Mechanization : ३६० ट्रॅक्टर, ७० पोकलेन अन् डझनभर जेसीबींनी दिली ‘फडतरी’ला ओळख

विहीर, शेततळे कामासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत डंका
Mechanization
MechanizationAgrowon

सुदर्शन सुतार ः अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः सुमारे ३६० ट्रॅक्टर (Tractor), ७० पोकलेन (Pocklane) आणि डझनभर जेसीबी (JCB) यांसारख्या वाहनांनी फडतरी (Fadtari) (ता. माळशिरस) गावाने यांत्रिकीकरणात (Mechanization) स्वतःची ओळख तयार केली आहे. विहीर, शेततळी खोदण्यासह शेती विकसित करण्याच्या कामात फडतरीतील या ट्रॅक्टर आणि पोकलेननी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवड्याच्या अनेक भागांत आपल्या कामाने नाव कमावले आहेच, पण थेट कर्नाटक आणि तमिळनाडूच्या शिवारापर्यंतही मजल मारली आहे.

Mechanization
Crop Protection : सूत्रकृमी ओळख, नुकसान अन् उपाययोजना

सोलापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला नातेपुतेनजीक दुर्गम, डोंगराळ भागांत पाच हजार लोकसंख्या असलेले आणि ७०० उंबऱ्यांचे फडतरी गाव यांत्रिकीकरणामुळे आपली वेगळी ओळख राखून आहे. पूर्वीपासून कमी पाणी आणि दुष्काळी पट्ट्यामुळे गावात शेतीला फारसा वाव मिळाला नाही. पण त्यावर पर्याय म्हणून गावच्या हिमती तरुणांनी २०-२५ वर्षांपूर्वी ट्रॅक्टर व्यवसायात उडी घेतली. एकेक करत एकेक तरुण या व्यवसायात उतरला.

Mechanization
जिद्द अन् प्रयोगशीलतेतून निर्माण केली ओळख

आज घरटी किमान एक ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. काळानुरूप पुढे ट्रॅक्टरबरोबर जेसीबी आणि पोकलेनसारख्या आधुनिक यंत्रांची गरज भासू लागली. या यंत्रांची संख्याही वाढत गेली, त्यातून गावाचे नाव झाले आणि कामे घेऊन लोकं गावापर्यंत येऊ लागली. आज फडतरीत जवळपास ७० पोकलेन, ३०० लेव्हलिंगचे ट्रॅक्टर, ६० शेतीकामाचे ट्रॅक्टर आणि डझनभर जेसीबी आहेत. त्यात गावातील काही कुटुंबांकडे एक-दोन नव्हे, तर चार, पाच, कोणाकडे सात तर कोणाकडे डझनभर पोकलेन आणि ट्रॅक्टर आहेत.

एका हंगामात २१०० विहिरींची खोदाई
विहीर, शेततळे खोदाई किंवा रान लेव्हलिंगची कामे, यासाठी परिसरासह विदर्भातील यवतमाळ, वर्धा, मराठवाड्यातील नांदेड, लातूरसह थेट कर्नाटक आणि तमिळनाडूसारख्या परराज्यांतूनही फडतरीतील पोकलेन, जेसीबींना मागणी आहे. वेळेत आणि चोख काम हे इथल्या वाहनमालकांचे वैशिष्ट्य आहे. दिवाळीनंतर ऑक्टोबरपासून मेपर्यंत पावसाळा सुरू होईपर्यंत, जवळपास आठ महिने फडतरीतील सर्व वाहने या कामात गुंतलेली असतात. विशेषतः विहिरींची कामे सर्वाधिक होतात. एक पोकलेन महिन्याला ४ ते ५ विहिरी खोदाई करते. साधारण या आठ महिन्यांत सरासरी २५ ते ३० विहिरी खोदल्या जातात, या हिशेबाने ७० पोकलेनकडून आठ महिन्यांच्या या हंगामात २१०० विहिरींची खोदाई होते.

Mechanization
ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळख

वर्षाकाठी ५० कोटींची उलाढाल
पोकलेनला प्रतितास ४ हजार रुपये, ट्रॅक्टरला प्रतितास ७०० रुपये, जेसीबीला प्रतितास १२०० रुपये असा कामाचा दर आहे. विहिरींची कामे मात्र दोन ते अडीच लाखांपर्यंत कंत्राटी पद्धतीने घेतली जातात. त्यानुसार मिळणारी कामे आणि त्यांचे सरासरी तास याचा विचार करता एक पोकलेन वर्षाकाठी किमान ६० लाख रुपये, ट्रॅक्टर पाच लाख रुपये आणि जेसीबी १० लाखापर्यंतचा व्यवसाय करतात. गावातील या संपूर्ण वाहनांपासूनच्या उत्पन्नाचा विचार करता सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल होते.

एकाचवेळी अडीचशे ट्रॅक्टरचे बुकिंग ट्रॅक्टर कंपनीचे मालक ‘फडतरी’त
पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे, तेव्हा ट्रॅक्टरचा अधिक बोलबोला होता. त्या वेळी एकाचवेळी गावातून अडीचशेहून अधिक ट्रॅक्टरचे बुकिंग एका नामांकित ट्रॅक्टर कंपनीला करण्यात आले. तेव्हा एका छोट्याशा गावात एवढ्या संख्येने, एकाचवेळी ट्रॅक्टरची खरेदी होत असल्याने या कंपनीचे मालक अवाक झाले आणि ते थेट फडतरीत आले. या गावाचा व्यवसाय पाहून ते भारावले. तेव्हा त्यांनी गावातील नाथ मंदिराला देणगी दिली.

गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. सध्या माझ्याकडे १२ पोकलेन आहेत. नांदेड, यवतमाळ भागात आमचे काम सुरू आहे. शिवाय गोकर्ण (कर्नाटक) मध्येही काही विहिरींची कामे सुरू आहेत.
- चंद्रकांत पोतेकर, फडतरी, ता. माळशिरस

आमचा भाग पहिल्यापासून दुष्काळी असल्याने शेतीची परिस्थिती जेमतेम आहे. त्या काळात तरुणांनी पर्याय शोधला, तोच पर्याय आज मुख्य व्यवसाय बनला आहे. या व्यवसायाने आमच्या गावाला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख दिली आहे.
- प्रा. दुर्योधन पाटील, उपसरपंच, फडतरी, ता. माळशिरस

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com