उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादनासह चॉकी सेंटर, तुती रोपनिर्मिती

पांडुरंग गिऱ्हे रेशीम व्यवसायात आता मास्टर झाले आहेत.
पांडुरंग गिऱ्हे रेशीम व्यवसायात आता मास्टर झाले आहेत.

शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती लागवड करून रेशीम कोष निर्मिती हाच मुख्य व्यवसाय आलेगाव (जि. अकोला) येथील पांडुरंग गिऱ्हे यशस्वीपणे जोपासत आहेत. पूर्वी ट्रॅक्टरचालक असलेल्या पांडुरंग यांनी जिद्द व मेहनत यांच्या बळावर चॉकी सेंटर, वर्षाला तुती रोपांची विक्री याद्वारे उत्पन्नाच्या वाटा विस्तारल्या आहेत. त्याच बळावर आर्थिक, कौटुंबिक जीवनमान उंचावले आहे. अकोला जिल्ह्यातील आलेगाव हा सोयाबीनचा पट्टा. या गावाची ओळख आता रेशीम व्यवसायात झाली आहे. गावातील पांडुरंग गिऱ्हे हे पट्टीचे रेशीम उत्पादक म्हणून ओळखले जातात. पण इथपर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रवास अत्यंत मेहनतीचा झाला आहे. सन २०११ पर्यंत ते अन्यत्र ट्रॅक्टरचे चालक म्हणून काम करायचे. अर्थात त्याला कारणही तसेच होते. घरची चार एकर शेती होती. पण कोरडवाहू असल्याने त्यातून हाती काहीच लागायचे नाही. साहजिकच आई-वडील देखील दुसऱ्यांकडे मजुरी करायचे. रेशीम शेतीची सुरुवात आर्थिक क्षमता वाढवण्याच्या हेतूने पांडुरंग यांनी प्रयत्न सुरू केले. अभ्यास, शोध व चर्चा यातून रेशीम शेतीचा मार्ग गवसला. सन २०११ मध्ये प्रयोग म्हणून एक एकरात तुतीची लागवड केली. हळूहळू या शेतीचा अनुभव येऊ लागला. कोषांचे उत्पादन, दरांचे गणित जमू लागले. आत्मविश्‍वास आल्यानंतर आज पांडुरंग यांनी आपल्या चार एकरांपैकी साडेतीन एकरांत तुतीची लागवड केलीआहे. एकवेळ मजुरीला जाणाऱ्या या कुटुंबाने आपल्या शेतीत मजूर तैनात केले आहेत. व्यवसायाची वाढ

