Top 5 News: खाद्यतेल बाजाराची सद्यःस्थिती काय सांगते?

2022 या आर्थिक वर्षात भारताची शेतमाल निर्यात 50 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आलाय. यात प्राधान्याने तांदूळ, मांस, आणि पोल्ट्री निर्यातीचे प्रमाण वाढीव राहण्याचा कयास आहे.
Edible Oil
Edible Oil

1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर इशान्य मॉन्सून (North-East Monsoon) दक्षिण भारतातून 22 तारखेला पाय काढता घेऊ शकतो, असे हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. तर दुसरीकडे उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आलाय. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे उद्या 22 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानसहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (rainfall forecast) मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानंतर मात्र 25 तारखेपर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असेही वेधशाळेने म्हटले आहे. सध्या राज्यात विदर्भातला काही भाग वगळता इतरत्र दिवसाची थंडीही ओसरली आहे.

2. 2022 या आर्थिक वर्षात भारताची शेतमाल निर्यात (agri commodity export) 50 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आलाय. यात प्राधान्याने तांदूळ, मांस, आणि पोल्ट्री (poultry products) निर्यातीचे प्रमाण वाढीव राहण्याचा कयास आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या शेतमालाची निर्यात 41.25 अब्ज डॉलर्स होती. तर त्यापूर्वी 2019-20 मध्ये हाच आकडा 35.16 अब्ज डॉलर्स होता. कोरोनाच्या (COVID - 19) संकटकाळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनसारख्या विपरीत परिस्थितीतही कृषी क्षेत्राने कामगिरीचा आलेख चढता ठेवलाय. या आर्थिक वर्षातल्या पहिल्या आठ महिन्यात गव्हाच्या निर्यातीत 821 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर साखरेच्या निर्यातीचे प्रमाण 62 टक्क्यांनी वाढले आहे.

3. गहू उत्पादकांना भारताकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत आक्षेप घेत अमेरिकेतल्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (US President Joe Biden) यांच्या प्रशासनाकडे भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे (WTO) कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह धरलाय. यूएस व्हीट असोसिएशनने भारताच्या अनुदान धोरणाविरुद्ध कारवाईचा आग्रह धरला असून तिथल्या संसद सदस्यांनी या संघटनेच्या मागणीची दाखल घेऊन बायडन प्रशासनाला रीतसर पत्र लिहिले आहे. यावर आता अमेरिकेचे सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्व भागधारकांचे लक्ष लागले आहे.

4. वाशीम जिल्ह्यात कापसाची खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वजन काट्यात हेराफेरी करून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या टोळीचा जिल्ह्यातल्या मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हे व्यापारी इलेक्ट्रॉनिक वजन काटे (electronic weighing scale) रिमोटच्या साह्याने चालवत कापसाचे वजन कमी दाखवत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली आहे.

5. Solvent Extractors Association of India अर्थात एसईएने आपल्या सभासदांना लिहिलेल्या पत्रातून देशातल्या तेलबिया उत्पादकांसाठी काही महत्त्वाच्या नोंदी काढता येतात. त्यातली पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे गव्हाखालचे क्षेत्र मोहरीखाली वळते झाले, याला आता एसईएनेही दुजोरा दिलाय. हे क्षेत्र थोडे थोडके नसून त्यात सरासरीपेक्षा जवळपास 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. पेरणीच्या वेळी जुन्या मालाला मिळालेला चांगला भाव आणि पोषक हवामान, अशा घटकांमुळे मोहरीचे क्षेत्र आता 90.5 लाख हेक्टरवर (lakh hectares) जाऊन पोहोचले आहे. पुढचे हवामान व्यवस्थित राहिल्यास 120 लाख टन मोहरी उत्पादन शक्य असल्याची आशा एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. आता मोहरीच्या वायद्यांना पुन्हा परवानगी देण्याची वेळ आली असल्याचेही चतुर्वेदी म्हणालेत. हे झाले मोहरीचे. पण देशातल्या पामतेल रिफायनरी उद्योगाला रिफाईंड पामतेलाच्या (refined palm oil) आयातशुल्कात केलेल्या कपातीमुळे नुकसान सहन करावे लागत असल्याचे एसईएने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com