
Amravati News : महावितरणच्या कृषी धोरणाचा (Agriculture Policy) जिल्ह्यातील १३ हजार ९७ शेतकऱ्यांनीच लाभ घेतला आहे.
अजून शेतकऱ्यांकडे ७९४ कोटी ५५ लाख रुपये सुधारित थकबाकी असल्याचे महावितरणने म्हटले असून थकबाकीसाठी कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी (Electricity Connection) तोडण्यात येत नसल्याचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५९१ कृषी जोडण्या असून सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत त्यांच्याकडे एकूण १३११ कोटी ३२ लाख रुपये वीजदेयके थकीत आहेत.
या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने २०२१-२२ पासून तीन वर्षांसाठी व्याज व विलंब आकार शुल्क माफीचे कृषिधोरण लागू केले.
या धोरणांतर्गत मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार, असे शुल्क टप्पानिहाय माफ करण्यात येणार आहे. यामुळे महावितरणकडून ५१६ कोटी ७७ लाख रुपये माफ होणार असून, ७९४ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी वसुलीचे लक्षांक महावितरणसमोर आले आहे.
विलंब आकार व दंड माफ करण्याच्या महावितरणच्या कृषिधोरणाचा हवा तसा लाभ शेतकऱ्यांनी घेतला नाही. जिल्ह्यातील १३ हजार ९७ शेतकऱ्यांनीच थकबाकी भरत विलंब आकार व दंडातून लाभ घेत थकबाकीतून मुक्ती मिळवली आहे.
या शेतकऱ्यांकडे ४५ कोटी रुपयांची थकबाकी होती, त्यांनी २२ कोटी ५० लाख रुपये भरून थकबाकी मुक्त होण्याचा मान मिळवला आहे.
जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडे सप्टेंबर २०२० नंतर ३९६ कोटी ६७ लाख रुपयांचे देयक आहे. पूर्वीची थकबाकी व चालू देयक भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मात्र या आवाहनास प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
एकूण कृषिपंपधारक - १,३८ ,५९१
सप्टेंबर २०२० अखेर थकबाकी - १३११.३२ कोटी
चालू देयक - ३९६.६७ कोटी
कृषी धोरणात सूट - ५१६.७७ कोटी
सुधारित थकबाकी - ७९४.५५ कोटी
लाभ घेतलेले शेतकरी - १३,०९७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.