फळबागेतून बदलले शेतीचे चित्र

फळबागेतून बदलले शेतीचे चित्र
फळबागेतून बदलले शेतीचे चित्र

अकोला येथील सुनील शालिग्राम गर्जे यांनी नोकरी संभाळून चिंचोली रुद्रायणी (जि. अकोला) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये आश्वासक बदल केला. पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा नियोजनाच्यादृष्टीने डाळिंब, शेवगा, चिकू लागवड केली. शेतीची बांधबंदिस्ती करून बांधावरही विविध फळपिकांची लागवड केली. त्याचा जल-मृद संधारणासाठी चांगला फायदा होत आहे.  अकोला येथे मृद व जलसंधारण विभागामध्ये सुनील शालिग्राम गर्जे  हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत अाहेत. गर्जे कुटुंबाची बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी गावशिवारामध्ये वडिलोपार्जित दहा एकर शेती अाहे. सुनील गर्जे यांनी शेतीच्या आवडीतून पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा फळबागेच्या उभारणीकडे लक्ष दिले. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेत त्यांनी पीकपद्धती बसविली.  शेती नियोजनाबाबत सुनील गर्जे म्हणाले, की नोकरीमुळे दैनंदिन शेती नियोजनात लक्ष देता येत नाही. त्यामुळे मी शेती व्यवस्थापनासाठी गावातील एक कायमस्वरूपी मजूर ठेवला आहे. गरजेनुसार पीक लागवड, मशागत, काढणीसाठी मजूर घेतले जातात. मी दर रविवारी आणि शासकीय सुटीच्या दिवशी मात्र शेतीवर जाऊन पुढील आठवड्याचे नियोजन करतो. पूर्वी सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांची लागवड करत होतो. एकरी कपाशीचे आठ ते दहा क्विंटल तर सोयाबीनचे एकरी सहा क्विंटल उत्पादन मिळायचे; परंतु व्यवस्थापन आणि आर्थिक उत्पन्नाच्यादृष्टीने मी पारंपरिक पिकांएेवजी डाळिंब, चिकू, शेवग्याची लागवड केली. काही क्षेत्रावर सोयाबीन, मूग, उडीद, तुरीची लागवड असते. बांधावर पेरू, सीताफळ, करवंदाची लागवड आहे. मी गेल्या वर्षी एक एकर पपईची लागवड केली होती. परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने अपेक्षित उत्पन्न मिळाले  नाही.   सुनील गर्जे यांनी गेल्या वर्षी एक एकरावर गादीवाफा पद्धतीने हळद आणि आले लागवड केली होती. हळदीची सेलम तर आल्याची माहिम ही जात निवडली. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत पीक व्यवस्थापन ठेवले. सेंद्रिय खतावर भर दिला. ठिबक सिंचन केल्याने पीक वाढीच्या गरजेनुसार पाणी देता येते. सध्या दोन्ही पिकांची काढणी सुरू आहे. हळदीमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले होते. पुढील हंगामात हळद, आले लागवडीमध्ये गर्जे मिरचीचे आंतरपीक घेणार आहेत.   

फळबागेचे नियोजन  फळबागेच्या नियोजनाबाबत सुनील गर्जे म्हणाले, की मी सन २०१५ मध्ये अडीच एकरावर १० फूट बाय १२ फूट अंतराने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. दोन डाळिंबाच्या झाडामध्ये एक शेवग्याचे रोप लावले आहे. याचबरोबरीने अडीच एकरात २० फूट बाय २४ फूट अंतराने चिकूच्या क्रिकेटबॉल जातीची लागवड केली. यंदाच्या वर्षीपासून डाळिंबाचा बहर धरणार आहे. डाळिंबात आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या शेवग्यापासून यंदा दहा हजाराचे उत्पन्न मिळाले. पुढील वर्षीपासून शेवग्याचे चांगले उत्पादन मिळेल. सेंद्रिय पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन ठेवल्याने झाडांची चांगली वाढ होत आहे. जमीन सुपीक होत आहे. फळबागेच्या व्यवस्थापन खर्चात चांगली बचत होत आहे. 

