पर्यावरण, जलसंवर्धन, व्यावसायिक शेतीचा संगम असलेले `वऱ्हा'

गावातील हळद लागवड, सुसज्य ग्रामपंचायत कार्यालय आणि खोलीकरण करण्यात आलेला गाव तलाव.
गावातील हळद लागवड, सुसज्य ग्रामपंचायत कार्यालय आणि खोलीकरण करण्यात आलेला गाव तलाव.

वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी पीकबदलातून शेती व्यवसाय फायदेशीर केला आहे. गावात जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. वृक्षलागवड आणि जलसंधारणाच्या विविध उपचारातून गावाची भूजलपातळी वाढविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. विविध विकास कामातून ग्रामविकास साधन्यात येथील गावकऱ्यांचा प्रयत्न आहे.   तिवसा तालुक्‍यात समावेशीत असलेल्या वऱ्हा गावाची लोकसंख्या साडेपाच हजारांवर आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात शेतीपूरक दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. हळदीसोबत बटाटा, कपाशी, सोयाबीन, तूर ही खरीप तर रब्बी हंगामात गहू, हरभरा यांसारखी पिके घेतली जातात. पीकबदलातून रोजगार निर्मिती गावाचे विद्यमान सरपंच आणि प्रयोगशील शेतकरी गणेश कामडी यांच्याकडे आधी बटाटा लागवड होत होती. जास्त आवक आणि दरातील घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते. एका हळद उत्पादकाच्या सल्ल्याने कामडी यांनी बटाटा पिकापेक्षा अधिक फायदेशीर असलेल्या हळद लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गावातील इतर शेतकरी या नव्या पिकाकडे वळण्यास तयार होत नव्हते. परंतु कामडी यांनी गावातील शेतकऱ्यांसोबत हळद उत्पादक शेतकऱ्यांना भेटी देऊन अभ्यासातून हळद लागवडीला सुरुवात केली. हळद बटाटा पिकापेक्षा अधिक फायदेशीर असल्याचे दिसून अल्यामुळे सध्या गावातील हळदीचे क्षेत्र ५५० एकरावर पोचले आहे. गावातच झाले खरेदीदार वऱ्हासोबतच लगतच्या गावांमध्येदेखील हळद लागवड क्षेत्र वाढीस लागले आहे. त्याची दखल घेत व्यापारीदेखील गावस्तरावर खरेदीस तयार झाले आहेत. गावातील युवकांना या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाला आहे. बाहेरच्या खरेदीदारांची पावलेदेखील या गावाकडे वळू लागली आहे. हंगामात सुमारे आठ ते दहा हजार क्‍विंटल हळदीचे उत्पादन होते. त्यावरूनच हळद पिकात या गावाचे पुढारलेपण सिद्ध होत आहे. एकरी १०० क्‍विंटल ओल्या तर २० ते २५ क्‍विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन मिळते, असे गणेश कामडी सांगतात. सोयाबीननंतर बटाटा लागवडीचा पॅटर्न गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी सातत्याने सोयाबीन काढणीनंतर बटाटा पिकाची लागवड करतात. बटाट्याचे एकरी ७० ते ७५ क्‍विंटल उत्पादन मिळते. मध्यंतरी व्यावसायिक पीक म्हणून बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढली होती. दरातील घसरणीमुळे मात्र बटाटा उत्पादक हळदीकडे वळले आहेत. बटाटा विक्रीसाठी अमरावती बाजाराचा पर्याय आहे. नगदी आणि व्यावसायिक पिकांचा आदर्श घालून देणाऱ्या या गावात परंपरागतरीत्या कांदा लागवडीतही सातत्य आहे. गावात साधारणतः ४५ ते ५० एकरांवर जानेवारी महिन्यात कांदा लागवड होते. मे महिन्यात कांदा काढणीस येतो. ठिबक सिंचनावर भर संरक्षित सिंचनाकरिता गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे विहिरीचा पर्याय आहे. यातील मोठ्या संख्येतील विहिरींना बारमाही पाणी राहते, तर काही विहिरींना हंगामी पाण्याची उपलब्धता होते. या सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता ठिबक सिंचन संच बसविले आहेत. जलसंधारणात आघाडीवर जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जुन्या बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला आहे. नाला आणि तलावाचे खोलीकरणही करण्यात आले आहे. गावातील पाच एकर क्षेत्रावरिल पडीक जमिनीवर नवा गावतलाव खोदण्यात आला आहे. त्यामुळे लगतच्या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. गावशिवारात चार पाझर तलाव आहेत. यातील दोन तलावांची दुरुस्ती करण्यात आली. जिल्हा परिषद निधीतून हे काम झाल्याचे सरपंच गणेश कामडी सांगतात. गाव परिसरात वनविभागाच्या आर्थिक निधीतून समतल चरही घेतले आहेत. पाणी संचयाकरिता तब्बल तीस सिमेंट बंधारे घेण्यात आले आहेत. गावाच्या उत्तरेकडील जमीन काळी भारी आहे. उर्वरित भागातील जमीन मात्र हलकी आहे. परंतू जलसंधारणाच्या विविध उपचारांतून सर्वच भागात पाण्याची पातळी वाढविण्यात यश आले आहे. वृक्षलागवडीतून पर्यावरण संरक्षण सामाजिक वनीकरण आणि ग्रामपंचायतीने मिळून सुमारे १२ हजारावर वृक्ष लागवड केली आहे. सात हजार वृक्षांची लागवड यापूर्वीच करण्यात आली आहे. गावातील पडीक जमिनीवर पिंपळ, वड, करंज, पापडा, चिंच, आंबा अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शासकीय योजनेंतर्गत कोणी वृक्ष लागवडीस तयार नसेल तर असे वृक्ष आमच्या गावात आणा, आम्ही लावतो, असा वेगळाच बाणा आणि शिरस्ता वऱ्हा गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जपला आहे. गावातील विकासकामे गावातील प्रत्येक भागात सिमेंट रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठी सुनियोजित नाल्या, भूमिगत गटार योजनादेखील येत्या वर्षभरात पूर्णत्वास जाणार असून त्याला मंजुरी मिळाली आहे. गावातील मोठ्या चौकांमध्ये शहराच्या धर्तीवर हायमास्ट बसविण्यात आले आहेत. बंदिस्त नाली, विजेची बचत होण्यासाठी गावात एल.