मत्स्य, कुक्कुटपालनासह सुरू उसाचे एकरी १०६ टन उत्पादन

अजिंक्य ठाकूर
अजिंक्य ठाकूर

ठाकूर पिंपरी (ता. खेड, जि. पुणे) येथील अजिंक्य बाबाजी ठाकूर सुरू उसाचे एकरी १०६ टन उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत. फळबागांसोबतच ते ऊस शेतीमध्ये आंतरपिके घेतात. यासोबतच ते भात, बटाटे, मका, गहू, बाजरी, ज्वारी, भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. मत्स्य, कुक्कुटपालन या पूरक व्यवसायातून त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) त्यांची राज्यातील सुरू हंगामातील प्रथम क्रमांकाचे ऊस उत्पादक शेतकरी म्हणून निवड केली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा पश्चिम भाग काही प्रमाणात डोंगराळ असल्याने पाऊस चांगला पडतो. परंतु पावसाचे पाणी साठविण्यासाठी कोणतेही मोठे स्रोत नाहीत. त्यामुळे पाणी ओढ्याद्वारे भामा नदीला जाऊन मिळते. तरीही काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. पिंपरी ठाकूर हे साधारणपणे चार ते साडेचार हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील शेतकरी ऊस, कांदा, पालेभाज्या, फळभाज्या अशी विविध पिके घेतात. याच गावातील कैलास, बाबाजी, दत्तात्रेय वामनराव ठाकूर अशा तिघा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. यामध्ये बाबाजी यांना अजिंक्य आणि अक्षय अशी दोन मुले आहेत. दोघेही उच्चशिक्षित असूनही अजिंक्य हे शेती तर अक्षय व्यवसाय करतात. त्यांच्याकडे एकत्रित कुटुंबाची एकूण २८ एकर शेती आहे. यामध्ये ऊस, भात, बटाटे, मका, गहू, बाजरी, ज्वारी, भाजीपाला अशी पिके घेतली जातात. दोन एकरांवर आंबा, नारळ, लिंबू लागवड आहे. शेतात नवनवीन प्रयोग करून आणि पूरक व्यवसायातून त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत.  

ऊस शेतीचे नियोजन 

अजिंक्य ठाकूर दरवर्षी सुमारे २० एकरांवर सुरू उसाची लागवड करतात. खोडवा चांगला असेल तर चार ते पाच वेळा खोडव्याचे पीक घेतले जाते. मागील दोन वर्षी त्यांनी एकरी ६० ते ७५ टन उसाचे उत्पादन घेतले होते. को ८६०३२, को ८००५, को १०००१, को ९५०५२, को ०६७१ या जातीच्या उसाची निवड केली होती. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) त्यांची प्रथम क्रमांकाचे ऊस उत्पादक शेतकरी म्हणून निवड केली आहे. 

शेतातच बेणे प्लॉट 

दरवर्षी साधारणपणे एक एकरावर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊस बेण्याची लागवड केली जाते. पूर्व मशागत, खोल नांगरट, कुळवाच्या पाळ्या घालून शेत चांगले भुसभुशीत करून चार फूट रुंदीची सरी काढली जाते. त्यानंतर एक डोळा पद्धतीने लागवड केली जाते. त्यापूर्वी बीज प्रक्रिया केली जाते. नऊ ते दहा महिन्यात बेणे पुनर्लागवडीसाठी तयार होते.  

उसाची वेळेवर लागवड  

सुरू उसाची लागवड करताना सव्वा ते साडेचार फूट सरी काढली जाते. त्यापूर्वी चांगली पूर्वमशागत करून खते टाकून शेत तयार केले जाते. लागवडीसाठी एक किंवा दोन डोळे असलेले ऊस बेणे निवडले जाते. एक डोळा असेल तर दोन फूट अंतर, दोन डोळे असतील तर दीड फूट अंतर ठेवून लागवड केली जाते. त्यापूर्वी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली जाते. लागवडीपूर्वी खताचा प्राथमिक डोस दिला जातो. लागवड करून सुरुवातीला हलके पाणी देऊन ६५ दिवसांनी बाळबांधणी केली जाते. कोंब काढून त्यासोबत आलेले फुटवे ठेवून त्याचे संगोपन केले जाते. साधारणपणे ९० दिवसानंतर खताचा दुसरा डोस देऊन मोठी बांधणी केली जाते. जमीन उताराची असल्याने पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी ऊस लागवडीसाठी आडवी सरी काढली जाते

आंतरपिकांचा अवलंब

लागवडीनंतर पहिले तीन महिने उसामध्ये भेंडी, हरभरा ही आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे सुरू उसावर होणारा खर्च आंतरपिकातून निघून उसाचे निव्वळ उत्पादन हातात मिळते.   

