..तो धावतोय म्हणून चालतेय कुटुंब ! 

राष्ट्रीय स्पर्धेत सुर्वण पदकाचा मानकरी किरण मात्रे.
राष्ट्रीय स्पर्धेत सुर्वण पदकाचा मानकरी किरण मात्रे.

स्पर्धेतील धावणे आपल्यासाठी क्रीडा प्रकार असू शकेल, पण त्रिधारावाडीच्या दोघा भावंडांकरिता या धावण्याने जीवनाच्या स्पर्धेत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात मदत झाली आहे. त्यांच्याकरिता धावण्याच्या शर्यतीतील जेतेपद जणू कुटुंबीयांच्या जगण्याचा आधार झाले आहे.  परभणी जिल्ह्यातील त्रिधारावाडी (उखळदवाडी) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील किरण आणि कांचन मात्रे ही भावंडे एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत असताना खचली नाहीत. सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्याची जिद्द ठेवून नव्या उमेदीने धावत आहेत. म्हणजे खरोखरच त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यांच्याकरिता धावण्याच्या शर्यतीतील जेतेपद जणू कुटुंबीयांच्या जगण्याचा आधार झाले आहे. ही भावंडे धावतात म्हणून त्यांचे कुटुंब चालते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बक्षिसांच्या रकमेतून किरणने भावाला दुग्धव्यवसायासाठी मदत केली, त्यामुळे मात्रे कुटूंबाला दररोजच्या उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला आहे. मात्रे कुटूंबाच्यादृष्टीने तो भविष्यातील आशेचा किरण ठरला आहे. 

त्रिधारावाडी येथील माणिकराव मात्रे यांना दोन मुले मोठा पांडुरंग आणि धाकटा चांगुजी. कुटुंबाला पाच एकर कोरडवाहू जमिन आहे. पाच एकरचे तीन ठिकाणी तुकडे आहेत. कोरडवाहू शेतीतून सोयाबीन, हरभरा या पिकाच्या उत्पादनातून खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. पांडुरंग मात्रे तसेच कुटुंबातील व्यक्ती शेतात राबत असत. परंतु गेल्या वर्षातील दुष्काळामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहा एवढेही उत्पन्न मिळायचे नाही. पिकावर घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे तर दूरच. सततच्या नापिकीमुळे आणि

कर्जफेडीमुळे चिंतित होऊन पांडुरंग मात्रे यांनी टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविली. पतीच्या अकाली जाण्यामुळे खचलेल्या पत्नी शोभा मात्रे यांचे देखील निधन झाले. यामुळे कृष्णा, किरण, कांचन ही भावंडे पोरकी झाली. पाठीराखा भाऊ गेल्यामुळे चांगोजी मात्रे यांच्या मनावर परिणाम झाला.  एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत असताना माणिकराव आणि त्यांच्या पत्नी शशिकला यांच्यावर नातवंडाच्या सांभाळायची जबाबदारी येऊन पडली.

पांडुरंग यांनी आत्महत्या केली त्या वेळी मोठा मुलगा कृष्णा दुस-या, किरण पहिल्या इयत्तेत तर कांचन बालवाडीत होती. आई वडिलांच्या निधनामुळे पोरक्या झालेल्या भाच्यांना सावंगी खुर्द येथे नेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले. परंतु तेथे चौथी पर्यंतच शिक्षण  असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी परत त्रिधारावाडी येथे यावे लागले. गावी परत आल्यानंतर एका शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. तेथील क्रीडा शिक्षक रणजित काकडे यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे कृष्णा, किरण, कांचन भावंडांना खेळाची गोडी लागली. त्यातही धावणे या बिगर खर्चीक क्रीडा प्रकारात या तीनही भावंडांनी लक्ष केंद्रित केले. काकडे यांनी कृष्णा, किरण, कांचन या भावंडांना धावण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी परभणी येथील प्रशिक्षक रवि रासकटला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ही भावंडे २०१७ मध्ये परभणी येथे भाड्याची खोली करून त्यांच्या आजी सोबत राहू लागली. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सकाळी आणि संध्याकाळी धावण्याचा सराव करायचा दिवसभर शाळा, अभ्यास करायचा असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. तीनही भावंडांपैकी किरण याने दहावीत असताना २०१७ मध्ये औरंगाबाद येथे आयोजित मॅरेथॅान स्पर्धेत १७ वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला तीन हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. किरणच्या यशाचा आजी-आजोबा तसेच भावंडे, नातेवाइकांना खूप आनंद झाला. त्या वेळी माणिकराव मात्रे हे शेती करून नातवंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडत असतांनाच दुसरीकडे धाकटा मुलगा चांगोजी यांच्या उपचारावर खर्च करत होते. शेतीतील नापिकी कायम होती. त्यामुळे माणिकराव मात्रे यांनी देखील मोठा मुलगा पांडुरंग यांचा मार्ग अनुसरला आणि आपली जीवनयात्रा संपवली. माणिकरावाच्या निधनामुळे मात्रे कुटुंबांवर मोठा आघात झाला. या घटनेनंतर कृष्णा, किरण, कांचन या भावंडांनी धावण्याचा सराव काही महिने बंद केला. दहावीनंतर कृष्णा याने शिक्षण सोडून दिले. अर्धालीने शेळीपालन आणि घरची शेती करू लागला. किरणही शेतातील कामे करू लागला. परंतु प्रशिक्षक रवि रासकटला यांनी भविष्यातील संधी बद्दल समजावून सांगितल्यानंतर किरण आणि कांचन यांनी मात्र परभणी येथे राहून पुन्हा नव्या उमेदीने धावण्याचा सराव सुरू केला.  आजोबाच्या निधनानंतर आजी गावाकडे रहावयास गेली. सध्या किरण आणि कांचन यांच्यासोबत त्यांची एक चुलत बहीण परभणी येथे राहतात. दहावीच्या परीक्षेत किरण ने ७५ टक्के गुण मिळविले. सध्या तो पिंगळी येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ वी (विज्ञान) मध्ये शिक्षण घेत आहे. किरणची बहीण कांचन मात्रे हिने देखील अनेक स्पर्धेत बाजी मारली आहे. सध्या ती अशक्तापणामुळे स्पर्धेत भाग घेत नसली तरी तिचा सराव सुरू आहे. 

