
Parbhani News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानानुकूल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील वैयक्तिक लाभाच्या विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे १ हजार ६०९ अर्ज थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे अनुदान वितरणासाठी मुंबई (डेस्क -७) स्तरावर प्रलंबित आहेत.
त्यामुळे या शेतकऱ्यांचे ६ कोटी ७५ लाखांचे अनुदान अद्याप थकित आहे. निधीअभावी तब्बल दोन ते तीन महिन्यांपासून अनुदानाची रक्कम जमा होत नसल्याचे शेतकऱ्यांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे, असे संबंधीत सूत्रांनी सांगितले.
पोकराअंतर्गत तीन टप्प्यांत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील २५६ ग्रामपंचायतीअंतर्गत २७५ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील ६६ हजार २२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६३ हजार ७०२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली.
या शेतकऱ्यांनी विविध घटकांच्या लाभासाठी १ लाख ९१ हजार ८८० अर्ज केलेले आहेत. त्यात फळबाग लागवड, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ठिबक, तुषार संच, शेडनेटगृह, हरितगृह, मत्स्यपालन, शेळीपालन, तुती लागवड, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय खतनिर्मिती, बीजोत्पादन, विहीर, विद्युत पंप, विहिरी पुनर्भररण आदी घटाकांचा समावेश आहे.
कृषी सहायक डेस्क क्रमांक १ ते लेखाधिकारी डेस्क क्रमांक ६ आणि मुंबईस्तर प्रलंबित अर्जांची संख्या २६ हजार ७७० आहे.
त्यात कृषी सहायक डेस्क क्रमांक १ स्तरावर हजार ३ हजार ६८४ अर्ज, स्थळ पाहणी डेस्क २ वर ९ हजार ३३१, डेस्क ३ वर पूर्वसंमतीसाठी १ हजार ११६ अर्ज, शेतकरी स्तरावर कामे करून बिल अपलोड करायचे शिल्लक ५ हजार ३९४ अर्ज, मोका तपासणीसाठी ४ हजार ३४३ अर्ज, उपविभागीय अधिकारी स्तरावर ५०८ अर्ज, अंतिम मंजुरीसाठी डेस्क ६ वर ७८५ अर्जांचा समावेश आहे.
१०१ कोटींवर अनुदान खात्यावर जमा
कामे पूर्ण केल्यानंतर अनुदानासाठी आवश्यक त्या पडताळणीनंतर सोमवारपर्यंत (ता. ८) थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे ३१ हजार ९४० शेतकऱ्यांच्या खात्यावर १०१ कोटी ८० लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले. परंतु जिल्ह्यातील कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत. अनेक गावांच्या पदभारामुळे कामांचा ताण वाढला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जाचा निपटारा करण्यास विलंब लागत आहे. परिणामी ६ कोटी ७५ लाख रुपये अनुदानासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून निधी नसल्यामुळे अनुदान रखडले. प्रलंबित अर्ज निकाली काढावेत. अनुदान लाभार्थींच्या खात्यावर हस्तांतरित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अनुदान अर्ज स्थिती
तालुका - अनुदान वितरित अर्ज - प्रलंबित अर्ज
परभणी - ८५१५- २५०
जिंतूर - ४७३२- २३८
सेलू - ४३४३- २०६
मानवत- ३४५०- २४२
पाथरी - ३८०६- ३२३
सोनपेठ - २६८- ३५
गंगाखेड - २४६०- १३९
पालम - १२८५- ८२
पूर्णा - ३०८१- ९४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.