शेती, ग्रामविकासात नांगनूर अग्रेसर

E learning in school
E learning in school

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील नांगनूर (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या गावाने शंभर टक्के हागणदारीमुक्त उपक्रमांबरोबर विविध नावीन्यपूर्ण विकासकामे केली आहेत. शेती, आरोग्य, ग्रामविकासात गावाने वेगळेपण जपले आहे. प्रत्येक घटकांसाठी वैविध्यपूर्ण योजना हे या गावाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

गडहिंग्लजपासून अठरा किलोमीटर अंतरावर पुणे- बंगळूर महामार्गालगत नांगनूर हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. या गावाचे ४१४ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. हिरण्यकेशी नदीच्या काठावर गाव असल्याने बहुतांश शिवार बागायती आहे. संपूर्ण गावाचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. गावशिवारात उसाबरोबर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड असते. पीक उत्पादन वाढविण्यासाठी गावातील शेतकरी सुधारित तंत्राकडे वळले आहेत. मीटरने पाणीपुरवठा  गाव परिसरात नदी असली तरी ग्रामस्थांना पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला मीटरने पाणीपुरवठा केला आहे. गावापासून पाच किलोमीटर असणाऱ्या खंदाळ- हिटणी येथून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ८७ लाख रुपये खर्च करून नळपाणी योजना करण्यात आली. हे पाणी नळाद्वारे ग्रामस्थांना दिले जाते. चार महिन्यांमध्ये ३६,००० लिटरसाठी २०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. पुढील प्रत्येक १००० लिटरसाठी पाच रुपये या प्रमाणे जादा शुल्क पाणीपट्टीच्या स्वरुपात आकारले जाते. यामुळे ग्रामस्थांना पाणी बचतीची सवय लागली आहे.  दिव्यांगांसाठी घरफाळ्यात सवलत  घरात दिव्यांग व्यक्ती असली की अनेकदा कुटुंबात अस्वस्थ वातावरण असते. ती व्यक्ती कुटुंबासाठी ओझे वाटू नये यासाठी ग्रामपंचायतीने दिव्यांगांचा सन्मान म्हणून घरफाळ्यात पन्नास टक्के सवलत दिली. दिव्यांगाचे ओझे म्हणून कुटुंबात वागणूक मिळू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत २४ दिव्यांग कुटुंबांना घरफाळा सवलत देण्यात आली आहे.  ग्रामविकासाच्या अधिक यशोगाथांसाठी अ्ॅग्रोवन अॅप आजच डाऊनलोड करा  ग्रामलक्ष्मी सुकन्या योजना  मुलींचा जन्म दर वाढावा यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामलक्ष्मी सुकन्या योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जन्माल्या येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे राष्ट्रीयीकृत बॅंकेत साडेपाच हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येते. मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला ही रक्‍कम मिळते. गेल्या वर्षीपासून ही योजना सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच मुलींच्या नावे ठेव ठेवण्यात आली आहे.  प्राथमिक शाळेत ई लर्निंगची सोय  गावामध्ये विद्या मंदीर ही शंभर वर्षांपूर्वीची शाळा आहे. या प्राथमिक शाळेत लोकसहभागातून सर्व वर्गामध्ये टी.व्ही. सेटची सोय करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या शाळेला आधुनिक लूक देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. याचबरोबरीने शाळेत शुद्ध पाण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे.  ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी ‘ऑक्सिजन पार्क' गावात ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत ज्येष्ठ व्यक्तींच्या विरंगुळ्यासाठी ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी मोकळ्या जागेत सावली देणारी विविध झाडे लावून हा परिसर आरामदायी करण्यावर भर दिला आहे. या परिसरात नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसविण्यात आले आहेत. सकाळ, संध्याकाळ गावातील ज्येष्ठ नागरिकांना काही काळ निवांत बसावे, या उद्देशाने हे पार्क उभारलेले आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बसथांबा   गावात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बसथांबा उभारण्यात आले आहेत. महिला, मुलींना बसची वाट पहात उन्हात ताटकळत उभे रहाण्यास लागू नये, यासाठी स्वतंत्र बसथांब्याची सोय करण्यात आली आहे. बसथांब्याची आकर्षक रंगरंगोटी करून,सजवून वेगळेपणा जपला आहे. डिजिटल फलकाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, स्वच्छतेचा संदेश देणारी वाक्‍ये रेखाटण्यात आली आहेत.  महिलांची आरोग्य तपासणी  आशा स्वयंसेविकामार्फत प्रत्येक घरात जाऊन महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. एच.बी. मशीनद्वारे रक्ताचे प्रमाण तपासले जाते. तपासणीनंतर रुग्णांना औषधांचे वाटप ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात येते. तसेच लसीकरणही केले जाते. महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी ग्रामपंचायत सातत्याने तपासणी केली जाते. गंभीर आजार असतील तर त्यांना पुढील उपचारासाठी प्रवृत्त केले जाते. किशोरवयीन मुलींसाठी शाळेमध्ये जाऊन त्यांच्यातील शारीरिक बदल, आरोग्यविषयी व्याख्यानाद्वारे जागृती केली जाते. 

