ढगाळ वातावरणामुळे घेतला शेतकऱ्यांनी धसका

ढगाळ वातावरणामुळे घेतला शेतकऱ्यांनी धसका
ढगाळ वातावरणामुळे घेतला शेतकऱ्यांनी धसका

जळगाव  ः खानदेशात मागील तीन-चार दिवसांपासून सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, याचा फटका गहू लागवडीसह लहान केळी बागांना बसू लागला आहे. थंडी गायब झाल्याची स्थिती असून, रब्बी हंगामाबाबतही शेतकऱ्यांमध्ये प्रतिकूल वातावरणाची भीती तयार झाली आहे.  रब्बी हंगामासंबंधीची पेरणी खानदेशात ६० टक्‍क्‍यांवर झाली आहे. गहू पेरणी अंतिम टप्प्यात असतानाच ढगाळ वातावरण तयार झाले. खानदेशात सुमारे चार लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, अशी अपेक्षा आहे. हरभरा, संकरित व दादर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारीमध्ये विरळणीचे कामही अनेक भागांत झाले आहे. तर हरभऱ्याला लवकरच घाटे लागतील. मक्‍याची लागवडही सोयाबीन, मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. या क्षेत्रात मका पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे. शेतकरी अमेरिकन लष्करी अळी थोपविण्यासंबंधी उपाययोजना मका पिकात करीत आहेत. गव्हाची पेरणी ७० टक्के पूर्ण झाली आहे. तर उर्वरित क्षेत्रातील पेरणी या आठवड्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. अशातच मागील गुरुवारपासून (ता. १९) ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. गहू पेरणीवर आता परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. बाजरी पेरणीबाबतही शेतकरी तयारी करीत आहेत. परंतु, वातावरण निरभ्र होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.  रात्री थंड व दिवसा आर्द्रतायुक्त वातावरण राहत असल्याने केळी पिकामध्ये करपा रोग वाढण्याची शक्‍यता आहे. दोन ते चार महिन्यांच्या केळी बागांमध्ये शेतकरी करपा निर्मूलनासंबंधीची कार्यवाही करून घेत आहेत. उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीमध्ये काढणी सुरू आहे. परंतु, वातावरण बदलताच काढणी उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. कारण पाऊस आल्यास दरांवर दबाव येईल. तसेच काळ्या कसदार जमिनीच्या भागातील रस्ते खराब होऊन केळी वाहतुकीसंबंधी अडचणी येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com