खानदेशात कापसाच्या खेडा खरेदीला वेग..

खानदेशात कापसाखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरवात
खानदेशात कापसाखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरवात

जळगाव  ः कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी खानदेशात कापसाखालील क्षेत्र रिकामे करण्यास सुरवात केली आहे. अर्थातच पुढे कापसाची वेचणी होणार नाही. यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची स्थिती असून, जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना कापूसटंचाईचा सामना करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेता खानदेशातील अनेक भागात मोठे कारखानदार, व्यापारी यांनी कापसाच्या खेडा खरेदीला वेग दिला आहे. कापसाचे दर स्थिर आहेत. मागील आठवड्यात सरकीच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली असून, दर २३०० रुपयांवर पोचले आहेत. मध्यंतरी सरकीचे दर प्रतिक्विंटल २१०० ते २१५० रुपयांवर स्थिर होते. परंतु पशुखाद्यासाठी डाळी, सोयाबीन, मका पुरेसा नसल्याने सरकीवरच मदार आहे. यामुळे सरकीचे दर पुन्हा एकदा वाढू लागले असून, दर्जेदार कापसाचे दर ५००० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.  कमी दर्जाच्या कापसाचे दर ४५०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. अशातच पूर्वहंगामी व जूनच्या मध्यात लागवड केलेले कापूस पीक शेतकरी रब्बी हंगाम घेण्यासाठी मोडत आहेत. हे क्षेत्र झपाट्याने रिकामे केले जात असून, पूर्वहंगामी कापसाखालील सुमारे ३० ते ३५ हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या खानदेशात रिकामे झाले आहे. यामुळे कापसाचे उत्पादन कमी येईल. मागील १० ते १५ दिवसांत खानदेश, पश्‍चिम विदर्भ, औरंगाबाद भागातील अनेक जीनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये प्रक्रिया जोमात सुरू झाली होती. परंतु पुढे कापूसटंचाईचा सामना या कारखान्यांना भासू शकतो. नजीकच्या मध्य प्रदेश व गुजरातमध्येही कापूसटंचाई भासण्याची चिन्हे आहेत. कारण गुजरातेत गुलाबी बोंड अळी कापसावर आली आहे. तर मध्य प्रदेशात कोरडवाहू व पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसाने उत्पादन कमी झाले आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन, बडवानी, बऱ्हाणपूर येथील बाजारात दर्जेदार कापसाचे दर ५३०० रुपये प्रतिक्विंटल तर देशी कापसाचे दर ५५०० रुपयांवर आहेत.  दुसरीकडे मध्य प्रदेशसह राज्यात किंवा खानदेश, पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा भागात भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) कापसाची खरेदी सुरू आहे. या केंद्रात १२०० टक्‍क्‍यांपर्यंतच्या आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात असून, या कापसाला ५२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर तेथे मिळत आहे. बुलडाणा, अकोला, खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव, भुसावळ, जामनेर येथील सीसीआयच्या केंद्रात कापसाची चांगली आवक मागील १० ते १२ दिवसांत झाली आहे. अशातच पुढे आपल्याला कापसाची टंचाई भासू नये, यासाठी जिनींग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी मंडळी कापसाची खेडा खरेदी करीत  आहेत. दर्जेदार कापसाला कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. मध्यंतरी खरेदी मंदावली होती. परंतु सरकीचे दर वधारताच खेडा खरेदीला वेग आल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com