कुटुंबातील एकीने साधली भाजीपाला शेतीत प्रगती

वांगी तोडताना बावस्कर बंधू
वांगी तोडताना बावस्कर बंधू

धामणगाव बढे (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील बावस्कर कुटुंबातील चौघा भावांनी एकीतून शेतीमध्ये प्रगती साधली आहे. मुख्य पिकांचे उत्पन्न दरवर्षी शिल्लक ठेवत पारंपरिक शेतीला पूरक म्हणून वर्षभर भाजीपाल्याची शेती पिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला जातो. बावस्कर कुटुंबात सुभाष, नथ्थू, उमेश आणि नीलेश असे चार भाऊ असून त्यांचे १९ जणांचे एकत्र कुटुंब १७ एकराचे व्यवस्थापन करीत आहे.   कुटुंबाची एकता ही विकासाला किती पोषक ठरते हे अनेकदा दिसून आले आहे. धामणगाव बढे गावातील बावस्कर बंधूंचे १९ जणांचे एकत्र कुटुंब आहे. बावस्कर कुटुंबाची दोन ठिकाणी मिळून १७ एकर शेती आहे. त्यापैकी गावाजवळ असलेल्या तीन एक क्षेत्रावर ते वर्षभर भाजीपाल्याची शेती करतात. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ते हिरवी मिरची, वांगी, कोबी, टोमॅटो या पिकांची लागवड करतात. चोख व्यवस्थापनातून त्यातून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी होत आहेत. गावापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर बाजारपेठेत दररोज भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. यातून दररोज ताजा पैसा मिळतो. मिरचीची फायदेशीर शेती यावर्षी लागवड केलेल्या एक एकर मिरचीची तोडणी सध्या सुरू आहे. जूनमध्ये लागवड केल्यानंतर सप्टेंबरपासून त्यातून उत्पादन सुरू झाले. यंदा पाऊस अतिप्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनाला थोडा फटका बसला. तरीही त्यांना आतापर्यंत एकरात १७० क्विंटलपेक्षा अधिक मिरची तोडून झाली आहे. आतापर्यंत सरासरी क्विंटलला १५०० रुपये दर मिळत आलेला आहे. या क्षेत्रातून आणखी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन येईल, इतकी फळधारणा झाडांवर झालेली आहे. मिरची पिकातून त्यांना एकरात अडीच लाखांचे उत्पन्न आतापर्यंत मिळालेले आहे. साधारण ५० हजारांपर्यंत एकरी खर्च होतो, असे त्यांनी सांगितले. चवळी, मेथी, कोथिंबीर पैसा देणारी पिके चवळीची दरवर्षी टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. यंदा जूनमध्ये एक एकरात चवळीची लागवड केली होती. जास्त प्रमाणात पाऊस होऊनही त्यातून २५ क्विंटल उत्पादन आले. इतर भाजीपाल्याची आवक नसल्याने किलोला कधी २० रुपये दर मिळाला. अवघ्या तीन-चार महिन्यांत एकरात ७५ हजारांचे उत्पन्न झाले. यासाठी लागवड ते काढणीपर्यंत सर्व खर्च मिळून १५ हजार रुपये खर्च लागला होता. ते पीक काढून नंतर मेथी व कोथिंबीरचे पीक घेतले. पावसामुळे मेथीचे नुकसान झाले. तरीही १५ गुंठ्यांच्या या क्षेत्रात सहा क्विंटल मेथी झाली. ऑफसीझन लागवड केल्याने मेथीला किलोला १०० रुपये दर मिळाला. तर याच क्षेत्रात लावलेली कोथिंबीर सहा क्विंटल झाली. मेथीला क्विंटलला सहा ते साडेसहा हजार रुपये दर मिळाला. ही पीक काढून झाल्यानंतर आता त्यात पत्ताकोबी आणि काही क्षेत्रात चवळी लावलेली आहे. प्रामुख्याने गावरान बियाण्याचा उपयोग करून चवळीचे पीक घेतले जाते. हे बियाणे जोपासले आहे. वांगी फायदेशीर पीक प्रत्येक