साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड

लातूर :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. शिवाय, संमेलन १० ते १२ जानेवारी २०२० दरम्यान घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. या दोन्ही निर्णयांची अधिकृत घोषणा लवकरच उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. त्यामुळे महामंडळाची बैठक उस्मानाबाद येथे घेण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो, भारत सासणे, प्रवीण दवणे, प्रतिभा रानडे या साहित्यिकांची नावे महामंडळाच्या घटक, संलग्न, समाविष्ट संस्थांनी ठेवली होती. यापैकी दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.  पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचे नाव संमेलनाध्यक्ष पदासाठी बैठकीत मांडले होते. आगामी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत आहे, त्यामुळे संमेलनाध्यक्ष मराठवाड्यातील असणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून साहित्य वर्तुळात रंगली होती. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ना. धों. महानोर, सुधीर रसाळ, रा. रं. बोराडे ही नावे पुढे आली. यापैकी एकाला संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळणार, असे वाटत असतानाच बोराडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेला लेखी, रसाळ आणि महानोर यांनी तोंडी नकार दर्शवला. त्यानंतर आता चपळगाकर यांनीही पत्र पाठवून ''संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या माझ्या नावाचा विचार करू नका'' असे पत्र परिषदेला पाठवले होते. ''नवा करार'' या भावानुवादाबद्दल दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय राज्य सरकारनेही त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. याआधी मराठी साहित्य ख्रिस्ती संमेलन, बंधुता साहित्य संमेलन, साहित्य-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे. ‘सकाळ’मध्ये ओसिसच्या शोधात (१९९५), दीपमाळ (२००१-०२), ऋणानुबंध (२०१०), नातीगोती (२०१२) हे त्यांचे सदर गाजले. दिब्रिटो यांची निवडक साहित्य संपदा

  •  परिर्वतनासाठी धर्म
  •  पर्वतावरील प्रवचन
  •  सुबोध बायबल
  •  तेजाची पावले
  •  सृजनाचा मोहोर
  •  सजृनाचा मळा
  •  गोतावळा
  •  नाही मी एकला (आत्मचरित्र)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com