सोयाबीनचे ३७ हजार क्विंटल बियाणे चाचणीत नापास

बीजोत्पादन संस्थाकडून उत्पादित सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांच्या एकूण ५ हजार ७२० लॉटचे १ लाख ६४ हजार ५२५ क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध झाले होते. त्यापैकी ४ हजार ९५० लॉटच्या १ लाख ४० हजार ४९४ क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करण्यात आली.
सोयाबीनचे ३७ हजार क्विंटल बियाणे चाचणीत नापास
Soybean SeedsAgrowon

परभणीः गतवर्षीच्या (२०२१-२२) खरीप हंगामात परभणी विभागीय बीज प्रमाणीकरण कार्यालयांतर्गत नोंदणीकृत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील बियाणे उत्पादकांचे सोयाबीनचे ५८ हजार २५० क्विंटल बियाणे उगवणशक्ती चाचणीत पास झाले. तर ३७ हजार ९०४ क्विंटल बियाणे नापास झाले आहे. आजवर ४९ हजार ६०७ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या परभणी विभागांतर्गत महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृषी विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम याअंतर्गत २०२१ च्या खरीप हंगामात २५ हजार ९९५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी झाली होती. त्यात सोयाबीनचे क्षेत्र २५ हजार ८६ हेक्टर होते. त्यापैकी सोयाबीनचे २२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्र तपासणीत पात्र ठरले होते.

बीजोत्पादन संस्थाकडून उत्पादित सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांच्या एकूण ५ हजार ७२० लॉटचे १ लाख ६४ हजार ५२५ क्विंटल कच्चे बियाणे उपलब्ध झाले होते. त्यापैकी ४ हजार ९५० लॉटच्या १ लाख ४० हजार ४९४ क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करण्यात आली. एकूण १ लाख ६ हजार ३६१ क्विंटल चांगले बियाणे उपलब्ध झाले. त्यापैकी एकूण ४ हजार ९४७ लॉटच्या १ लाख ६ हजार ३१४ क्विंटल बियाण्यातील नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत उगवणशक्ती चाचणीसाठी पाठविण्यात आले.

त्यातील एकूण २ हजार ६९२ लॉटचे ५८ हजार ९९५ क्विंटल बियाणे पास झाले. त्यात सोयाबीनचे २ हजार ६०४ लॉटचे ५८ हजार २५० क्विंटल बियाणे पास झाले. तुरीचे ३९४ क्विंटल, मुगाचे १२२ क्विंटल, उडदाचे २३८ क्विंटल बियाणे पास झाले आहे.एकूण १ हजार ७१४ लॉटचे ३८ हजार ३ क्विंटल बियाणे नापास झाले. त्यात सोयाबीनच्या ३७ हजार ९०४ क्विंटल, मुगाच्या ५.६ क्विंटल, उडदाच्या ९३.९५ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

आनुवंशिक शुद्धता तपासणीसाठी घेण्यात आलेल्या क्षेत्रीय चाचण्यांमध्ये सोयाबीनच्या ९४४ लॉटचे २६ हजार ८८० क्विंटल बियाणे पास झाले, तर २४९ लॉटचे ८ हजार ५२६ क्विंटल बियाणे नापास झाले. कमी गुणवत्तेचे सोयाबीनच्या २१ हजार ९६७ क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करण्यात आली नाही. प्रमाणित बियाण्याचे क्षेत्रातील घट, त्यानंतर पावसात भिजल्यामुळे दर्जावर झालेला परिणाम, कमी उगवशक्ती आदी कारणांनी यंदा सोयाबीनच्या प्रमाणित बियाण्याची उपलब्धता कमी आहे. गतवर्षी (२०२१) उगवणशक्ती चाचणीत सोयाबीनचे ९६ हजार ८८७ क्विंटल बियाणे पास झाले, तर ४० हजार ६० क्विंटल बियाणे नापास झाले होते.

जिल्हानिहाय उगवण क्षमता चाचणीत नापास सोयाबीन बियाणे (क्विंटलमध्ये)

जिल्हा...लॉट संख्या...बियाणे

परभणी-हिंगोली...७४२...१९५०४

नांदेड...६५...१८५५

लातूर....५७४...१०४४६

उस्मानाबाद...३१७...६०९७

सोयाबीन बीजोत्पादनाचे प्रमाणित क्षेत्र कमी होते. पावसात भिजल्याने बियाण्याची प्रत खराब झाल्यामुळे बीजोत्पादन संस्थानी त्यावर प्रक्रिया केली नाही. परभणी-हिंगोली जिल्ह्यांत सोयबीन बियाणे नापासाचे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

- डी. आर. कळसाईत, विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com