वहागावातील ‘वॉटर बॅंकांनी’ घडवली किमया

हिरिरीने झालेल्या कामांतून वहागावात३२ शेततळी झाली असून, २८ शेततळ्यांचे अस्तरीकरण होऊन पाणी साठवण्यात आले आहे. शेततळ्यांसाठी डोंगरालगत जागा निवडण्यात आली. बहुतांशी तळी चढांवर असल्याने सायफन पद्धतीने पाणी शेताला देण्यात आले आहे. यामुळे वीजबिल व कृषी पंपांचा खर्च कमी झाला.
वहागावात अशी ३२ शेततळी उभारली आहेत
वहागावात अशी ३२ शेततळी उभारली आहेत

शासकीय योजना काटेकोरपणे राबवल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू वहागावात शेततळ्यांची योजना पद्धतशीर राबवण्यात आली. ती यशस्वी ठरून गावाचे बागायती क्षेत्र वाढले. आले, हळद, ऊस डाळिंब आदी पिके घेऊन जीवनमान उंचावणे शेतकऱ्यांना शक्य झाले. शेततळी शेतीला जणू संजीवनीच ठरली आहेत.    सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून सुमारे दीड किलोमीटरवरील वहागाव हे वाई तालुक्यातील कोरडवाहू गाव. सुमारे १३०० लोकसंख्या असलेल्या या गावात २७२ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. पूर्व भागात डोंगर असल्याने मुरमाड जमिनीचे प्रमाण जास्त आहे. गावात सरासरी ३७५ मिलिमीटर पाऊस होत असून, बहुतांशी जिरायती शेती केली जात होती. ज्वारी उत्पादनासाठी हे गाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. ज्वारीसह हरभरा, घेवडा, बाजरी, मूग आदी पिकेही केली जायची. गावाची २००५ मध्ये हरियाली योजनेत निवड झाली. त्यातून सुमारे ३२ पाझर तलाव बांधण्यात आले. यातून काही प्रमाणात पाणीटंचाई कमी झाली.   जलयुक्त शिवार योजनेत निवड  वहागावची २०१३ मध्ये कोरडवाहू योजनेत व २०१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत निवड झाली. तालुका कृषी अधिकारी रवीद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक एल. एस. धायगुडे, कृषी सहायक रवींद्र गाढवे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत गावच्या टंचाईवर मात करण्यासाठी पाऊल उचलले. ‘वाॅटर बँक’ तयार करण्यासाठी शेततळी व सिमेंट बंधारे उभारण्याची कामे सुरू करण्यात आली. ‘वाॅटर बँके’ची निर्मिती हिरिरीने झालेल्या कामांतून गावात ३२ शेततळी झाली असून, २८ शेततळ्यांचे अस्तरीकरण होऊन पाणी साठवण्यात आले आहे. शेततळ्यांसाठी डोंगरालगत जागा निवडण्यात आली. बहुतांशी तळी चढांवर असल्याने सायफन पद्धतीने पाणी शेताला देण्यात आले आहे. यामुळे वीजबिल व कृषी पंपांचा खर्च कमी झाला.  दृश्‍य परिणाम 

