जमीन मोजणी पद्धतीस झाली तब्बल २२० वर्षे !

दोन शतकांत मोठे बदल; आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, आव्हानेही वाढली
Land Survey
Land SurveyAgrowon

जयराम सुपेकर

सुपे, जि. पुणे : भारतात सुरू झालेल्या महात्रिकोणमित्तीय (Land survey using the triangular method) पद्धतीच्या जमिन मोजणी तंत्रज्ञानास (land surveying technology) आज (ता.१०) तब्बल २२० वर्षे होत आहेत. जमीन मोजणी पद्धतीत काही सुधारणा झाल्या असल्यातरी गेल्या दोन शतकांत मोजणीचे सूत्र मात्र तेच आहे.

१० एप्रिल १८०२ हा दिवस राष्ट्रीय सर्वेक्षण दिन म्हणून (National Survey Day) साजरा केला जातो. या दिवसापासून आजपर्यंत लाखो सर्व्हेअरांनी या देशातील जमीन रचनेचे बहुमोल काम केले असून, यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) वापर होत आहे. याबाबत अधिक माहिती देताना या विषयाचे अभ्यासक प्राचार्य पांडुरंग सुपेकर म्हणाले, ‘‘१० एप्रिल १८०२ या दिवसापासून भारतामध्ये महात्रिकोणमित्तीय (Great Trigonometrical Survey - GTS) पद्धतीचे सर्वेक्षण विल्यम लॅम्बटन यांनी सुरू केले. इंग्रज राजवटीत राज्य व्यवस्थापन आणि महसूल (Revenue) वसुलीसाठी जमिनीची तांत्रीक पद्धतीने मोजणी सुरू करण्यात आली. याकरिता १७६७ मध्ये ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ची (Survey) Of India) सर्वोच्च संस्था डेहराडून येथे स्थापना करण्यात आली. या संस्थेचे कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल होते.’’

Land Survey
देशांतर्गत पर्यटन खर्चाचे होणार राष्ट्रीय सर्वेक्षण ः सुजाता अय्यर
Summary

जिओडेटिक आणि प्लेन सर्व्हे
पृथ्वी गोल असली तरी ती चेंडूसारखी गोल नसून काहीशी अंडाकृती आहे. त्यालाच ‘जिऑइड’ असे भौगोलिक नाव आहे. जमीन मोजणी करताना पृथ्वीची गोलाई विचारात घेतल्यास त्यास ‘जिओडेटिक (‘Geodetic) सर्व्हे’ म्हटले जाते. आणि ज्या मोजणी प्रकारात गोलाईचा विचार केला जात नाही किंवा सर्व जमीन समतल आहे असे समजून मोजणी प्रक्रिया केली जाते त्यास ‘प्लेन सर्व्हे’ म्हणतात. १९५६ पूर्वी जमीन एकर आणि गुंठ्यामध्ये मोजली जात होती. सध्या हेक्टर, आर आणि चौरस मीटरमध्ये जमीनीचे क्षेत्रफळ नमूद केले जाते.

जमीन मोजणीच्या पद्धती (Land survey methods)
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात ‘शिवशाही काठी’ हे एकक जमीन मोजणीसाठी वापले गेले होते. त्यानुसार जमिनीची प्रतवारी करून बिघा, चावरमध्ये जमीनीचे क्षेत्रफळ मोजले जात.
- पुढे साखळीचा वापर करून मोजणी केली जात असे त्यामध्ये गुंटूर, रेव्हेन्यू, मेट्रिक आणि इंजिनियरिंग साखळी वापरली जात होती.
- शंकू साखळी पद्धतीतीत टिपणबुक महत्त्वाचे असत. त्यासाठी वसलेवार पद्धतीने जमीनीचे क्षेत्रफळ काढले जायचे.
- पुढे समतल फलक (Plne Table) उपकरणाच्या साह्याने जमीन मोजणी करण्यात येऊ लागली. प्लेन टेबल सर्व्हे तुलनेने सोपा असल्याने फार काळ प्लेन टेबलने मोजण्या केल्या जात होत्या.
- तांत्रिक सर्वेक्षणात अंतरे मोजून अचूकता मिळत नव्हती. अंतर्गत कोन मोजणे अनिवार्य झाले. तेव्हा थिओडोलाइट या उपकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
- डिजिटल थिओडोलाइटनंतर टोटल स्टेशन या उपकरणाचा सध्या जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. टोटल स्टेशनमध्ये इनबिल्ट डिजिटल थिओडोलाइट EDM (Electronic Distance Meter) असल्याने अचूक मोजणी शक्य होते.

Summary

जीएनएसएस तंत्रज्ञानाने क्रांती
मोजणी क्षेत्रात नव्याने जीएनएसएस (Global Navigation Satellite System) प्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये उपग्रहाद्वारे जमीनीचे अक्षांश व रेखांश मिळविले जातात आणि संगणक प्रणालीद्वारे नकाशांचे आरेखन केले जाते. राज्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७७ ठिकाणी कॉर्स (Continuous Operation Reference Station) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग ३० सेकंदांत घेता येतात. त्यामुळे जमिनीची मोजणी ३० ते ३५ मिनिटांत करता येणे शक्य झाले आहे.

मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतींचे नकाशे, मालमत्तापत्रक लवकर मिळावेत. नवीन मालमत्तांचा शोध यासाठी ड्रोन सर्वेक्षण ही सुरू करण्यात आले आहे. परंतु त्यासाठी संबंधित खात्यांच्या पूर्वपरवानग्या आवश्यक असतात. मोजणी केल्यानंतर जमीनमालकांना मोजणीच्या नकाशांची ‘क प्रत’ भूमिअभिलेख विभागाकडून (Land records Sector) देण्यात येते. सध्या गाव नकाशे, गट नकाशे, डी.पी. नकाशे संदर्भासाठी वापरले जातात. जमीनीचे वाढलेले तुकडे, नवीन पायाभूत सुविधा, निवासी प्रकल्प, विकास आराखडे, रस्ते बांधणी यामुळे येणारा काळ हा जमीन मोजणी क्षेत्रासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे. तसेच या क्षेत्रातील कौशल्यपूर्ण अभियंत्यांनाही रोजगार उपलब्धतेस अधिक संधी निर्माण करणाराही असेल, असे प्राचार्य सुपेकर यांनी सांगितले.

Land Survey
जळगावच्या भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक 

राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्त आज प्रदर्शन
राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्त जमीन मोजणी उपकरणांचे प्रदर्शन व चर्चासत्राचे औंध (पुणे) येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिरात रविवारी (ता.१०) सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. विश्‍वेश्‍वरय्या स्कील ट्रेनिंग अॅकॅडमीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जमिन सर्वे, उपकरण, कागदपत्रे, कायदे आदी विषयी दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.

‘‘जमीन (Land) हा सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय. नैसर्गिक वाढ, प्रगती आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जमिनींचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. स्थावर मिळकतीमध्ये जमीनीला अनन्यसाधारण महत्व आहे. जमीन खरेदी-विक्रीमध्ये (buying and selling land) होत असलेली वाढ, नवीन प्रकल्प, विकास आराखडे, प्लॉटिंग, हिस्सेवारी इत्यादी कारणांमुळे जमीन मोजणीला खूप महत्त्व आले आहे.’’

प्राचार्य पांडुरंग सुपेकर, अभ्यासकविश्वेश्वरय्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, औंध पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com