म्हैसाळमधून ९६ दिवसांत सोडले ३.५२ टीएमसी पाणी

म्हैसाळमधून ९६ दिवसांत सोडले ३.५२ टीएमसी पाणी
म्हैसाळमधून ९६ दिवसांत सोडले ३.५२ टीएमसी पाणी

सांगली : म्हैसाळ योजनेचे २ एप्रिलला सुरू झालेले उन्हाळी आवर्तन बंद करण्यात आले. जत तालुक्यातील सुरू असणारे पाण्याचे वितरण मागणी नसल्याने बंद करण्यात आले आहे. ही योजना ९६ दिवस सुरू होती. पाणी वितरित करण्यात आले असून, याचा दुष्काळी तालुक्यांना लाभ झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

म्हैसाळ योजनेचे १ मार्च रोजी दुरुस्तीसाठी मागील सुमारे पावणेपाच महिन्यापासून सुरू असणारे हिवाळी आवर्तन बंद करण्यात आले होते. महिनाभर कॅनॉल दुरुस्ती, पंपगृह दुरुस्ती, पंप बिघाड दुरुस्ती, पंपगृह देखभाल या कामांकरिता नाइलाजाने हिवाळी आवर्तन १ मार्च रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २ एप्रिल रोजी आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या करून योजना सुरू करण्यात आली होती.

या ९६ दिवसांत सिंचनासाठी ३.५२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याकरिता वीजबिलाचा १९ टक्के हिस्सा भरण्यासाठी गोळा करण्यात आलेली वसुलीची रक्कमही यंदा चांगली गोळा झाली आहे. २ कोटी ६३ लाख रुपये वीजबिलापोटी वसुली रक्कम म्हणून शेतकऱ्यांनी दिली आहे. २०१८-१९ मध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने लवकरच हिवाळी आवर्तन सुरू झाले होते. त्यामुळे एकूण या वर्षात सुमारे पावणे आठ महिने आवर्तन सुरू राहिले.

पावसाळ्यात पडलेला अपुरा पाऊस, धरणात साठविलेल्या पाण्याला असणारी मोठी मागणी, सर्व सिंचन योजना आणि धडक योजना व सर्व प्रकारच्या उपशामुळे उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्रात पाणी कमी होऊ लागले होते. म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यातसुद्धा शेवटी पुरेसे पाणी मिळत नव्हते. तर कृष्णा नदी पुढे कर्नाटकात कोरडी पडली होती. टंचाई काळात द्राक्ष आणि ऊस या पिकांना योजनेचा लाभ झाला आहे.

पुढील आवर्तन पावसावर अवलंबून  पाणलोट क्षेत्र आणि धरण क्षेत्रात सध्या पाऊस पडत असून, सर्वच धरणांत पाणी साठू लागले आहे. पण सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यातील यंदा पाऊस पाण्याची स्थिती पाहून आणि मागणीनुसार पुढील आवर्तन सुरू होणार आहे. किमान दोन महिने तरी आवर्तन बंद राहील. पाऊस समाधानकारक पडला तर आवर्तन आणखी पुढे जाऊ शकते. पण पुन्हा गतवर्षीसारखीच स्थिती राहिली, तर पुन्हा आवर्तन लवकर सुरू करावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com