शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठ

पुणे व नगर जिल्ह्यातील शेतकरी शिरूर येथे पोत्यात भरून मूग विक्रीसाठी आणतात. पावसाळ्यात शेतमाल भिजू नये म्हणून बाजार समितीने उभारलेले शेड.
पुणे व नगर जिल्ह्यातील शेतकरी शिरूर येथे पोत्यात भरून मूग विक्रीसाठी आणतात. पावसाळ्यात शेतमाल भिजू नये म्हणून बाजार समितीने उभारलेले शेड.

पुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासह शेजारील नगर जिल्ह्यातील शेतकरीही येथील बाजारपेठेत मूग घेऊन येतात. पाऊसमान योग्य असल्यास कमी कालावधीत, कमी पाण्यात व कमी खर्चात हे पीक शेतकऱ्यांना आशादायी उत्पन्न देऊन जाते. यंदा दुष्काळाच्या तीव्र समस्येत येथील बाजारात मुगाच्या आवकेत मोठी घट झाली. मात्र दरात चांगलीच वाढ झाली. साहजिकच प्रतिकूलतेत शेतकऱ्यांना हे पीक निश्‍चित दिलासा देऊन गेले. यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर, पुणे सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा या भागातील शेतकरी कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळत आहेत. परंतु काही पिके अशी असतात की प्रत्येक हंगामात ती काही प्रमाणात का होईना घेण्याकडे शेतकऱ्याचा कल असतोच. मूग हे त्यातीलच महत्त्वाचे पीक. हंगाम चांगला साधला तर तुलनेने कमी कालावधीत हे पीक शेतकऱ्याला बरे उत्पन्न देऊन जाते. शिवाय घरच्यापुरते धान्य होते ते वेगळेच. शिरूर तालुक्यातील हक्काचे पीक मूग पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मूग हे हक्काचे नगदी पीक आहे. शिरूर येथे त्यासाठी बाजार समितीचा आधारही आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अनेकांनी मुगाची पेरणी केली. जिल्ह्यात या पिकाखाली सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पैकी चालू वर्षी जिल्ह्यात आठ हजार ४४० हेक्टरवर तर शिरूर तालुक्यात सर्वाधिक सहा हजार ४३० हेक्टरवर पेरणी झाली. परंतु त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी शिरूर बाजार समितीत देखील दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवकेत घट होऊन दरांमध्ये मात्र चांगलीच वाढ झाल्याचे दिसले. त्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी यंदा हे पीक आशावादी ठरल्याचे बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले, उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी सांगितले. साडेपाचशे क्विंटल आवक मागील काही दिवसांचा विचार केल्यास चालू वर्षातील आवक अवघी ५५० क्विंटलपर्यंत झाली होती. तर क्विटंलला पाच ते सहा हजार रुपयांचा दर मिळाला होता. सध्या आवक नसल्याने मुगाची बाजारपेठ ठप्प आहे. एखाद्याने विक्रीसाठी माल आणल्यास त्यालाही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या भागातून होतेय आवक बाजार समिती जवळ असल्याचा फायदा अनेक शेतकरी घेतात. शिरूर परिसरातील करर्डे, आंबळे, निमोणे, कान्हूर येमाई, न्हावरे, निर्वी, ऊरळगाव या गावांचा समावेश होतो. तर पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, पळवे, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील दैवदैठण, बेलवंडी, गव्हाणवाडी या गाव परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात दरवर्षी मूग पेरतात.

कमी कालावधीचे किफायतशीर पीक मुगासाठी शेतकरी मे महिन्यात तयारी करतात. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वेळेवर पाऊस झाल्यास पेरणी होते. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडील किंवा कंपन्याकडील बियाणांचा वापर होतो. काही शेतकरी मूग हे आंतरपीक म्हणूनही घेतात. बदलत्या हवामानात आणि पाणीटंचाईच्या काळात उशिराने पाऊस झाल्यास काही शेतकरी ३० जूनपर्यंत पेरणी आटोपतात. अत्यंत कमी कालावधीतील पीक असल्याने शेतकऱ्यांना त्यानंतर कांदा, ज्वारी अशी पिके घेता येतात. मूग मार्केट (दृष्टिक्षेपात)

  • पुणे, नगर, जळगाव, दिल्ली, अकोला शहरातील ग्राहकांकडून चांगली मागणी
  • कमी पाण्यात, कमी कालावधीत येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती
  • शिरूर बाजार समितीत शिरूरसह पारनेर, श्रीगोंदा या भागातून पुरवठा
  • समितीमध्ये गेल्या वर्षी जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल
  • बाजार समितीचे उपक्रम

