
Beed News : बीड जिल्ह्यातील नऊ बाजार समितीसाठी निवडणूक (Market Committee Election) होते आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर जिल्ह्यातील कडा बाजार समिती जितक्या जागा तितकेच उमेदवार उरल्याने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होणार हे स्पष्ट आहे.
तर इतर आठ बाजार समित्यांच्या निवडणूक रिंगणात तब्बल ३३९ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
बीड जिल्ह्यात प्रथमच नऊ बाजार समित्यांसाठी एकाच वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार या बाजार समिती निवडणुकीसाठी विविध पक्ष व गटांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली. अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांची छाननी ही पार पडली.
गुरुवारी (ता. २०) अर्ज माघारीच्या अखेरच्या मुदतीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील निवडणूक रिंगणात किती उमेदवार हे स्पष्ट झाले आहे.
कडा बाजार समितीच्या १८ जागांसाठी अर्ज माघारी नंतर केवळ अठराच उमेदवार शिल्लक राहिल्याने या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध जाहीर होईल हे स्पष्ट झाले आहे. कडा बाजार समिती बिनविरोध करण्यात सत्ताधारी गटाचे प्रमुख आमदार सुरेश धस यशस्वी ठरले आहेत.
केज बाजार समितीमधील व्यापारी मतदारसंघातील दोन व हमाल मापारी मतदारसंघातील एक मिळून तीन जागांवर रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे.
दुसरीकडे पाटोदा बाजार समितीच्या १८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय वडवणी बाजार समितीमध्ये ३८, अंबाजोगाई ३९, बीड ४०, केज ५१, माजलगाव ५४ ,गेवराई ३५ तर परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात आता ४० उमेदवार उरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील अंबाजोगाई, वडवणी, केज, गेवराई बाजार समितीत दुरंगी, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधात सर्व पक्ष एकत्र, तर पाटोदा व परळी बाजार समितीमधील काही जागांवर बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.