  • रेशीम कोष निर्मितीसाठी लागणारे शेड ५० बाय ४० फूट असे उभारले. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला.
  • शासनाकडून शेडसाठी एक लाख रुपये अनुदान मिळाले. शिवाय तुती लागवडीसाठी १२ हजार रुपये, साहित्यासाठी आठ हजार रुपये मदत मिळाली.
  • सध्या वर्षभरात सात बॅच पूर्ण होतात. एप्रिल ते जून या काळात व्यवसाय बंद असतो.
  • प्रति बॅच ३०० अंडीपुंजांची असते. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ९० किलो उत्पादन मिळते.
  • रामनगर (कर्नाटक) व जालना येथे बाजारपेठ.
  • प्रति किलो ३०० रुपयांपासून त्यापुढे कोषांना दर.
  • पती-पत्नी दोघे मिळून व्यवसायात राबतात.
  • चॉकी सेंटरद्वारे उत्पन्नवाढ पांडुरंग यांनी कोष उत्पादनासोबत चॉकी सेंटरही सुरू केले आहे. त्याचे २० बाय २० फुटांचे शेड आहे. सेंटरमध्ये दहा दिवसांच्या काळात अळ्यांची बाल्यावस्था पूर्ण करून शेतकऱ्यांना दिली जाते. त्यासाठी कौशल्य आत्मसात करावे लागते. पांडुरंग यांनी हे कौशल्य व आवश्यक ज्ञान कमावले आहे. चॉकी उत्पादनाद्वारे उत्पन्नाचा स्रोत वाढला आहे. दक्ष व्यवस्थापन दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी सातत्य व स्वच्छता या दोन बाबी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पांडुरंग सांगतात. शेडमधील रॅकमध्ये अळ्यांना तुतीचा पाला खाऊ घालताना त्यांच्याकडे दैनंदिन लक्ष ठेवावे लागते. अळ्यांना अधिक व मोकळी हवा मिळण्यासाठी फेरपालट करावे लागते. यामुळे पोषक वातावरण मिळते. त्याचा परिणाम उत्पादन वाढीसाठी होतो. रेशीम उत्पादनासाठी गौरव पांडुरंग यांनी रेशीम शेतीत इतके झोकून दिले की सकाळपासून रात्रीपर्यंत ते त्यातच गुंतलेले असतात. सन २०१५ मध्ये प्रति १०० अंडीपुंजांपासून ९२ किलो रेशीम कोष उत्पादन त्यांनी घेतले. त्या वेळी केंद्रीय वस्त्र मंत्रालय आणि रेशीम मंडळाने उत्कृष्ट व्यवस्थापन व उत्पादनासाठी पुरस्कार देऊन म्हैसूर येथे त्यांचा गौरव केला होता. तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते पांडुरंग यांनी सन्मान स्वीकारला. रोपनिर्मितीतील मिळकतीचा हातभार आलेगाव भागात रेशीम कोष निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. अशावेळी नव्याने सुरुवात करणाऱ्यांना पांडुरंग संपूर्ण मार्गदर्शन करतात. त्यांना हव्या असलेल्या प्रत्येक बाबीसाठी सहकार्य करतात. शेतकऱ्यांना तुतीच्या रोपांची गरज भासू लागली, तेव्हा त्यांची गरज व उत्पन्न स्रोतात वाढ या हेतूने पांडुरंग यांनी तुती रोपनिर्मिती व विक्री व्यवसाय सुरू केला. साधारण एका वर्षात ५० हजार ते एक लाखापर्यंत रोपांची विक्री ते करतात. प्रति रोप तीन रुपये असा सध्याचा दर ते आकारतात. प्रसंगी गरजू शेतकऱ्याला अजून किफायतशीर दरांत रोपे देण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. गावाचे रेशीम क्षेत्र वाढले आलेगावातील पांडुरंग गिऱ्हे, मुरलीधर लाड असे अनेक शेतकरी रेशीम कोष निर्मितीतून चांगले उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक शेतीपेक्षा पूरक व्यवसायच त्यांचे अर्थकारण सक्षम करीत आहे. सद्यस्थितीत गाव परिसरात ७० एकरांवर तुतीचे क्षेत्र पोचले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पांडुरंग यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. रेशीम कार्यालयही या शेतकऱ्यांना पाठबळ देत आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर ते उत्कृष्ट रेशीम कोष निर्माता एकेकाळी ट्रॅक्टरचालक असलेल्या पांडुरंग यांनी आता आदर्श रेशीम उत्पादक म्हणून ओळख मिळवली आहेच. शिवाय नऊ वर्षांच्या या अनुभवात त्यांना याच व्यवसायाच्या आधारे विहिरीसाठी स्वतंत्र जागा घेता आली. तेथून पाइपलाइन करून शेतापर्यंत पाणी आणता आले. गावात दुमजली घर बांधता आलेच. शिवाय प्लॉटही खरेदी करता आला. दोन्ही मुलांना शिक्षण देता आले. एक पाऊल पुढे टाकून पांडुरंग यांनी रेशीम उत्पादकांचा गट तयार केला आहे. त्याद्वारे कोष विक्रीसाठी वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये जाणे त्यांना शक्य झाले आहे. पांडुरंग यांच्या रेशीम शेतीची वैशिष्ट्ये

  • एक एकरापासून सुरवात
  • सध्या साडेतीन एकरात तुती लागवड, ठिबकचा वापर
  • चॉकी सेंटर व तुती रोपनिर्मिती
  • नीटनेटकेपणा व स्वच्छतेवर जोर
  • नव्या शेतकऱ्यांना स्वयंस्फूर्तीने मार्गदर्शन
  • पांडुरंग वसंतराव गिऱ्हे - ९९७५६५१२७१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com