उसापेक्षा हळद ठरतेय किफायतशीर

आटोळो कुटुंबाने उसाचे क्षेत्र कमी करुन हळदीला पसंती दिली आहे.
आटोळो कुटुंबाने उसाचे क्षेत्र कमी करुन हळदीला पसंती दिली आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील राजेगाव येथील धनंजय आटोळे यांनी आपल्या पन्नास एकरांत ड्रीप ॲटोमेशन करीत परिसरात काटेकोर सिंचनाबाबत आदर्श तयार केला. ‘एमएस्सी ॲग्री’ असलेल्या धनंजय यांनी आता आपला मोर्चा अलीकडील काळात हळद पिकाकडे वळवला आहे. पाण्याची उपलब्धता, जमीन-पीक यांची सुसंगतता व बाजारपेठ यांचा विचार करून त्यांनी हळदीला प्राधान्य दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. उसासाठी हा पट्टा विशेष प्रसिद्ध आहे. तालुक्यातील राजेगाव येथील आटोळे कुटुंब एकत्रित पद्धतीबरोबरच शेतीत विविध प्रयोग करणारे म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे. त्यांचे एकूण ५० एकर क्षेत्र आहे. कुटुंबातील धनंजय हे ‘एमएस्सी ॲग्री’ पदवीधारक आहेत. उजनी धरणाचे पाणी शेत परिसरात असताना त्यांनी संपूर्ण पन्नास एकर क्षेत्राला ‘ड्रीप ॲटोमेशन’ (स्वयंचलित ठिबक) यंत्रणा उभारून परिसरात सिंचनाचा आदर्श तयार केला. बंधू अमोल, वडील सोमनाथ व चुलते तात्यासाहेब यांची त्यांना मोठी मदत होते. हळदीतून पीक बदल सातत्याने ऊस लागवड केल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होण्याचा धोका धनंजय यांना जाणवू लागला. अलीकडील काळात दुष्काळामुळे पाण्याचीही टंचाई जाणवू लागली. यावर उपाय म्हणून पीकबदल करण्याचे ठरविले. अलीकडील काळात सुमारे २५ एकरांपर्यंत त्यांचा ऊस असतो. त्यातील सुमारे पाच ते सहा एकर क्षेत्र कमी करून ते हळदीला देण्याचे त्यांनी ठरवले. आल्याचाही पर्याय होता. मात्र काळी जमीन, त्यात पाणी साठून राहिले तर रोगांचा धोका होण्याची शक्यता होती. हळदीला फेब्रुवारीपर्यंतच पाण्याची खरी गरज भासते. उसाला तर उन्हाळ्यातही पाणी भरपूर लागते. हळदीचे दरही बऱ्यापैकी आहेत. काही वर्षांपूर्वी हळदीचा अनुभवही घेतला होता. सर्व विचार करून अभ्यासाअंती हळदीवर शिक्कामोर्तब झाले. बेण्यासाठी लागवड सुमारे तीन वर्षांपूर्वी धनंजय यांनी सुमारे २० गुंठे क्षेत्रातून हळदीची लागवड पुन्हा सुरू केली. बेण्यामध्ये स्वयंपूर्णतः मिळवण्याचा त्यांचा मानस होता. त्या वेळी त्यांना सुमारे १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्याचा आधार पुढील वर्षातील लागवडीसाठी झाला. त्यानंतर म्हणजे मागील वर्षी सव्वा एकर क्षेत्रावर लागवड केली. पुणे जिल्ह्यात व त्यातही दौड तालुक्यात हळदीचे पीक फार कमी प्रमाणात घेतले जाते. कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये हळदीची लागवड करावी याबाबत सुरुवातीस संभ्रम होता. मागील अनुभवावरून निचरा होणारी जमीन निवडली. हळदीचे नियोजन लागवडीपूर्वी जमिनीची आडवी-उभी खोल नांगरट केली. हिरवळीच्या खतांचा व शेणखताचा वापर केला. गादीवाफ्याचा (बेड) वापर करून दोन बेडसमधील अंतर चार फूट व उंची सव्वा फूट ठेवली. लागवड साधारणपणे मे-जूनमध्ये केली. लागवडीसाठी सेलम जातीच्या घरच्याच निरोगी बेण्याचा वापर केला. यातही बेण्याची सुप्तावस्था, डोळे नकळत फुगलेले असे वापरले. दोन रोपांमधील अंतर नऊ इंचापर्यंत ठेवले. लागवडीच्या वेळी गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घेतली. एकरी