  • शेतकरी बाजार
  • शेतमाल तारण कर्ज योजना
  • शेतकऱ्यांसाठी कांदा व डाळिंब या पिकांवर प्रशिक्षण. त्याचबरोबर पॉलिहाउसमधील पीक व विक्री व्यवस्थापन विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
  • प्लॅस्टिक क्रेट अनुदान योजना
  • शासनामार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देणे.
  • शिरूर बाजार समितीविषयी शिरूर बाजार समिती १५ ऑक्टोबर १९५७ मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर हळूहळू विस्तार वाढवत बाजार समितीचे क्षेत्र जवळपास आठ एकरांवर पसरले आहे. सध्या बाजार समिती कार्यक्षेत्रात तालुक्यातील ९३ गावे आहेत. या गावांत उत्पादित शेतीमालासाठी ही हक्काची बाजारपेठ असली तरी बाहेरील तालुक्यांतूनही शेतमाल येथे येतो. मुगाव्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, मटकी, हुलगा, भुईमूग, गूळ, कापूस, उडीद, फळे आदींची आवकही येथे होते. त्यामुळे येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सुविधा बाजार समितीच्या आवारात पिण्याचे पाणी, कंपाउंड वॉल, बँक कम कॅन्टीन इमारत, जनावरांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, सुरक्षारक्षक, टेलिव्हिजन, टेलिफोन, बाजारभाव फलक, अद्ययावत सभागृह, शॉपिग सेंटर, सावलीसाठी झाडे, अंतर्गत रस्ते डांबरीकरण अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून भुसार माल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. माझ्याकडे गहू, बाजरी, ज्वारी, मूग या धान्याची परिसरातील तीन तालुक्यांतून आवक होते. यंदा मुगाची आवक कमी झाली असून दर वाढले होते. माझ्याकडे एकूण २५० ते ३०० क्विंटल आवक झाली. त्याला प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपयांपर्यत दर मिळाला. खरेदी मूग नगर, जळगाव, दिल्ली, अकोला येथे विक्रीसाठी पाठविला. सुनील बरमेचा, व्यापारी, बरमेचा ट्रेडिंग कंपनी, शिरूर जूनमध्ये वेळेवर पाऊस झाल्यास बाजार समितीत सर्वाधिक आवक होते. यंदा माझ्याकडे एकूण १०० क्विंटल आवक झाली होती. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मूग गुजरात, मुंबई, जळगाव येथे विक्रीसाठी पाठविला. संतोश भंडारी, व्यापारी माझी वीस एकर शेती आहे. दरवर्षी मुगाची पेरणी करतो. परंतु चालू वर्षी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे हे पीक साधले नाही. त्याऐवजी कांदा आणि उसाची निवड केली. मात्र दरवर्षीचा अनुभव सांगायचा तर जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यास हे पीक चांगले उत्पन्न देऊन जाते, असा अनुभव आहे. भाऊसाहेब दवेकर - ९५४५९५२८९४, मसा, श्रीगोंदा बाजार समितीत विविध प्रकारच्या शेतमालाची आवक होते. यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट होऊन जवळपास सर्वच मालांच्या दरात वाढ झाली. शशिकांत दसगुडे - ९८२२२५७५४४ सभापती, शिरूर बाजार समिती शेतकरी सांगतात की पेरणीसाठी सुमारे एकरी पाच ते सात किलो बियाणे लागते. तीन महिन्यांच्या कालावधीत एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. सरासरी ४००० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यास उत्पादन खर्च वजा जाता ३० ते ४५ हजार रुपयांपर्यत उत्पन्न मिळू शकते. अर्थात दरांच्या चढउतारावरच अर्थकारण महत्त्वाचे ठरते, असे श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यातील यवती येथील मूग उत्पादक जयवंत तुकाराम आढाव यांनी सांगितले. जयवंत आढाव- ७०३८६५०१६५ शिरूर बाजार समिती- मूग मार्केट

    वर्ष आवक (क्विंटल) सरासरी दर उलाढाल (रुपये)
    २०१४ ११५ ५९५१ ६ लाख ५४ हजार ८६
    २०१५ २०२२ ६००१ १ कोटी ४१ लाख ७० हजार १७६
    २०१६ २६६९ ५२६५ १ कोटी ३७ लाख ७५ हजार ६२८
    २०१७ ५००८ ४००० २ कोटी २ लाख ६१ हजार ५०२
    २०१८ (यंदा) ५५० ५५०० ३० लाख २५ हजार रुपये 

    अनिल ढोकले, ९९२१२२४४९०, सचिव, शिरूर बाजार समिती

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com