० गुंठे आहे.  प्रकल्पाची अंमलबजावणी खरिपात भातलागवडीला वेग येतो, त्या वेळी सर्वच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. कामांसाठी मजूर मिळणे अवघड होते. तालुक्यातील पेंडशेत या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील काशिनाथ चेंडू खोले सहा वर्षांपासून एसआरटी पद्धतीने शेती करून भाताचे उत्पादन वाढवले आहे. याच आदर्शातून बायफनेदेखील या तंत्राला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. कोदणी, मान्हेरे, वाकी, आंबेवंगण, देवगाव, शिवाजीनगर, पाचपट्टा आदी गावांतील शेतकऱ्यांशी चर्चा केली. सुमारे ७० शेतकऱ्यांची निवड केली. तीस शेतकऱ्यांना या तंत्राचे प्रणेते व प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे (कर्जत, जि. रायगड) यांच्याकडे प्रशिक्षण दिले.  श्रम, खर्चात बचत  पारंपरिक पद्धतीत रोपेनिर्मितीपासून चिखलणी, लागवड, आवणी व अन्य कामांसाठी एकरी किमान चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च यायचा. आठ ते दहा लोकांना तीन दिवसांचा अवधीही जायचा. सगळ्यांची कामे एकाच वेळी येत असल्याने मजूरही मिळत नसत. एसआरटी तंत्राचा अवलंब सुरू केल्यापासून श्रम, वेळ, खर्चात बचत झाली आहे. पारंपरिक पद्धतीत लागवडीसाठी एकरी साधारण तीस ते पस्तीस किलो बियाणे लागायचे. आता ते अवघे १० ते १४ किलोपर्यंत लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय लागवडीसाठी गादी वाफ्यांचा वापर होऊ लागला आहे. दोन व्यक्ती एका दिवसांत कमी कालावधीत लागवड करू शकत आहेत. शिवाय या तंत्राद्वारे रोपांची वाढ एकसारखी होते. मरतुकीचे प्रमाण कमी होते. पारंपरिक पद्धतीत जिथे एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळायचे. तेथे आता एकरी चार ते पाच क्विंटलची वाढ होऊन ते १६ ते १८ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. पारंपरिक शेतीतील त्रुटी  उन्हाळ्यात झाडाच्या फांद्या तोडून त्या जाळून रोप टाकण्यासाठी जमीन भाजावी लागायची. रोपे एकवीस दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड करावी लागायची. खेकड्यांच्या त्रासाने रोपे खराब व्हायची. जास्त पाऊस झाल्यास रोपे सडून जायची. लागवडीवेळी शेताची चिखलणी करावी लागते. जमिनीतील कर्ब वाहून जातो. एकरी बियाणे दरही जास्त आहे. दोन रोपांतील अंतर काही वेळा निश्‍चित नसते. अंदाजे लागवड असते. त्यामुळे फवारणीत अडथळे येऊ शकतात. सुधारित तंत्रात या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.  तंत्रसुविधा 

  •  तालुक्यातील सात गावांतील शेतकऱ्यांत होतोय तंत्रज्ञानाचा वापर. 
  •  सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन घेण्यावर तालुक्यात भर असतो. त्या अनुषंगाने भात उत्पादकांना निमपेंडीच्या प्रत्येकी दोन बॅगा देण्यात आल्या. शिवाय यापूर्वीच गांडूळ खत तयार करण्यासाठीचे प्रकल्प उभारणीसाठीही मदत केली आहे. अनेक शेतकरी वर्षभरात साधारण सहा टन गांडूळ खत तयार करतात. 
  •  १०० बाय ७५ रुंद सेंटिमीटर आकाराचे लोखंडी यंत्र. त्याद्वारे टोकणीसाठी छिद्रे पाडली जातात.
  •  जमीन भाजण्याची, रोपे टाकण्याची गरज नाही. गादीवाफ्यावर बियाण्याची टोकण.
  •  गादीवाफा असल्याने पाणी धरून राहण्यास मदत.
  •  दोन ओळी व रोपांतील अंतर २५ सेंमी तर दोन वाफ्यातील अंतर शंभर सें.मी. दोन वाफ्यात दीड फुटाचा थोडासा खोलगट चर. जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर त्वरीत टोकण.
  •  शेण, गोमूत्र, बेसन पीठ आणि गुळावर आधारित जीवामृताचा वापर.
  •  मातीतील कर्ब, लाभदायक जिवाणूंच्या संख्येत वाढ.
  •  सर्व बाबींचा काटेकोर वापर. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेत वाढ.
  •  भात पिकानंतर तयार बेडवर भाजीपाला, गहू उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन. 
  • खर्चात बचत होऊन उत्पादन वाढले

    आम्ही पारंपरिक पद्धतीने भाताचे उत्पादन घेत होतो. दोन वर्षांपासून एसआरटी पद्धतीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढले आहे. अकोले तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे.   - किसन सोमा बामदरे, ९९२१५९६९९८ (कोदणी, ता.  अकोले)

    भात उत्पादनात वाढ

    अकोले हा भाताचा पट्टा आहे. या भागातील शेतकरी काळमेघ, आंबेमोहोर, कोळपा आदी पारंपरिक जातींचा वापर करतात. भातशेती ही अतीव कष्टाची आहे. भाताच्या एकरी उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ झाली तरी या शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणारा तो दिलासा असेल. पुढील वर्षी पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असावा यासाठी नियोजन करत आहोत. भाताच्या जुन्या जातींना दरही चांगले म्हणजे किलोला ६० ते ६५ रुपयांप्रमाणे मिळतात. स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून  येथील तांदळाच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.    - जितीन साठे, ९४२३०२०१३६,( कार्यक्रम अधिकारी, बायफ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com