
Crop Damage Update : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ होत आहे.
या अवकाळी पाऊस वादळाचा जिल्ह्यातील सुमारे ४०८ गावातील ४४ हजार शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला असून २४००० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांची ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नासाडी झाली आहे. जिल्ह्यात अजूनही अवकाळी पाऊस सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे.
नगर जिल्ह्यात वर्षभरात अती व सततचा पावसाने शेतपिकांचे नुकसान होत आहे. पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. एकट्या नगर जिल्ह्यात या वेळी सुमारे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले होते.
त्याची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. असे असतानाच गेल्या दीड महिन्यांपासून पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे.
गेल्या महिनाभरात सात वेळी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ झाले. याचा जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. वादळ, गारपिटीने आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, कांदा, बाजरीसह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कांदा काढणीला आला असताना गारपीट, पावसाने नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. मात्र अजूनही पाऊस सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार ४४ हजार शेतकऱ्यांच्या २४ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.
हे नुकसान ३३ टक्क्यांच्या वरील आहे. जवळपास चाळीस कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना द्यावे यासाठी प्रशासनाने शासनाला अहवाल दिला आहे. पिकांसोबत विजांमुळे जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वादळाने घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
३३ टक्क्यांच्या आतील नुकसान बेदखल
शासनाच्या नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक झालेल्या नुकसानीला नव्या नियमानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ८५००, बागायत क्षेत्रासाटी १७ हजार, व फळबागांसाठी २२५०० रुपये दिले जात आहेत.
पंचनामे व पाहणीवेळी ३३ टक्क्यांपेक्षा जास्ती व ३३ टक्क्यांपेक्षा कमी अशी वर्गवारी केली जाते. ३३ टक्क्यांच्या आत म्हणजे ३२ टक्के नुकसान असले तरी त्याची प्रशासन नोंदही घेत नाही. आतील नुकसान बेदखल आहे.
नुकसान भरपाई दिली जात नाही तर नोंद ठेवायची कशाला असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. ३३ टक्क्याच्या आत व पंचवीस टक्क्यांच्या पुढे असे सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान आहे असे एका जाणकाराने सांगितले.
...असे झाले पीक नुकसान
तालुका - गावे - नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर)- शेतकरी संख्या
नगर - ५३- १४४२- २९५३
पारनेर- २७ - ३१९४- ५८३४.
पाथर्डी - ४ १००- २३५
कर्जत- ९- १४७ - २६६
जामखेड - २० - ९६- १७०
श्रीगोंदा - १६- ९१३ - १९३७
श्रीरामपूर- ५- १०५- १०५
राहुरी - २४- ९३ ४ - २१९२
नेवासा - १५५- ९७३ १७,००१
शेवगाव - २७ - ५०३५- ७६७५
संगमनेर- २१ - ११९०- २४६६
अकोले - १६- ६५१ - १४५७
कोपरगाव- १९ - २२१- ६०४
राहाता- ७- २५५- ५८०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.