आर्थिक पाठबळ हवे....  पाच एकर शेतीतून कुटुंबांतील पाच सदस्याची उपजीविका शक्य नाही. यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. मात्रे कुटुंबाला अजूनही अन्नधान्य विकत घ्यावे लागते. चांगोजी तसेच शशीकलाबाई यांच्या आजारावरील उपचारासाठी खर्च लागत आहे. प्रशिक्षक रवि रासकटला हे मात्रे भावंडाना मोफत प्रशिक्षण देत आहेत. किरणला मिळत असलेल्या बक्षिसाच्या रकमेमुळे कुटुंबाचा गाडा पुढे रेटला जात आहे. 

सकाळच्या पाठपुराव्यामुळे मदत...  प्रतिकुल परिस्थितीवर मात करत किरण यश मिळवत आहे. परंतु मात्रे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या मदतीसाठी सकाळ मधून आवाहन करण्यात आल्यानंतर जिल्हा बॅटमिंटन संघटनेचे सचिव रवींद्र पतंगे आणि विष्णू शहाणे या दोघांनी मिळून किरणला दर महिन्याला अडीच हजार रुपये मदत देण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्याला आणखीन मदतीची गरज आहे.  बक्षिसाच्या रकमेतून  म्हैस खरेदीसाठी मदत...  किरणचा भाऊ कृष्णा शेती करतो. ते शेळीपालन करतात. दरम्यानच्या काळात जवळच्या नातेवाइकांनी त्यांना म्हैस घेऊन दिली होती. त्यामुळे दुग्धव्यवसायावर भर देण्याचे त्याने ठरविले शेळ्यांच्या विक्रीतून ४० हजार रुपये भांडवल जमा झाले त्यात किरण ३० हजार रुपयाची भर टाकली. त्यामुळे ७० हजार रुपयाची दुभती म्हैस खरेदी केली. दररोजचे आठ ते दहा लीटर दूध निघते. परभणी येथील शासकीय दुग्धशाळेत ते घातले जाते. दुग्धव्यवसायामुळे मात्रे कुटुंबीयांना उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे.  विविध स्पर्धांतील यशामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. २०२४ च्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  - किरण मात्रे 

किरण कमी वयात प्रगल्भ झाला आहे. त्याने स्वतः ची जबाबदारी ओळखली आहे. त्यामुळेच कुटुंबाला त्याचा आधार झाला आहे. परंतु जागतिक स्पर्धेच्या  तयारीसाठी त्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.  - रवि रासकटला, प्रशिक्षक किरणने जिंकलेल्या स्पर्धा..... 

  • औरंगाबाद, पुणे, हैदराबाद या ठिकाणासह देशभरातील विविध मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केले आहे. 
  • सुमारे २५ ते ३० स्पर्धेत तो पहिल्या क्रमांकावर राहिला. 
  •  हैद्राबाद येथील मॅरेथॉन मध्ये खुल्या गटातून त्याने १० किलोमीटरचे आंतर ३१ मिनिटे २२ सेंकदात पार करत प्रथम क्रमांक मिळवला 
  • आजवरचे सर्वाधिक म्हणजे ४० हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. 
  • नुकत्याच पार पडलेल्या पुणे मॅरेथॉन स्पर्धेत किरण तृतीय क्रमांकावर राहिला. 
  • किरणच्या यशातील सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे ११ आणि १२ वीला असताना अनुक्रमे २०१८ आणि २०१९ अशी सलग दोन वर्षे त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत (क्राॅस कंट्री) सुवर्ण पदक पटकावले आहे. 
  • यंदाच्या क्रॉस कंट्री स्पर्धेत किरणने स्वतःच गतवर्षीचा विक्रम ५० सेंकदांनी मोडला. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com