ई.डी. दिव्याची सोय करण्यात आली आहे. येत्या काळात गावाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सार्वजनिक सभागृहाने गावाच्या सौंदर्यात भर गावातील सार्वजनिक उपक्रमासाठी सभागृह बांधण्यात आले आहे. कारगिल शहीद कृष्णा समरित यांचे नाव या सभागृहाला देण्यात आले आहे. गावातील कोणत्याही प्रसंगी नाममात्र दराने सभागृह भाड्याने दिले जाते. २४०० क्षमतेचे हे सभागृह असून, जास्त क्षमतेचे नवीन सभागृहदेखील गावात प्रस्तावित आहे. ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. मानांकन २०१५ मध्ये गावाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले आहे. तालुका स्तरावरील स्मार्ट गावाचा पुरस्कार वऱ्हा गावाने आपल्या नावे केला आहे. दहा लाख रुपयांचा निधी यातून मिळाला आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा गावातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची सोय व्हावी याकरिता व्यावसायिक स्तरावर आर.ओ. प्लॅट घेण्यात आला आहे. प्रति लिटरसाठी एक रुपया दर आकारला जातो. या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाणी तर ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. स्मार्ट अंगणवाडी गावात सुमारे सात अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून उर्दू माध्यमाची शाळादेखील आहे. या सर्व शाळा आणि शिक्षण संस्था डिजिटल आहेत. शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवून त्यांना शाळेच्या दुरुस्तीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. लोकसहभागातून माजी विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या मदतीतून शाळेची रंगरंगोटी केली जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहेरघर संकल्पना गर्भवती महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती मिळावी याकरिता माहेरघर संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी विशेष भिंतीपत्रके छापून ती शासकीय प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील एका खोलीत लावली आहेत. या खोलीचे माहेरघर असे नामकरण करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी किसॉक यंत्रणा बसविण्यात आली असून त्या माध्यमातूनदेखील आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बेड, सलाईन स्टॅंड, रुग्णांचे वजन घेण्यासाठीची यंत्रणा, वॉटर कुलर, रक्‍त तपासण्यासाठीची यंत्रणा असे साहित्य ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात आले आहे. स्मशानभूमीचा कायापालट गावात हिंदू स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम सध्या प्रगतीवर आहे. स्मशानभूमीत दोन शेडची उभारणी करण्यात आली आहे. विकासकामांमुळे वेगळी ओळख गावात मागासवर्गीयांकरिता समाज मंदिर बांधण्यात आले आहे. विहीर आणि बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करून पाणी समस्या निकाली काढण्यात आली आहे. येत्या काळात पाणी वापरावर नियंत्रण आणि निर्बंध बसावा यासाठी नळाला मीटर बसविण्याचे प्रस्तावीत आहे. दुग्धोत्पादनातही आघाडी व्यावसायिक आणि नगदी पिकांचा आदर्श घालणाऱ्या या गावात दुग्ध व्यवसाय पारंपरिकरीत्या होतो. गावात दुधाळ जनावरांची संख्या जास्त असून रोज ३०० ते ३५० लिटर दुधाचे संकलन होते. जनावरांना पाणी पिण्यासाठी दोन सार्वजनिक हौद बांधले आहेत. बायोगॅसचा वापर ग्रामपंचायतीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापरावर भर दिला आहे. त्याअंतर्गत गावातील काही भागात सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यासोबतच पाच ग्रामस्थांनी बायोगॅसच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जेला पर्याय शोधला आहे. ॲग्रोवन सरपंच परिषद ठरली प्रेरणादायी वऱ्हा गावाला जलसंधारण आणि ग्रामविकासात पुढारलेपण प्राप्त करून देणाऱ्या सरपंच गणेश कामडी यांनी आळंदी येथे झालेल्या ॲग्रोवनच्या सरपंच परिषदेत भाग घेतला होता. यापूर्वी अशा उपक्रमात सहभागी होता आले नाही याचे शल्य असल्याचे ते सांगतात. ॲग्रोवन सरपंच परिषदेतूनच अनेक विकासकामांची माहिती मिळाली, असे ते आत्मविश्‍वासाने सांगतात. "माझा सरपंचपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी पुढील दहा वर्षांनंतर माझे गाव कसे असेल आणि दिसेल हे नजरेसमोर ठेवत गावात विकासात्मक कामे राबविण्यावर भर दिला आहे.' गणेश कामडी (सरपंच) संपर्क ः ९८३४००६१६५ व्हॉटस्ॲप क्र. ः ९८८१७१९६४६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com