हळद, हरभऱ्याचे भाव स्थिर

फ्यूचर्स किमती- सप्ताह ११ ते १७ जून २०२२
हळद, हरभऱ्याचे भाव स्थिर
Cammodity PricesAgrowon

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

मॉन्सून १७ जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरातमधील काही भाग, आसाम, मेघालय, प. बंगाल येथे पोहोचला होता. त्यापुढील पाच दिवसांत तो विदर्भाचा काही भाग, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार येथे पोहोचले, असा वेधशाळेचा अंदाज आहे. देशात १ जून ते १७ जून या कालावधीत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १८ टक्क्यांनी कमी आहे.

रब्बी पिकांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक वाढली आहे. मध्य प्रदेशात मुगाची आवक वाढती आहे. या सप्ताहात हळद व हरभरा यांचे भाव स्थिर होते. कांद्याचे भाव वाढले. इतर शेतीमालाचे भाव कमी झाले. या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालीलप्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) मे महिन्यात वाढत होते. अखेरच्या सप्ताहापासून ते कमी होत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.९ टक्क्याने वाढून रु. ४८,०९० वर आले होते. या सप्ताहात ते ०.४ टक्क्याने घसरून रु. ४७,९०० वर आले. जुलै डिलिव्हरी भाव ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ४६,३०० वर आले. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) १.५ टक्क्याने घसरून रु २,३७८ वर आले. यंदा कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यात अनुक्रमे ५.९ व ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती मे महिन्यात वाढत होत्या. अखेरच्या सप्ताहापासून त्या कमी होत आहेत. गेल्या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. २,२४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.८ टक्क्याने घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमती रु. २,२१० वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. यंदा मक्याचा हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षीपेक्षा ४.९ टक्क्यांनी अधिक आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती मे महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने वाढून रु. ८,२७७ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. ७,८६६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जूनमध्ये उतरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,८५१ वर स्थिर आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,५०० होती; या सप्ताहात ती ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,२५० वर आली आहे. यंदासाठी हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ६.६ टक्क्यांनी अधिक आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) मे महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती ५.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,७५८ वर आली आहे. हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षीपेक्षा ८.९ टक्क्यांनी अधिक आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) मे महिन्यात कमी होत होती. गेल्या सप्ताहात ती रु. ५,९७० वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्याने घसरून रु. ५,९३० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहे.

कांदा

कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२०३ होती; या सप्ताहात ती वाढून रु. १,२२९ वर आली आहे. कांद्याची आवक गेल्या सप्ताहात ३ लाख ७० हजार टनांपर्यंत गेली होती.

टोमॅटो

टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहात रु. ४,५०० होती; या सप्ताह-अखेर ती रु. ३,७५० पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक आता कमी होऊ लागली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com