औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य प्रदेशात ख्याती

भगवान पवार
भगवान पवार

महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनापण वेड लावले आहे. मध्य प्रदेशातील खरगोन व धार जिल्ह्यातील काही गावांत मोसंबीने चांगले मूळ धरले आहे. इतर पिकांपेक्षा मोसंबीपासून मिळणारे चांगले उत्पादन हे त्यामागचे कारण आहे. मध्य प्रदेशातील मोसंबीखालील क्षेत्र वाढण्यामागे पिंप्रीराजा (ता. जि. औरंगाबाद) जिल्ह्यातील भगवान रघुनाथ पवार या शेतकऱ्याचे मोठे योगदान आहे.  मोसंबी उत्पादनामध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद व जालना हे दोन जिल्हे प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पिंप्रीराजा हे गाव चांगल्या प्रतीच्या मोसंबी उत्पादनासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य म्हणजे या गावातील अनेक शेतकरी मोसंबी उत्पादनाबरोबरच जातिवंत मातृवृक्ष व अनेक वर्षांचा अनुभवातून मोसंबी कलमांची विक्री करण्याचे पण काम करतात.

येथील भगवान रघुनाथ पवार यांची ३२ एकर शेती आहे. त्यांच्याकडे डाळिंब, चिकू या पिकासह १५ एकर क्षेत्रावर मोसंबी आहे. भगवान पवार हे १९९० पासून मोसंबी कलमे तयार करतात. ४० ते ४५ हजार कलमे ही परराज्यांत जातात, तर महाराष्ट्रात २० ते २५ हजार विकली जातात. विशेष म्हणजे मोसंबीची कलमे जंबेरीच्या खुंटावर न करता ती रंगपूर लाइमच्या खुंटावर केली जातात. त्यामुळे रोपे रोगाला बळी पडत नाहीत. या कलमांना ४० ते ४५ रु. प्रती कलम दर मिळतो. रंगपूर लाइमची जातिवंत २० झाडे त्यांनी १७ वर्षांपूर्वी लावलेली आहेत. रंगपूर लाइमचे बियाणे त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावरून खरेदी केले होते. या मातृवृक्षापासून दरवर्षी २५ ते ३० किलो बियाणे मिळते. यंदा महाराष्ट्रात उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना मोसंबीला किलोला ६५ रु. भाव मिळत आहे. गेल्यावर्षी किलोला ४४ रु. भाव मिळाला . स्वखर्चातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन  सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना बागायत पिकांमध्ये मोसंबीची सेंद्रिय शेती लवकर यशस्वी होते असे समजले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पिंप्रीराजाची मोसंबी प्रसिद्ध असून, तेथे कलम पण चांगली मिळतात असे सांगण्यात आले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील अनेक शेतकरी भगवान पवार यांच्या संपर्कात आले. ऊस, भाजीपाला या पिकांना कंटाळलेले अनेक शेतकरी नवीन पिकाच्या शोधात होते. या शेतकऱ्यांना मोसंबी पिकाची माहिती मिळाली व पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यांशी संपर्क वाढला.

मोसंबी हे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी नवीन पीक असल्यामुळे बागेला ताण कसा व कधी द्यायचा, पाणी किती द्यायचे, खत व्यवस्थापन इत्यादीविषयी भगवान पवार भेट देऊन स्वखर्चातून माहिती देतात. मोसंबी विक्रीसाठीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मोसंबीमुळे येथील अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झालेली आहे. भगवान पवार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे, त्यांनी पुरविलेल्या जातीवंत कलमांमुळेच आम्ही मोसंबी उत्पादनामध्ये प्रगती करु शकलो असे येथील शेतकरी सांगतात. त्यांच्या संपर्कातील शेतकरी भगवान पवार यांना आदराने “भगवानभाऊ” म्हणतात. मराठवाड्यातील वातावरण मोसंबी पिकासाठी पोषक असून रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे जास्त खर्च होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले पाहिजे असे भगवानभाऊ सांगतात. मोसंबी उत्पादनात अग्रेसर मध्य प्रदेशातील शेतकरी 

