खानदेशात २८ हजार हेक्‍टरवर गहू पेरणी पूर्ण

खानदेशात २८ हजार हेक्‍टरवर गहू पेरणी पूर्ण
खानदेशात २८ हजार हेक्‍टरवर गहू पेरणी पूर्ण

जळगाव  ः खानदेशात तापी, गिरणा, वाघूर, गोमाई, अनेर, पांझरा, सुसरी आदी नद्यांच्या क्षेत्रात गव्हाची पेरणी सुरूच आहे. सुमारे २८ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाल्याचा अंदाज असून, पेरणी यंदा ३५ ते ३८ हजार हेक्‍टरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.  गव्हाची पेरणी मध्यंतरी ढगाळ वातावरण तयार झाल्याने काहीशी थांबली होती. तसेच धुळे, शिरपूर, चोपडा भागांत गव्हावर लष्करी अळीचा देखील प्रकोप झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली होती. परंतु, मागील दोन दिवसांत वातावरणात गारवा वाढताच शेतकऱ्यांनी गहू पेरणीला वेग दिला आहे. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, पाचोरा, रावेर या भागात पेरणी अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. तर धुळे जिल्ह्यातही किमान सात हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाल्याचे सांगण्यात आले. यंदा डिसेंबरनंतर थंडी अधिक पडेल, असे सांगितले जात होते. यामुळे काही शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या मध्यानंतर गव्हाची पेरणी केली. तर काही शेतकरी या महिन्याच्या अखेरपर्यंत गव्हाची पेरणी पूर्ण करतील, असे चित्र दिसून येत आहे.  गहू पेरणीसाठी यंदा शेतकरी ट्रॅक्‍टरचलित यंत्रणेचा वापर अधिकचा करीत आहेत. एकाच दिवसात पेरणी आटोपून लागलीच सिंचनही करून घेत आहेत. यामुळे वेळ व श्रमाची बचत होत आहे. सध्या अनेक भागात यात्रा, जत्रा व इतर कार्यक्रम सुरू असल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. या स्थितीत यंत्रणेचा उपयोग लाभदायी ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  डिसेंबरच्या सुरवातीला पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात पुढील १० ते १५ दिवसांत निसवण सुरू होईल. तर मागील आठवड्यात पेरणी केलेल्या गव्हामध्ये बीजांकुरण जोमात सुरू आहे. पेरणी ५ ते ७ जानेवारीपर्यंत सुरू राहील, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com