गावरान गाईंचा गोठा गाईंच्या संगोपनाबाबत गर्जे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून आमच्या भागात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. चाऱ्याअभावी काही शेतकरी गावरान गाई सोडून देत होते. अशा सोडून दिलेल्या बारा गावरान गायींचे संगोपन मी स्वतःच्या शेतात सुरू केले. संबंधित गाईंच्या मालकांकडून रितसर संमती पत्र लिहून घेतले. गायींचे शेण, गोमूत्र आणि पाल्यापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार करतो. हे फळबागेसाठी वापरतो. त्यामुळे शेणखताचा खर्च वाचला. गाईंसाठी गव्हाचा भुसा, काही प्रमाणात सुका, हिरवा चारा विकत घेतो. अर्ध्या एकरावर चाऱ्याची लागवड केली  आहे. 

शेततळ्यावर जगली फळबाग अकोला परिसरात कमी पावसामुळे सिंचनावर परिणाम झाला अाहे.असाच फटका सुनील गर्जे यांच्या प्रयत्नांनाही बसतो अाहे. शेतात ६५ फूट खोल विहीर असूनदेखील पाणी पुरत नाही. यातून मार्ग काढत त्यांनी गेल्या वर्षी ३० बाय ३० बाय ३ मीटर अाकाराचे शेततळे खोदले. त्यामुळे डाळिंब, पेरू बागेला पाणी पुरत आहे. काटकसरीने पाणी वापरासाठी संपूर्ण दहा एकरांत ठिबक सिंचन केले आहे. पावसाळ्यात विहिरीतील पाणी शेततळ्यात  साठविले जाते. मार्च ते जूनपर्यंत शेततळ्यातील पाणी ठिबक सिंचनाद्वारे फळबागेला दिले जाते. त्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली आहे.

अग्रोवनने दिली दिशा   शेती बदलाबाबत सुनील गर्जे म्हणाले, की शेती बदलाचा खरा प्रेरणास्राेत ‘ॲग्रोवन’ अाहे. माझ्याकडे गेली अाठ वर्षे ॲग्रोवन येतो. त्यातील तांत्रिक माहिती, शेतकरी अनुभव मला मार्गदर्शक ठरतात. याचबरोबरीने कृषी विभाग, अात्मा यंत्रणेतील तज्ज्ञांचेही चांगले मार्गदर्शन मिळते. मी शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी शेततळे खोदले. शेतीच्या गरजेनुसार अवजारेही घेतली. येत्या काळात दहा गुंठ्यांचे शेडनेट उभारणार आहे. 

जल-मृद संधारणावर भर  

  • पावसाचा प्रत्येक थेंब शेतीमध्ये जिरवण्यासाठी जल-मृद संधारणाची कामे.
  • शेताच्या चारही बाजूने बांधबंदिस्ती. उतार असलेल्या ठिकाणी चर.
  • विहिरीशेजारी तसेच शेतातील घरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण.
  • शेतीच्या बांधावर करवंदाची (स्थानिक जात) लागवड केल्याने भटकी जनावरे शेतात घुसत नाहीत. बांधावर कडीपत्ता (स्थानिक जात), सीताफळाची (बाळानगरी) लागवड. बांधाच्या आतल्या बाजूने ठराविक अंतराने पेरूच्या सरदार जातीची लागवड. 
  • बांध पडिक राहण्यापेक्षा फळझाडांपासून पुढील दोन, चार वर्षांत उत्पन्न मिळणार.
  • व्यवस्थापनाची सूत्रे  

  • कृषी तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक नियोजन.
  • फळझाडांना शेणखताचा जास्तीत जास्त वापर, ठिबक सिंचनाने शाश्वत सिंचन.
  • प्रत्येक झाडाला पालापाचोळा, सोयाबीन कुटाराचे आच्छादन.
  • गावरान गाईंचे संवर्धन. शेणखत, गोमूत्र, पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती.
  • दर पंधरा दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी.
  • दर आठवड्याला फळझाडांना जीवामृताची मात्रा.
  • शेडनेटमध्ये रामफळ, सीताफळाच्या रोपांची निर्मिती.
  • शेतातील बांधावर चार सीसीटीव्ही कॅमेरे. त्यामुळे अकोल्यामध्ये बसून लॅपटॉपवर दैनंदिन शेतीमध्ये काय काम सुरू आहे ते दिसते. त्यानुसार मजुरांना सूचना आणि पुढील कामकाजाचे  नियोजन. 
  • -  सुनील गर्जे, ९४२२९२०१९०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com