दुःखाची रेष पुसट करणारे ‘युवाराष्ट्र’

शेतकरी कुटुंबातील प्रतिभावान मुलीला शिक्षणासाठी मदत देताना.
शेतकरी कुटुंबातील प्रतिभावान मुलीला शिक्षणासाठी मदत देताना.

शेतकऱ्यांसाठी काम करणारे हात खूप कमी. अशाही परिस्थितीत काही तरुण अतिशय प्रामाणिकपणे शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कुटुंबाला आधार देण्याचे काम अकोला जिल्ह्यातील युवकांचे ‘युवाराष्ट्र’ नावाचे व्यासपीठ अविरत करीत आहे.   जगभरात शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश म्हणून विदर्भातील सहा जिल्ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. यातील एक अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. घरातील कर्तापुरुष गेल्यानंतर त्याचे कुटुंब सावरल्याची प्रकरणे बोटांवर मोजता येतील एवढीच आहेत. अशा परिस्थितीत या कुटुंबांना सहकार्याची नितांत गरज असते. अशाच गरजवंत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचे काम जिल्ह्यातील युवकांचे ‘युवाराष्ट्र’ नावाचे व्यासपीठ अविरत करीत आहे. ज्याला गरज असेल अशांना समाजाच्या विविध घटकांकडून मदत मिळवून देत किंवा वेळप्रसंगी स्वतःजवळील मदत करीत हे काम ते पुढे नेत आहेत. डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, विलास ताथोड या युवकांचे सकारात्मक पाऊल महत्त्वाचे ठरत आहे. संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबातील तरुण, महिलांना सोबत घेत रचनात्मक बदल घडविण्यासाठी ते काम करीत आहेत. ‘युवाराष्ट्र’ने आजपर्यंत सुमारे अडीचशेपेक्षा अधिक आत्महत्याग्रस्त तसेच दुर्धर आजाराने निधन झालेल्या शेतकरी कुटुंबांतील विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात कुणाला शिवणयंत्र, कुणाला शेळ्यांचा गट, जनरल स्टोअर्ससाठी साहित्य, कुणाला अगरबत्ती निर्मितीसाठी प्रशिक्षण, तर कुणाला खाणावळ चालविण्यासाठी साहित्य खरेदी करून दिले. या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील यासाठी आधार दिला. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, फवारणी साहित्य मिळवून दिले. कुठल्याही शासकीय अनुदानाचे पाठबळ त्यांनी घेतले नाही. अकोल्यात विविध रुग्णालयांत दाखल होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आली तर होईल तितकी मदत पोचविण्यासाठी डॉ. पाटील व त्यांचे सहकारी पुढाकार घेतात. ‘जेथे कमी तेथे आम्ही’ अशा पद्धतीचे काम ते पुढे नेत आहेत. ‘युवाराष्ट्र’चे पदाधिकारी शेतकरी निराधार कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणासाठीही सहकार्य करतात. आई-वडिलांच्या निधनानंतर निराधार झालेल्या अशाच एका मुलाला पॉलिटेक्निकपर्यंत शिक्षणासाठी मदत केली, त्याला खेड्यातून अकोल्यात आणत नामवंत कोचिंग क्लासमध्ये मोफत शिक्षण, राहण्याची- जेवणाची व्यवस्था करून दिली. गरजवंत शेतकरी कुटुंबातील मुलीला नर्सिंगच्या शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत केली. तत्पूर्वी डॉ. पाटील यांनी या मुलीला शैक्षणिक मदतीसाठी समाजातील दानशूरांना साद घातली. याला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण व नोकरीसाठी अकोला येथील डॉ. विनीत हिंगणकर यांनी आर्थिक पाठबळ दिले. ही मुलगी दोन महिन्यांपूर्वी नोकरीलासुद्धा लागली आहे. ‘युवाराष्ट्र’तर्फे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी १० शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमची उभारणी करण्यात आली. शेतकरीपुत्रांसाठी निःशुल्क अद्ययावत स्पर्धा परीक्षा साहित्य उभारण्यासाठी युवाराष्ट्र मदत करते आहे. एवढेच नव्हे, तर जवळपास ३५ प्रतिभावान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातील ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेली नाहीत. युवाराष्ट्रच्या कार्याला अनेकांचा हातभार  विविध राज्यांतील अनेक मोठ्या व नामवंत सामाजिक संस्थांचे प्रकल्प अहवाल, अंमलबजावणी, कृषी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास आदी क्षेत्रांतील अनेक सेवा प्रकल्पांमध्ये काम केलेल्या डॉ. नीलेश पाटील यांनी जून २०१३ मध्ये अकोल्यात युवाराष्ट्र या सामाजिक ग्रुपची सुरुवात केली. पुढे त्यात विलास ताथोड, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा यांच्यासह अनेक समविचारी, सहृदयी जुळत गेले. आज युवाराष्ट्रशी प्राध्यापक, डॉक्टर्स, शिक्षक, महसूल व कृषीसह विविध क्षेत्रांतील अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक जुळलेले आहेत. महावितरणची सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अकोला-वाशीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांसह इतर संस्था युवाराष्ट्रच्या सामाजिक कामांत भरीव योगदान देत असतात.   युवाराष्ट्रचे काम

  • आत्महत्याग्रस्त २५८ शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनास मदत
  • ग्रामीण भागात १० डिजिटल क्लासरूमची उभारणी
  • शेतकरीपुत्रांसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षा साहित्य
  • ग्रामीण भागातील सुमारे १० हजार महिलांची आरोग्य तपासणी
  • जिल्ह्यात शंभरावर गावांत युवकांसाठी प्रबोधन कार्यक्रम
  • गरजू शेतकरी कुटुंबातील प्रतिभावान मुलांच्या शिक्षणासाठी पालकत्व
  • गरजवंत शेतकरी कुटुंबांसाठी खारीचा वाटा म्हणून काम करीत आहोत. यासाठी अनेकांची मदत होत असते. हे काम खूप मोठे आहे. आव्हाने अनेक आहेत, तरीही जितके करता येईल तेवढे काम आम्ही पुढे नेत आहोत. - डॉ. नीलेश पाटील, युवाराष्ट्र, अकोला. मो. ७७२१८४१४८४ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com