राज्यात संत्रा ५०० ते ६००० रुपये क्विंटल

नागपूर : कळमना बाजार समितीत डिसेंबर महिन्यात संत्रा फळांची आवक वाढली आहे. दर दिवशी सुमारे तीन हजार क्विंटलची आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. त्यामध्ये मोठ्या, मध्यम, आणि लहान आकाराच्या फळांचा समावेश आहे.
राज्यात संत्रा ५०० ते ६००० रुपये क्विंटल
Oranges cost Rs.500 to Rs.6,000 per quintal in the state

नागपुरात क्विंटलला २३०० ते २५०० रुपये

नागपूर : कळमना बाजार समितीत डिसेंबर महिन्यात संत्रा फळांची आवक वाढली आहे. दर दिवशी सुमारे तीन हजार क्विंटलची आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. त्यामध्ये मोठ्या, मध्यम, आणि लहान आकाराच्या फळांचा समावेश आहे. 

कळंबा बाजार समितीत आंबिया बहरातील संत्रा फळांची आवक सुरू आहे. संत्रा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असला तरी व्यापाऱ्यांकडून उठाव नसल्याने दरात मात्र घसरण अनुभवली जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे. नागपूर जिल्ह्यात संत्रा लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. नागपूर जिल्ह्यात २५ ते २७ हजार हेक्टरवर संत्रा होतो. असे असले तरी कळमना बाजार समितीत  विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून शेतकरी संत्रा फळ विक्रीसाठी आणतात. त्यामुळेच बाजारातील आवक वाढती राहते. 

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या आकाराच्या संत्रा फळांचे दर २२०० ते २४०० रुपये क्विंटल होते. लहान फळांचे दर ६०० ते ८००, तर मध्यम फळांचे व्यवहार १८०० ते २१०० शंभर रुपये या प्रमाणे होते. गुरुवारी (ता.१६) मोठ्या आकाराच्या फळांना २३०० ते २५०० रुपये, मध्यमला १४०० ते १८००, तर लहान फळांना ४०० ते ६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

परभणीत प्रतिक्विंटलला सरासरी २६६५ रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१६) संत्र्यांची ३० क्विंटल आवक झाली. संत्र्यांना प्रतिक्रेट सरासरी ४०० रुपये (प्रतिक्विंटल २६६५ रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये अमरावती जिल्ह्यातून संत्र्यांची आवक होत आहे. दररोज २०० ते ३०० क्रेट (३० ते ४५ क्विंटल) आवक होत आहे. गुरुवारी (ता.१६) संत्र्यांची २०० क्रेट (३० क्विंटल) आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्रेट ४०० रुपये होते. शहरात विविध ठिकाणी किरकोळ विक्री प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मो. इद्रिस यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला १५०० ते ३५०० रुपये 

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१५) संत्र्यांची ३२ क्विंटल आवक झाली. या संत्र्यांना १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ९ डिसेंबरला २९ क्विंटल आवक झालेल्या संत्र्याला १२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ११ डिसेंबरला ८१ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर १३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.  १२ डिसेंबरला ८८ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.१५ डिसेंबरला ३७ क्विंटल आवक  झालेल्या संत्र्यांचे दर १४०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नगरमध्ये क्विंटलला ५०० ते ६००० रुपये

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्र्यांची दर दिवसाला साधारण ५० ते ६० क्विंटल अशी आवक होत आहे. संत्र्यांना प्रतिक्विंटल ५०० ते सहा हजार व सरासरी ३२५० रुपयांचा दर मिळत आहे.  नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) संत्र्यांची ५४ क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल पाचशे ते सहा हजार व सरासरी ३२५० रुपयांचा दर मिळाला. सोमवारी (ता. १३) ७० क्विंटलची आवक होऊन ५०० ते ५५०० रुपये व सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळाला. शुक्रवारी (ता. १० ) १०१ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ५५०० रुपये व सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळाला. रविवारी (ता. ६ ) ४४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ४००० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला.

नांदेडमध्ये क्विंटलला २२०० ते ३००० रुपये

नांदेड : नांदेड शहराजवळील कामठा फळे बाजारात सध्या संत्र्यांची दररोज आवक पाच ते दहा टन होत आहे. या संत्र्यांना २२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापाऱ्यांनी दिली. कामठा फळ बाजारात सध्या अमरावती, दिग्रस, यवतमाळसह स्थानिक शेतकऱ्यांचा संत्रा विक्रीसाठी येत आहे. या सोबतच पंजाब राज्यातूनही संत्रा बाजारात येत आहे. महाराष्ट्रातील संत्रा दररोज पाच ते दहा टन बाजारात येत आहे. यास २२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. किरकोळ बाजारात चाळीस ते साठ रुपये किलो दराने संत्रा विकत असल्याची माहिती ठोक व्यापारी मोईन बागवान यांनी दिली.

जळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१६) संत्र्यांची १९ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० व सरासरी २००० रुपये, असा मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव आदी भागांतून होत आहे. दर टिकून आहेत. 

नाशिकमध्ये क्विंटलला २००० ते ४००० रुपये 

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १५) संत्र्यांची आवक २० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २,००० ते कमाल ४,००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गत सप्ताहापासून बाजार आवारात संत्रांच्या होणाऱ्या आवकेत चढ-उतार दिसून आला. मात्र तुलनेत दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (ता.१४) संत्र्यांची आवक २५२ क्विंटल झाली. त्यास २,००० ते ४,००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००० रुपये होता. सोमवारी (ता.१३) संत्र्यांची आवक १४० क्विंटल झाली. त्यास २,००० ते ४,००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००० होता.

रविवारी (ता.१२) फळ- बाजार बंद होते. त्यामुळे आवक झाली नाही. शनिवारी (ता.११) संत्र्यांची आवक ७२ क्विंटल झाली. त्यांना २,००० ते ४,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,०००  होता. शुक्रवारी (ता.१०) संत्र्यांची आवक ६१ क्विंटल झाली. त्यांना २,००० ते ४,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,००० रुपये राहिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.