खानदेशात कांदा रोपवाटिकांना आला भाव

कांदा रोपवाटिकांना आला भाव
कांदा रोपवाटिकांना आला भाव

जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा लागवड सुरू झाली आहे. ही लागवड यंदा वाढेल, असे संकेत मिळत असतानाच कांदा रोपवाटिकांनाही चांगली मागणी आहे. अनेक शेतकरी कांदा रोपांची विक्री करून आपला नफा मिळवून घेण्यावर भर देत आहेत.  एक किलो कांदा बियाण्याच्या रोपवाटिकेची खरेदी १० ते ११ हजार रुपयांत खरेदीदार करीत आहेत. कांद्याचे दर बाजारात स्थिर आहेत. कांद्याची आवक सध्या फारशी जळगाव, धुळे, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजारात सुरू नाही. प्रतिक्विंटल किमान ३५०० रुपयांचा दर सध्या खानदेशातील बाजारांमध्ये कांदाला मिळत आहे. जळगावच्या बाजारात कांद्याची आवक फक्त १००० क्विंटल प्रतिदिन आहे. मागील वर्षी ही आवक तीन ते चार हजार क्विंटल प्रतिदिनपर्यंत होती. यामुळे कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा दर पुढेही स्थिर राहतील, या अपेक्षेतून शेतकरी कांदा लागवडीचे नियोजन करीत आहेत. यंदा अतिपावसात अनेक शेतकऱ्यांच्या कांदा रोपवाटिकांचे ऑक्‍टोबर व नोव्हेंबरच्या सुरुवातीला नुकसान झाले. रोपवाटिकांमध्ये मर रोग आल्याने रोपांची हानी झाली. नंतर अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका नव्याने तयार करणे टाळले. परंतु हलक्‍या, मुरमाड जमिनीमध्ये अनेक उत्तम नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा रोपवाटिका व्यवस्थितपणे यशस्वी केल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी रोपांची विक्री करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. आपली लागवड करून एक ते दीड किलो बियाण्याच्या रोपांची विक्री करता येईल, यासाठी अधिकच्या बियाण्याची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. या रोपवाटिकांमधील रोपे लागवडयोग्य झाली असून, त्याची विक्री शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. एका अडीच फूट बाय ३५ फूट कांदा रोपांच्या वाफ्याचे दर तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर आहे. एक किलो बियाण्याच्या कांदा रोपांमध्ये किमान एक ते सव्वा एकरात कांद्याची लागवड करता येते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा भागासह धुळे, शिरपूर, जळगावमधील धरणगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर या भागात कांदा रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याच भागात कांद्याची लागवडही यंदा वाढेल, असे संकेत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com