बारावीच्या परीक्षेत राज्यातील ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

कोकण विभागाचा ९७.२१ टक्के सर्वाधिक निकाल
HSC Exam Result
HSC Exam ResultAgrowon

पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२मध्ये घेतलेल्या बारावीच्या (HSC Exam) परीक्षेत राज्यातील ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखांमधील १४ लाख ४९ हजार ६६४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यातील १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा ९७.२१ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला. तर मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के असा सर्वांत कमी निकाल (HSC Exam Result) आहे.

सर्व विभागीय मंडळांतून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ टक्के इतका आहे. विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांपेक्षा २.०६ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात सर्व शाखांमधून ३५ हजार ३६८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील १८ हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ टक्के आहे.

राज्यात सहा हजार ३३३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सहा हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९५.२४ टक्के विद्यार्थी म्हणजेच सहा हजार एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्यात एकूण ३३ हजार २३८ खासगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यातील २९ हजार १०६ (८७.५६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालातील वैशिष्ट्ये :

- एकूण १५३ विषयांपैकी तब्बल २४ विषयांचा निकाल १०० टक्के आहे.

- परीक्षेत एकूण २४५ गैरप्रकरणे आढळली

- एकूण पाच तोतया विद्यार्थी (डमी विद्यार्थी) आढळले, त्यातील मुंबईमध्ये चार आणि पुण्यात एक

- एकूण ४० तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

- राज्यात एकूण १५८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

- राज्यात शून्य टक्के निकाल असलेली कनिष्ठ महाविद्यालये : विज्ञान-८, कला-७, वाणिज्य-६

- १०० टक्के गुण मिळविणारा एकही विद्यार्थी यंदा नाही

विभागवार निकाल खालीलप्रमाणे

कोकण विभाग : ९७.२१ टक्के

पुणे : ९३.६१

नागपूर : ९६.५२

औरंगाबाद : ९४.९७

मुंबई : ९०.९१

कोल्हापूर : ९५.०७

अमरावती : ९६.३४

नाशिक : ९५.०३

लातूर : ९५.२५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com