  • रमेश मावजीभाई पाटीदार, धार जिल्ह्यातील जोतपूर (ता. मनावर) यांच्या शेतकरी गटाने १९८८ मध्ये ५ एकरांवर मोसंबीची लागवड केलेली आहे. गटाने मोसंबी कलमे पवार यांच्याकडून घेतली आहेत. 
  • रमेश यांच्याकडे ५ एकरांवर मोसंबीची लागवड आहे. 
  • जोतपूर येथील मुकेश श्रीधर पाटीदार हे शेतकरी या भागातील सर्वांत मोठे मोसंबी बागायतदार आहेत. मुकेश व त्यांचे दोन बंधू यांच्याकडे तब्बल ७८ एकर मोसंबी आहे. मुकेश यांनी महाराष्ट्रातूनच मोसंबी कलमे नेलेली आहेत.
  • सनावद तालुक्यातील नगावा (जि. खरगोन) गावातील कमलेश महिरामजी पटेल यांनी भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ मध्ये ९ एकर क्षेत्रावर मोसंबी लागवड केले आहे. पटेल यांची मोसंबी लागवड यशस्वी झाल्यामुळे नगावा व शेजारील मर्दावा या दोन गावांत आज ७० एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड झालेली आहे. कमलेश पटेल यांना लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी ९२ हजारांचे, तर चौथ्या वर्षी ३६ टन मोसंबी उत्पादनातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  • खरगोन जिल्ह्यातील मलगाव, धनगाव, सनावद, बडवाह इ. गावांमध्ये सध्या जवळपास २५० एकरांवर मोसंबीची लागवड असल्याचे पटेल सांगतात.  
  • महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडून मोसंबीची खरेदी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलचंद रामचंद हिवाळे हे गेल्या २५ वर्षांपासून मध्य प्रदेशातून मोसंबीची खरेदी करतात. सुरुवातीच्या काळात मध्य प्रदेशातील व्यापारी मोसंबीला चांगले भाव देत नव्हते. ही अडचणदेखील भगवान पवार यांनी सोडविली. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलचंद हिवाळे यांना त्यांच्याशी जोडून दिले. फुलचंद हिवाळे हे हजार ते दीड हजार टन मोसंबी दरवर्षी खरेदी करतात. हिवाळे मोसंबी खरेदी करू लागल्यानंतर आता मध्य प्रदेशातील व्यापारी पण  मोसंबीला चांगला भाव देऊ लागले आहेत. हिवाळे यांच्या अनुभवानुसार तेथील शेतकरी मेहनतीला कमी पडतात. त्यामुळे मोसंबीची प्रत महाराष्ट्रासारखी येत नाही. येथील अनेक शेतकऱ्यासमवेत त्यांचे घरगुती संबंध आहेत. मोसंबी हे त्यांच्यासाठी नवीन पीक आहे. येथील शेतकऱ्यांना जास्त जमिनी तर आहेतच; परंतु त्या अत्यंत कसदार आहेत व पाणीही मुबलक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कष्टाळूवृत्ती थोडी कमी आहे, असे हिवाळे यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे मोसंबी बागेचे व्यवस्थापन

  • वर्षातून एक किंवा दोन बहर  
  • तापमान जास्त असते तेथे फुले टिकत नाहीत तेव्हा फक्त आंबिया बहरच घेतला जातो. 
  • आंबिया बहरासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान एक ते सव्वा महिन्याचा ताण 
  • डिसेंबर-जानेवारीमध्ये पाणी देऊन ताण तोडला जातो.  
  • जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले लागायला सुरुवात होते
  • ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान फळांची तोडणी केली जाते. 
  • मृग बहरासाठी १५ मेपासून पाणी तोडले जाते व जूनमध्ये बागेस पाणी दिले जाते. 
  • जुलै-ऑगस्टमध्ये फुले लागून फेब्रुवारी महिन्यात फळे तोडायला येतात.
  • भगवान पवार, ८६६८७५६२५३ लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com