साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...

साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...

अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू होताच ग्रामीण भागात वीज भारनिमयन सुरू झाले. शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मूर्तिजापूर तालुक्यातील कुरणखेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी १० अशी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर राबल्यानंतरही पाणी द्यायला शेतात जावे लागते.  सध्या रब्बी पिकांची पेरणी, कुठे सिंचनाचे काम सुरू झालेले आहे. शेतकरी यासाठी दिवसभर शेतात काम करीत असतो. मात्र, वीज नसल्याने त्याला रात्री जागरण करीत हरभरा, गहू या पिकांना पाणी द्यावे लागते आहे. रात्रभर शेतात उभे राहावे लागते. सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत.   

दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री, कडाक्याच्या थंडीत आम्हाला हरभऱ्याला पाणी द्यायला जावे लागते. सरकारने शेतकऱ्यांना १२ तास वीज दिली पाहिजे. - पद्‌माकर कोगदे,  शेतकरी

कुठलाही राजकीय नेता, शासकीय अधिकारी आठ तासांपेक्षा अधिक काम करीत नाही. मात्र दिवसभर शेतात राबूनही शेतकऱ्याला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, विंचू दंश होत असतो.  - कुणाल राठोड, शेतकरी

शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीबेरात्री जावे लागणार नाही. शेतकरी हा सुद्धा माणूस आहे, याचे भान वीज कंपनीने ठेवायला हवे.  - चंद्रशेखर गवळी, अकोला जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com