
Orchard Damage In Buldana : मागील काळात जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. यात मनुष्य व पशुहानी देखील झाली आहे. जिल्हा यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ६ कोटी २९ लाख रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सात हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या आपत्तीत चार जणांसह ५८ जनावरेही दगावली होती.
जिल्ह्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळवारा आणि गारपीट झाली. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली होती. पिकांचे नुकसान झाले. मनुष्य जीवितहानी आणि पशुधनहानी झाली.
यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या नुकसानीबाबत जिल्हा यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या अहवालानुसार सात हजार ८२ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६७९ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. ६ कोटी २९ लाख रुपयांचे हे नुकसान आहे. वीज पडून ५८ जनावरे दगावली तर २६९ घरांची पडझड झाली.
जिल्ह्यात सात व आठ एप्रिल रोजी १८० शेतकऱ्यांचे एक हजार ४७७ हेक्टरवरील तर ९ ते १६ एप्रिल दरम्यान ६३ शेतकऱ्यांचे दोन हजार १७७ हेक्टर, २० एप्रिल रोजी चिखली येथील ५६ शेतकऱ्यांचे २१.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. २५ ते ३० एप्रिलपर्यंत ४००३ .०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शेवटच्या आठवड्यातील २५ ते ३० एप्रिल दरम्यान झालेले नुकसान भयावह ठरले. यात ३६२ गावातील ४००३ हेक्टरचे नुकसान झाले. बुलडाणा तालुक्यात ४९ गावातील १९१.६० हेक्टर, चिखली १०८ गावांमधील ८९६.३० हेक्टर, मोताळा ६६ गावांतील ५४७.२० हेक्टर, मलकापूर ३ गावांतील २१.८० हेक्टर,
खामगाव ५३ गावांत १४५४.६० हेक्टर, शेगाव ३ गावात १५ हेक्टर, नांदुरा तालुक्यात ३३ गावांचे २३९, मेहकर १० गावांत १०२ हेक्टर, देऊळगावमधील ३७ गावात ५३५.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
चार लाख रुपयांची मदत
मार्च ते एप्रिल २०२३ या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात चार जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला. ज्या लोकांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
तर मोठे १७, लहान २९, ओढण्याचे काम करणारे ११ आणि लहान ओढकाम करणारे १ अशा एकूण ५८ विविध जनावरांचा देखील मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.