हंगामात अर्ध्या एकरात जूनमध्ये वांग्याची लागवड केली जाते. फेब्रुवारीपर्यंत या काटेरी वांग्याचे उत्पादन मिळते. या हंगामातील वांग्याचे उत्पादन सध्या सुरू आहे. आजवर ६६ क्विंटल वांग्याची तोडणी झालेली आहे. आणखी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन होईल. म्हणजेच अर्ध्या एकरात ९५ क्विंटलपर्यंत उत्पादन येईल, अशी अपेक्षा आहे. वांगी सरासरी १५ रुपये किलो दराने विकली जातात. दरवर्षी सरासरी एकरी २०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रमुख पिकांचे उत्पन्न राहते शिल्लक २००८ सालापर्यंत बावस्कर कुटुंबाकडे १२ एकर शेती होती. बागायती क्षेत्रही नव्हते. हा भाग अवर्षणग्रस्त असल्यामुळे पाण्याची कायमच टंचाई. अशा परिस्थितीत गावाशेजारच्या शेतात विहीर खोदून सिंचनाची सोय केली परंतु येथेही मार्च महिन्यापर्यंतच पाणी पुरते. त्यामुळे वर्षातील नऊ महिने ते भाजीपाला पिकवतात. भाजीपाल्याचे पीक आलटूनपालटून घेतात. या तीन एकरातील भाजीपाल्याच्या उत्पन्नातून कुटुंबाचा संपूर्ण खर्च तर भागतो शिवाय इतर शेतीकामासाठी लागणारा पैसासुद्धा खर्च करण्यासाठी मिळतो. भाजीपाला विक्रीतून मिळालेल्या पैशातून कुटुंबावर आर्थिक ताण येत नाही. १२ एकरातील मुख्य पिकांचे उत्पन्न शिल्लक ठेवता येते, असे नथ्थू बावस्कर यांनी सांगितले. खरिपात दरवर्षी ९ एकरात कापूस, तीन एकरावर सोयाबीनची लागवड केली जाते. कापाशीचे एकरी १२ तर सोयाबीनचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते. रब्बीत तीन एकरावर मका पिकाची लागवड केली जाते. मक्याचे साधारण एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. या पिकांच्या उत्पन्नातून पैसा शिल्लक राहतो. या पैशातूनच त्यांनी काही वर्षांपूर्वी चार एकर शेती कुठलेही कर्ज न काढता विकत घेतली. आता कुटुंबाकडे १७ एकर शेती झाली आहे. जे कुटुंब पूर्वी इतरांकडे कामाला जायचे त्याचा आता एकीतून कायापालट झाला आहे. आता त्यांच्याकडेच मजूर कामाला येतात. संपूर्ण कुटुंब राबते शेतीत बावस्कर कुटुंबातील चार भाऊ, चार महिला दररोज शेतात काम करतात. नथ्थू हे बाजारपेठेत माल नेणे, तसेच व्यवहार सांभाळण्याचे काम पाहतात. वेळ असेल तेव्हा उमेश हे गवंडी काम करतात. भाजीपाल्यामुळे शेतात दररोज काम राहते. कुटुंबातील सात जण व मजुरांच्या मदतीने कामे केली जातात. कुटुंबातील नवीन पिढी आता शिक्षण घेत आहे. पिकांचे चोख व्यवस्थापन कामाचे योग्य व्यवस्थापन आणि भाजीपाला शेतीतील सातत्य यामुळे बावस्कर कुटुंब भाजीपाला शेतीत यशस्वी झाले आहे. कोणत्या पिकाला कधी खत द्यायचे, किडीसाठी कोणती आणि केव्हा फवारणी करायची ही जबाबदारी पूर्ण ज्ञान अनुभवातून मिळवलेले नथ्थू सांभाळतात. ते कृषी विक्रेते आणि कृषी पदवीधर रमेश चौरे यांच्याशी चर्चा करून पिकाचे व्यवस्थापन करतात.   यावर्षी लागवड केलेली पिके

  • मिरची- एक एकर
  • टोमॅटो- अर्धा एकर
  • वांगी- अर्धा एकर
  • चवळी - एक एकर
  • फूलकोबी -१० गुंठे
  • पीकनिहाय उत्पादन

  • मिरची - २५० ते २७० क्विंटल
  • वांगी - १०० क्विंटल
  • चवळी - ३४ क्विंटल
  • संपर्क ः नथ्थू बावस्कर, ९६६५४१७५७०, ७३८५४१७५७० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com