Edible Oil Prices
Edible Oil Prices

Top 5 News: खाद्यतेल दर घसरण्याची शक्यता कमीच?

दिवसभरातील शेती क्षेत्राशी संबंधित पाच मोठ्या घडामोडी, वाचा थोडक्यात.

1. आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचं राज्य होतं. मात्र दुपारी पारा पस्तीस अंश सेल्सिअसच्या पार गेला. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसच्या पार होते. तर दुसरीकडे धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या वादळी पावसाची शक्यता असल्याचंही हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय.

Daily Weather Video (Hindi) Dated 03.03.2022 Facebook link: https://t.co/WIQYyavkXt Youtube link: https://t.co/6u9pQXrtMZ

— India Meteorological Department (@Indiametdept)

2. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या खर्चाच्या पुरवणी मागण्यांमध्ये कृषी विभागाच्या भांडवली खर्चाच्या ८१ कोटी २२ लाख ९९ हजार रुपयांच्या मागण्यांचा समावेश होता. तर महसुली खर्चाच्या ५० लाखांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यात पशुसंवर्धनासाठी ७८ कोटी तर मत्स्य व्यवसायावरील भांडवली खर्च आणि कर्जासाठी ३ कोटी २२ लाख ९९ हजार रुपयांची भांडवली खर्चाची मागणी केली आहे. महसूल विभागाच्या एक कोटी ८१ लाख ३८ हजार महसुली खर्चाच्या, आदिवासी विकास विभागाच्या एक कोटी, सहा हजार, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ८२ कोटी ५६ लाख विभागाच्या महसुली खर्चाच्या पुरवणी मागण्या मांडल्या.

3. राज्यातील साखरेचं उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा पाच ते आठ लाख टनानं वाढून १२० लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी साखर उत्पादन वाढीच्या माहितीला दुजोरा दिलाय. इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनदेखील राज्यातील साखर उत्पादन थेट १२५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करत आहे. मात्र, साखर उत्पादनात वाढ असली तरी ‘इस्मा’च्या अंदाजाइतकी इतकी नसेल, असे राज्यातील साखर उद्योगाचं म्हणणं आहे. “राज्यातल्या साखर उत्पादनाचा आमचा आधीचा अंदाज ११२ लाख टनाचा होता. मात्र, अपेक्षेपेक्षाही जादा ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे काही भागात गाळप कालावधी वाढलाय. जादा उसामुळे साखर निर्मिती ११५ ते ११८ लाख टनापर्यंत होणं शक्य आहे. काही कारखाने जास्त दिवस चालू राहिल्यास साखर निर्मिती आणखी वाढेल व जास्तीत जास्त १२० लाख टनापर्यंत जाईल. परंतु, त्यापेक्षा आकडा वाढणार नाही,” असा दावा ‘विस्मा’ने केलाय.

4. खानदेशातल्या प्रमुख बाजारांमध्ये दादर ज्वारीची आवक सुरू झालीये. दर २१०० ते २२५० रुपये क्विंटल एवढा आहे. आवक पुढे वाढणार असून आगाप पेरणीच्या दादर ज्वारीची आवक सुरू झालीय. गेल्या वर्षीही मार्चच्या मध्यानंतर आवक वाढली होती. पण कोरोनाच्या समस्येमुळे दर कमी होते. गेल्या चार दिवसांत अमळनेर, चोपडा व जळगाव येथील बाजारात मिळून प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल दादर ज्वारीची आवक झालीये. सुरुवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी मळणीनंतर लागलीच बाजारात ज्वारीची पाठवणूक करतायत. पण मळणी सर्वत्र सुरू झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांची ज्वारीची कापणी पुढील पंधरवड्यात होईल.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

5. देशांतर्गत बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे दर जवळपास प्रत्येक महिन्याला वाढतायत. खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातले भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न जवळपास अयशस्वी झालेत. त्यात आता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सूर्यफुलाच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झालाय. त्यामुळे खाद्यतेलाचे भारतातले भाव इतक्यात कमी होतील, अशी शक्यता कमीच आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातले पाम तेल, मोहरी तेल, वनस्पती तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल, आणि शेंगदाणा तेलाचे आजचे किरकोळ बाजारातले भाव १४३ रुपये ते १९० रुपये किलोच्या दरम्यान आहेत. या सर्व तेलांचा विचार करता गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला हेच भाव १२० ते १६३ रुपयांच्या घरात होते. म्हणजेच खाद्यतेलाच्या किरकोळ भावात किलोमागं २३ ते २७ रुपयांनी वाढ झालीय. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांचा विचार करता गेल्या मे ते नोव्हेंबर या कालावधीच्या तुलनेत किमती कमी आहेत. पण इतर सर्व तेलांच्या किमती तुलनेनं जास्त आहेत. गेल्या जुलैपासून खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी केंद्रानं कंबर कसलीय. असं असलं तरी काही बाजार घटक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असल्यानं खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात अपयश येतंय. त्यामुळे राज्य आणि पर्यायानं देशातल्या तेलबिया दरांना आधार मिळताना दिसतोय. रशिया युक्रेन युद्ध संपलं, तरी येता महिनाभर तरी तेलबियांमधली तेजी कायम राहू शकते, अशी शक्यता व्यापारी सुत्रांनी वर्तवलीय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com