पाचटाचा खत म्हणून उपयोग 

उसाची लागवड केल्यानंतर साधारणपणे बारा ते पंधरा कांड्या आल्यानंतर उसाचे पाचट काढून ते सरीत टाकले जाते. त्यामुळे कंपोस्ट खत म्हणून पाचटाचा चांगला वापर होत असून, वाढीच्या अवस्थेत चांगले प्रकारचे खत उसाला मिळते. ट्रॅक्टरच्या साह्याने मशागतीचे कामे केली जातात.

मत्स्य, कुक्कुटपालनाची जोड  

शेतातील पाचही शेततळ्यांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून रोहू, कटला या मत्स्यबीजाचे संगोपन केले जाते. सुमारे नऊ महिन्यांनंतर माशाचे उत्पादन सुरू होते. माशांची विक्री स्थानिक बाजारपेठेतील खेड, चाकण, पिंपरी-चिंचवड, तसेच पुण्यातील गणेश पेठ अशा विविध ठिकाणी केली जाते. याशिवाय हॉटेल व्यावसायिकांना मागणीप्रमाणे माशांचा पुरवठा केला जातो. वर्षाकाठी सुमारे दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रतिकिलो ९० ते २५० रुपये एवढा दर मिळतो. वर्षाला मत्स्यशेतीतून जवळपास २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. मत्स्यशेतीतून खर्च वजा जाता १५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.ठाकूर कुटुंब साधारणपणे १९९५ पासून कुक्कुटपालन करतात. शेतात ३० बाय १०० फुटाचे दोन शेड तयार केले आहेत. शेडमध्ये सुमारे साडेसहा हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते. दर दीड महिन्याला ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. पोल्ट्रीमधील कोंबडीखताची विक्री न करता ते थेट शेतात टाकले जाते. 

तीस गुंठ्यांमध्ये पाच शेततळी  

पाण्यासाठी शेतात एक विहीर आहे. जवळच असलेल्या भामा नदीवरून दोन लिफ्ट इरिगेशन स्कीममधून उपलब्ध केले आहे. त्यामुळे पाण्याची चांगली उपलब्धता आहे. लिफ्टचे आणि विहिरीचे पाणी शेतात पाइपलाइनद्वारे शेततळ्यामध्ये सोडले आहे. शेतात जवळपास तीस गुंठ्यांमध्ये पाच शेततळी आहेत. ठिबक सिंचन, पाटपाणी पद्धतीने पिकांना शेततळ्यांतील पाणी दिले जाते. 

शेतीची वैशिष्ट्ये

  • माती परीक्षण करून ऊस लागवडीचे नियोजन
  • विविध ठिकाणांहून उसातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली जाते.
  • एकरी उत्पादनवाढ केली तरच शेती परवडते अशा विचारसरणीतून व्यवस्थापन
  • पूर्व मशागत करताना दोन वेळा नांगरट व रोटर मारणे गरजेचे
  • एकरी पाच ते सहा ट्रॉली याप्रमाणे दरवर्षी एक ते दोन वर्षांनी शेणखताचा वापर
  • लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करण्यावर भर
  • खते जमिनीतून तसेच फर्टिगेशन पद्धतीनेही दिली जातात.
  • प्रत्येक काम वेळच्या वेळी करणे हाच नियोजनाचा मंत्र
  • सध्या २८ एकरांपैकी सहा ते सात एकरावर ठिबक सिंचनाचा वापर
  • कैलास ठाकूर, ९८२२९५९८७२ बाबाजी ठाकूर, ९८२२००९६६१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com