पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात साडेचारशे टॅंकर सुरू

नाशिक, ठाणे विभागांत सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात साडेचारशे टॅंकर सुरू
Water Tanker Agrowon

पुणे ः जून महिना सुरू होऊन जवळपास आठवडा ओलांडला आहे. तरीही पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा कमी होत नसल्याचे स्थिती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर राज्यात जवळपास ४४२ टँकर (Water Tanker) रोज धावत असून, या टँकरद्वारे राज्यातील ५१५ गावे व एक हजार १८० वाड्यावस्त्यांना रोज पाणी पुरवठा (Water Supply) करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने येत्या काळात पाऊस न झाल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्यात गेल्या १४ मार्चपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला पाच जिल्ह्यातील ६० गावे व ९३ वाड्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टँकरच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. आता तीन महिने झाले असून, जून महिना सुरू झाल्याने पाणीटंचाईच्या झळा काहीशा कमी होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. त्यातच मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा काहीसा अवधी बाकी असताना काही प्रमाणात मॉन्सून लांबल्याने ऐन जूनमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याची स्थिती आहे.

उन्हाळ्यात नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, त्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी प्रांताधिकारांना दिले आहे. त्यामुळे या टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५६३ गावांत व ९१८ वाड्यावर वस्त्यांवर ४१६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टँकरने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

राज्यात गेल्या पंधरवड्यात ४५५ गावांत आणि १०८१ वाड्यावस्त्यांवर ४०१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या आठवड्यात या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणीटंचाईच्या चांगलीच वाढत होती. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. या भागातील ५४ गावे व ३२ वाड्यावस्त्यांवर अवघ्या ७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर लातूर, उस्मानाबाद भागांत अजूनही टँकर सुरू झाले नसल्याची स्थिती असून औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत अवघे बोटावर मोजण्याएवढीच टँकर सुरू आहेत. विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता. त्यामुळे या भागात पाणीटंचाई बऱ्यापैकी असल्याने विभागात ७५ टँकरने, तर नागपूर विभागात तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र होणारा अधिक उपसा आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. नाशिक विभागातील १२६ गावे व २३४ वाड्यावस्त्यांवर १०५ टँकर, तर पुणे विभागातील ७५ गावे व ३४२ वाड्यावस्त्यांवर ८० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ठाणे विभागातील १८२ गावे व ५७२ वाड्यावस्त्यांवर सर्वाधिक १०६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांतील गावनिहाय सुरू टँकरची संख्या

वर्ष --- गावे --- वाड्या वस्त्या -- टँकर संख्या

२०२१ -- ५३६ -- ९१८ -- ४१६

२०२० -- ८८१ -- १७११ --८०९

२०१९ -- ४९२० -- १०५०६ -- ६२०९

२०१८ -- १५६८ -- १२४६ -- १६२२

२०१७ -- १५५४ -- ३७०५ -- १४५८

जिल्हानिहाय टँकरची संख्या

ठाणे ३२, रायगड ३५, रत्नागिरी ११, पालघर २८, नाशिक ७३, धुळे १, नंदुरबार १, जळगाव ७, नगर २७, पुणे ६६, सातारा ११, सांगली ३, औरंगाबाद २, जालना ३२, बीड ५, परभणी १, हिंगोली २०, नांदेड १३, अमरावती १७, वाशीम ८, बुलडाणा २५, यवतमाळ २५, नागपूर ३.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com