
Akola News : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-KYC) करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. प्रशासनाकडून वारंवार याबाबत आवाहनही केले जाते.
मात्र, जिल्ह्यात अद्यापही सुमारे ५१ हजारांवर शेतकऱ्यांची ई-केवायसी व्हायची शिल्लक आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येतात.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या ई-केवायसीचा मुद्दा समोर आलेला आहे. ज्यांची अशी ई-केवायसी झालेली नसेल अशांना हे अनुदान मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आधार व इतर कागदपत्रांचे प्रमाणीकरण करणे अत्यंत गरजेचे असते. जिल्ह्यात दोन लाख १२ हजार ७८५ शेतकरी खातेदार आहेत.
यापैकी १० मार्चपर्यंत १ लाख ६१ हजार २६० शेतकऱ्यांची ई-केवायसी यशस्वीरीत्या झालेली आहे. मात्र अद्याप ५१ हजार ५२५ शेतकऱ्यांची ई-केवायसी होणे शिल्लक आहे. एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत जवळपास २४ टक्के शेतकरी अद्यापही दूरच आहेत.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची व ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये अडचणी असल्या तरी अद्याप शिल्लक असलेल्यांची संख्या पाहता यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी ही अत्यावश्यक बाब करण्यात आलेली आहे.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणेच शेतकरी खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सुद्धा या ई-केवायसीची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आग्रह केल्या जात आहे.
अकोला, अकोटमध्ये सर्वाधिक शिल्लक
ई-केवायसीमध्ये अकोला व अकोट तालुके आघाडीवर आहेत. या दोन्ही तालुक्यात सुमारे १८००० वर शेतकरी ई-केवायसीपासून दूर आहेत. अकोला तालुक्यात ९३०६ तर अकोट तालुक्यात ९६१० शेतकऱ्यांची ई-केवायसी व्हायची आहे. बाळापूर, मूर्तिजापूर तालुक्यातसुद्धा प्रत्येकी सात हजारांवर शेतकरी संख्या शिल्लक आहे.
तालुकानिहाय ई-केवायसी झालेले व शिल्लक शेतकरी
तालुका - प्रक्रिया पूर्ण केलेले- शिल्लक
अकोला - २७८७२- ९३०६
अकोट - २८०१४- ९६१०
बाळापूर - २३३११- ७३६५
बार्शीटाकळी- २१४६६ - ५९१८
मूर्तिजापूर- २०८५८ - ७३७७
पातूर - १७८४४ - ५८९७
तेल्हारा - २१८९५- ६९५२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.