सुमारे एक हजार किलो बेणे वापरले. त्यासाठी एकरी पाच हजार ते सात हजार रुपयांपर्यंत खर्च आला. पाण्याचे नियोजन मे-जून महिन्यामध्ये लागवड होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाला सुरुवात होईपर्यंत पाण्याची आवश्यकता असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घेतली. त्यानंतर ठिबक सिंचनाच्या साहाय्याने नियमित पाणी दिले. बॉयलरचा वापर हळदीच्या काढणीनंतर शिजवणीसाठी बॉयलरची गरज होती. धनंजय यांनी परिसरातील दोन सहकारी हळद उत्पादकांसोबत गट तयार केला आहे. त्यांनी एकत्रितपणे हे यंत्र खरदी केले आहे. एकरी उत्पादन मागील वर्षी सव्वा एकरांत एकरी सुमारे २५ ते ३० क्विंटलप्रमाणे उत्पादन मिळाले. त्यास क्विंटलला साडेसात हजार रुपये दर मिळाला. हुरूप वाढल्याने चालू वर्षी साडेचार एकर क्षेत्रावर लागवड केली. यंदाही मागील वर्षाएवढेच उत्पादन अपेक्षित आहे. सद्यस्थितीतही साडेसात हजारांपर्यंत दर असल्याचे धनंजय यांनी सांगितले. एकरी सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आला. धनंजय सांगतात की अठरा महिन्याच्या उसातून खर्च वजा जाता एकरी साठ ते सत्तर हजार रुपये हाती पडतात. तर त्याहून कमी कालावधीत म्हणजे नऊ ते १० महिन्यांच्या काळात हळदीमधून उसाएवढे किंबहुना एकरी एक ते सव्वा लाख रुपये मिळण्याची संधी असते. कांद्याचेही जोमदार उत्पादन पिकांची एकरी उत्पादकता चांगली घेण्यात धनंजय यांचा हातखंडा आहे. दरवर्षी त्यांच्याकडे कांदाही असतो. मागील वर्षी एकरी २० टन तर तीन एकरांत सुमारे १४०० पिशवी कांदा आपण पिकवल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी स्प्रिंकलर व ठिबक अशा दोन्हींचा वापर गरजेनुसार केला. बेवडसाठी कांद्यासह हरभरा हे पीकदेखील उत्तम असल्याचे निरीक्षण धनंजय यांनी नोंदवले आहे. पीकबदलाचा उसालाही फायदा पूर्वी आटोळे सातत्याने उसाचे पीक घेत होते. त्यामुळे एकरी उत्पादन काही प्रमाणात स्थिर म्हणजे ५० टनांपर्यंत मिळत होते. यावर उपाय करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रथम हिरवळीच्या खतांचा वापर केला. त्यानंतर हळद लागवडीचा निर्णय घेतला. हळद काढणीनंतर त्याच क्षेत्रामध्ये दुसऱ्या वर्षी उसाची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या प्लॉटमध्ये हळदीची लागवड करून फेरपालट केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम हळद व उसातही दिसून येत आहेत. उसाचे उत्पादन एकरी ६० ते ७० टनांपर्यंत मिळते आहे. जमिनीची सुपीकताही वाढीस लागली आहे. पाणी बचतीवर भर उन्हाळ्यामध्ये पिकांना पाणी देणे अत्यंत जिकिरीचे होते. कधी विजेचा प्रश्न तर कधी पाण्याची कमतरता, यामुळे उभी पिके अनेकदा जळून जातात. हळदीची लागवड मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तर जानेवारी- फेब्रुवारीमध्ये हळद काढणीस येते. त्यामुळे उन्हाळाच्या तीन ते चार महिन्यांमध्ये येणारा पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होते. एकुण क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर हळदीची लागवड केल्यास उन्हाळ्यांमध्ये अन्य क्षेत्रातील पिकांना योग्य पाणी मिळते. त्याचा परिणाम अन्य पिकांच्या उत्पादनांवरही होतो असा अनुभव धनंजय यांना आला आहे.  धनंजय आटोळे, ९६५७६७२२७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com