युवकांसाठी सुसज्ज व्यायामशाळा  गावातील युवकांच्या सदृढ आरोग्यासाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा ग्रामपंचायतीने उभी केली आहे. यासाठी स्वतंत्र खोली बांधून यामध्ये व्यायामाची विविध साधने ठेवण्यात आली आहेत. व्यायाम करण्यासाठी सध्याची प्रचलित साधने ग्रामपंचायतीने स्वत: खर्च करून व्यायामशाळेत उपलब्ध करून दिली आहेत. भविष्यात या साधनांत आणखी भर टाकून व्यायाशाळेला आधुनिक स्वरुप देण्यात येणार आहे. 

गांडूळखत प्रकल्प

ग्रामपंचायतीने २००९ पासून गांडूळ खत निर्मिती सुरुवात केली. गावातून आठवड्यातून तीन दिवस कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी फिरते. या घंटागाडीच्या माध्यमातून संकलीत झालेला ओला कचरा गांडूळ खत निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये टाकला जातो. यातून दीड महिन्याला पन्नास ते साठ किलो गांडूळ खत तयार होते. ग्रामपंचायतीने सुमारे चारशे झाडांची लागवड सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याशेजारी ग्रामपंचायतीने केली आहे. या झाडांना गांडूळ खत दिले जाते. काहीवेळा मागणीनुसार गांडूळ खतांची विक्रीही केली जाते. या प्रकल्पामुळे गावातील बहुतांशी झाडांची चांगली वाढ झाली आहे. गावातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. याशिवाय विविध महाविद्यालयांच्या एन.एस.एस.कॅंपच्या माध्यमातूनही गावची स्वच्छता केली जाते. डासांच्या निर्मूलनासाठी ग्रामपंचायतीने स्वत: फॉगिंग मशीन खरेदी केले आहे. पंधरा दिवसांतून एकदा गावात डास निर्मूलनासाठी फवारणी केली जाते. गावातील एका विहिरीत गप्पी मासे पैदास केंद्रही सुरू केले आहे.  ग्रामविकासाच्या अधिक यशोगाथांसाठी अ्ॅग्रोवन अॅप आजच डाऊनलोड करा

ग्रामपंचायतीचा आरओ प्लॅन्ट  गावासाठी हिरण्यकेशीनदीवरून पाणीपुरवठ्याची सोय असली तरी नागरिकांनी हवे तेवढे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीनजीक शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आर. ओ. प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. पंधराशे लिटर क्षमतेचा हा प्लॅन्ट आहे. एक रुपयाला दहा लिटर शुद्ध पाणी या प्रमाणात ग्रामस्थांना हे पाणी देण्यात येते. या प्लॅन्टसाठी विद्युत पुरवठा आणि अन्य सुविधा ग्रामपंचायतीने पुरविल्या आहेत. सव्वा चार लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत स्वनिधीतून हा प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. 

शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव  गावातील कुटुंब संख्या पाचशे दहा इतकी आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे चांगले प्रबोधन करत शौचालय बांधणीला प्राधान्य दिले. यामुळे प्रत्येक घरात शौचालय बांधलेले आहे. यामुळे गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त झाले आहे. गावात शोषखड्डे असलेली ६४ आणि बायोगॅसला जोडलेली ३५ शौचालये आहेत. तर टाकी शौचालये असलेली ४११ कुटुंबे आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयांची सोय करण्यात आली आहे. गावात प्रत्येक वर्षी ऊस तोडणीसाठी मजूर येतात. त्यांनीही उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी त्यांच्यासाठी खास शौचालये बांधली आहेत. २००९ पासून गावाने हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर गाव आता हागणदारीमुक्त झाले आहे.  

समन्वयाने गावाचा कारभार  गावच्या सरपंच सौ. सुप्रिया कांबळे या लोकनियक्त सरपंच आहेत. तर विकास मोकाशी हे उपसरपंच आहेत. ग्रामसेवक संदीप तोरस्कर यांच्यासह अन्य आठ सदस्यांमध्ये सातत्याने समन्वय असतो. विकासकामे करताना एकमेकांना विश्‍वासात घेतले जाते. ग्रामविकासात ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचे सरपंच सौ. सुप्रिया कांबळे आणि उपसरपंच विकास मोकाशी यांनी सांगितले. 

विविध पुरस्कारांत अग्रेसर  गावाने आतापर्यंत यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार मिळविला आहे. २०१०-११ मध्ये पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला. गावाने २०१७-१८ स्मार्ट गाव योजनेचा पहिला क्रमांक मिळविला. संपूर्ण स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्येही गावाने जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com