  • बत्तीस शेततळ्यांमुळे गावातील ५० टक्क्यांवर क्षेत्र बागायत झाले.
  • विहिरीची पाणी पातळी वाढली.  
  • सिमेंट बंधाऱ्यांमुळे पाण्याचा पाझर वाढला.  
  • नगदी पिकांखालील क्षेत्र वाढल्याने चांगले अर्थार्जन होण्याला वाव 
  • पीक पद्धतीत झाला बदल- 
  • गाव कोरडवाहू असल्याने ज्वारी, बाजरी आदी पिके घेतली जायची. आता ऊस, आले, हळद, भाजीपाला, भूईमूग आदी नगदी पिके घेतली जात आहेत.
  • पूर्वी २०० हेक्टर ज्वारीचे क्षेत्र १०० हेक्टरच्या आत आले आहे. त्या क्षेत्रात ऊस ४० हेक्टर, २५ हेक्टर आले, २५ हेक्टर हळद, ३० हेक्टर भाजीपाला, १५ हेक्टर डाळिंब अशी लागवड आहे.
  • जनावरांची संख्या वाढली. यापूर्वीच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच १४३० लिटर दूधसंकलन होते. 
  • सुमारे ४१ शेतकऱ्यांना कडबा कुट्टीची सुविधा दिल्याने सर्व चाऱ्यांचा परिपूर्ण वापर होतो. 
  • पौष्टीक चारा वर्षभर मिळावा यासाठी एका शेतकऱ्याकडे मुरघास युनिट  
  • मनरेगांतर्गत ३२ गांडूळ खत युनिटस बांधली आहेत. त्यातून प्रत्येक तीन महिन्याला ४५ टनांपर्यंत खत तयार होते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला असून दर्जेदार उत्पादनवाढीस चालना मिळाली आहे. नवीन ३० युनिटसची कामे सूरू असून गांडूळ ग्राम करण्याचा संकल्प.  
  • अभियानातून ४७ कृषीपंप दिल्यामुळे बागायत क्षेत्र वाढण्यास मदत.  
  • बहुतांशी नगदी पिकांत ठिबक सिंचनाचा वापर  
  • गावात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन. तीन ट्रॅक्टर, तीन रोटाव्हेटर, दोन मळणी यंत्र, दहा बीबीएफ पेरणी यंत्र, तणनियंत्रणासाठी तीन वीडर, चाऱ्याचा सदुपयोग होण्यासाठी ४१ कडबा कुट्टी यंत्रे असा त्यात समावेश. यांत्रिकीकरणामुळे अवघ्या तीन ते चार दिवसात पेरणीची कामे उरकत आहेत.     

    शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान  माझी नऊ एकर शेती असून शेततळ्यांमुळे सर्व क्षेत्र बागायत झाले आहे. आले, ऊस, हळद आदींची लागवड केली आहे.  - गजानन जगताप  माझ्याकडील ३१ लाख लिटर क्षमतेचे शेततळे शेताच्या टोकाला व डोंगराच्या पायथ्याला आहे. मोठ्या प्रमाणात उतार मिळाल्याने सर्व क्षेत्रास सायफन पद्धतीने पाणी देणे शक्य झाले. विजेच्या खर्चात बचत झाली.   - फत्तेसिंग जगताप, ९८५०८९२०३३

    पंधरा एकर शेत असून ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे. त्यातून सर्व क्षेत्र बागायत झाले. आले, वाटाणा, पपई, घेवडा ही पिके घेत आहे. - धनंजय जगताप, उपसरपंच 

    शेततळ्यात पूरक म्हणून मत्स्यशेती व्यवसाय करीत असल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळणे शक्य झाले आहे.  - बाळकृष्ण जगताप- ९९७००९११५०

    दोन शेततळ्यांद्वारे माझी सर्व शेती बागायत झाली असून एका शेततळ्यात मत्सपालन केले आहे. माशांची जागेवरच शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. त्यातून ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. - अजित जगताप 

    कोरडवाहू योजनेतून अनुदानावर ट्रॅक्टरचलित औजारे मिळाली. यामुळे व्यवसाय मिळाला असून चांगले अर्थाजन होत आहे. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने माझी शेती बागायत झाली आहे. - संजय जगताप 

    गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ एकत्र येतात. वहागाव निर्मल ग्राम असून इथली शेती मोठ्या प्रमाणात बागायत झाल्यामुळे शेतकऱ्यांचा अार्थिक स्तर उंचावू लागला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही प्रत्यक्ष पाहणीद्वारे शेततळ्यांचे महत्व ठळक केले आहे. कृषी विभागाचे मोलाचे योगदान आहे. - दिनकर निंबाळकर, सरपंच

    लोकसहभागामुळे गावात बागायत शेती वाढणे शक्य झाले. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबकचाही वापर होत आहे. - रवींद्र गाढवे- ९८२२०८२१७१, कृषी सहायक, वहागाव

  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com