कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा खरेदी

कापसाची ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दरात खेडा खरेदी
कापसाची ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दरात खेडा खरेदी

जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर स्थिर असून, खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. १८ ते २२ टक्के आर्द्रतेच्या कापसाचे दर ४५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. खेडा खरेदी स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार व किरकोळ व्यापारी करीत आहेत. गुजरातमधील कारखानदार, व्यापारी किंवा निर्यातदारांचे एजंट खानदेश, औरंगाबादमधील फुलंब्री, सिल्लोड भागात खेडा खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षी गुजरातमधील व्यापारी, कारखानदारांच्या एजंटकडून कापसाची मोठी खरेदी नोव्हेंबर ते जानेवारी यादरम्यान करण्यात आली होती. यंदा गुजरातमध्ये सूत व कापड उद्योगाला फटका बसल्याने सूत, रुईच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. गुजरातमधील खंडीचे (३७० किलो रुई) दर राज्यातील खंडीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत. खंडीला सध्या कमाल ४० हजार रुपयांचा दर गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात आहे.  मध्य प्रदेश व गुजरातमध्ये कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची वेचणी सुरू झाली आहे. यामुळे तेथील खरेदीदारांकडून राज्यातील पश्‍चिम विदर्भ, खानदेश व औरंगाबाद भागांत होणारी कापसाची खेडा खरेदी कमी झाली आहे. सध्या किरकोळ व्यापारी, स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट खेडा खरेदी करीत आहेत. भारतीय कापूस महामंडळाची खरेदी वेगात सुरू आहे. सीसीआयचे मलकापूर (जि. बुलडाणा), शिरपूर (जि. धुळे), जळगाव येथील केंद्र जोमात सुरू आहे. या केंद्रातील आवक वाढली आहे. सीसीआयच्या खानदेशातील आठ केंद्रांमध्ये मिळून सुमारे ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सीसीआयच्या खरेदीची स्पर्धा असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर टिकून आहेत. खानदेश, पश्‍चिम  विदर्भ व औरंगाबादमधील फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड या भागांत मिळून सुमारे १० लाख गाठींच्या कापसाची आवक जिनिंग प्रेसिंग कारखाने, किरकोळ खरेदीदारांकडे झाली आहे.  शिरपूर, शहादा (जि. नंदुरबार), चोपडा (जि. जळगाव) या भागात गुजरात, मध्य प्रदेशातील कारखानदारांचे एजंट खरेदी करीत आहेत. शिरपूरमधील निमझरी व सातपुडा लगतच्या इतर गावांमध्ये मागील आठवड्यात कापसाला खेडा खरेदीत कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन व सेंधवा येथील बाजारात कापसाची आवक वाढली आहे. तेथेही दर कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर तेथे देशी कापसाचे दर ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.  खानदेश, औरंगाबादमधील खानदेशलगतचा भाग, पश्‍चिम विदर्भात मिळून १०३ जिनिंग कारखाने सुरू आहेत. या जिनिंगमध्ये कापसाची आवक मागील आठवड्यात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर दिसत नसल्याने कारखानदार आपल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात निम्म्या क्षमतेनेच कापसावर प्रक्रिया करीत असल्याचे सांगण्यात आले. सरकीचे दर २२०० पर्यंत सरकीचे दर मागील ३० ते ३५ दिवसांत क्विंटलमागे १००० ते ११०० रुपयांनी घसरले आहेत. परंतु, मागील आठ ते नऊ दिवसांपासून दर २२०० रुपयांवर स्थिर आहेत. सरकी दरांवरील दबाव वातावरण कोरडे व निरभ्र होईल, तोपर्यंत कायम राहू शकतो, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com