Custard Apple Cultivation : खारपाणपट्ट्यात सीताफळ लागवडीचा प्रयोग उभारली थेट ग्राहक विक्री व्यवस्था

अकोला जिल्ह्यात खारपाणपट्ट्यात सिंचन व शेती करणे कमालीचे अडचणीचे असते. अशा प्रतिकूल स्थितीत केळीवेळी येथील चिलात्रे बंधूंनी सीताफळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Custard Apple Cultivation
Custard Apple CultivationAgrowon

अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या (River) खोऱ्यात असलेली सर्वच जमीन खारपाणपट्ट्यात मोडते. हा कोरडवाहूपट्टा आहे. केवळ पावसाच्या (Rain) पाण्यावरच पिकांचे (Crop) भवितव्य अवलंबून राहते. कमी किंवा जास्त अशा दोन्ही प्रकारचा पाऊस पिकांना मारक ठरत असतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी खरिपात कपाशी व रब्बीत जागा उपलब्ध असेल तर हरभरा घेतात.

त्यानंतर वर्षातील उर्वरित काळ जमीन रिकामीच राहते. अशा खारपाणपट्ट्यात शेती करणे अत्यंत कठीण असते. सिंचनाच्या सुविधा नसल्याने तसेच जेथे गोडे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणीही शेतकरी क्षारपड जमिनीमुळे प्रयोगांचे धाडस करीत नाहीत. अशा परिस्थितीत काही शेतकरी वेगवेगळे धाडस करतात. अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील मंगेश अरुण चिलात्रे व बंधू रूपेश यांचे नाव त्यामध्ये घेता येईल.

सीताफळ लागवडीचे धाडस

खारपाण पट्ट्यात चिलात्रे यांची १० एकर वडिलोपार्जित शेती आहे. ते कपाशी घेतात. पाऊसमान चांगले राहिले तर उत्पादन मिळते. जास्त पाऊस झाला तर नुकसान ठरलेले असते. मागील दोन वर्षांपासून कापसाला दर चांगले मिळत असल्याने उत्पादन-खर्चाचा ताळेबंद जुळून येत आहे. मात्र एका पिकावर अवलंबून न राहता फळबागांचा पर्याय उभारण्याचे चिलात्रे यांनी ठरविले. मंगेश ‘इलेक्ट्रिशियन’ असून, व्यवसाय सांभाळून शेती पाहतात.

रूपेश पूर्णवेळ शेती करतात. बाग लागवडीआधी त्यांनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची भेट घेत या मातीत कोणते फळपीक घेता येईल याबाबत सल्ला घेतला. सीताफळ, आवळा, ॲपल बोर यापैकी एखादे पीक लावून पाहा असे शास्त्रज्ञांनी सांगितले. पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ व दर यांचा अंदाज घेत सीताफळ निवड केली. सोलापूर येथून रोपे आणली. पाच वर्षांपूर्वी दोन एकरांत १६ बाय ८ फूट अंतरावर लागवड केली. बाग उभी करताना अनेक अडचणी आल्या पण हार मानली नाही.

Custard Apple Cultivation
Crop Insurance : रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकांचा विमा काढू शकता ? | ॲग्रोवन

पाण्याचा काटेकोर वापर

येथील जमिनीत खारे पाणी असल्याने पिकांसाठी फायदेशीर मानले जात नाही. त्यामुळे सिंचनासाठी अडथळे येतात. त्यामुळे ५०० फुटांवर असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रातून पाइपलाइन करून पाणी उपलब्ध केले. या भागात अत्यंत कमी पाण्यात येणारी पीक पद्धती यशस्वी होऊ शकते हे जाणले होतेच.

गोड्या पाण्याचाही काटकसरीने वापर सुरू केला. या गावपरिसरात ठिबक सिंचनाचा वापर करणारे चिलात्रे एकमेव शेतकरी असावेत. त्याद्वारे पिकाला मोजूनमापून पाणी ते देतात. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पाण्याचे तीन ते चार हप्तेच दिले जातात. उर्वरित काळात हा वापर अत्यंत कमीच असतो.

स्वतःच उभारली विक्री व्यवस्था

एनएमके गोल्ड हे वाण लावले आहे. दोन एकरांतील बागेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्पादन सुरू झाले आहेत. फळे व्यापाऱ्यांना देऊन कमी दर घेण्यापेक्षा स्वतःच विक्री व्यवस्था उभारण्याचे चिलात्रे बंधूंनी ठरवले. आतापर्यंत तीन बहर धरले. पहिला जेमतेम निघाला. खरी मिळकत मागील वर्षापासून सुरू झाली.

काढणी करायची, माल ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरायचा व अकोला शहरात जाऊन दोन चौकात बसून थेट विक्री करायची अशी पद्धत अवलंबिण्यात येत आहे. त्यातून किलोला ८० रुपयांपासून ते १०० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळवण्यात चिलात्रे यशस्वी झाले आहेत.

गाव ते अकोला हे अंतर ३० किलोमीटर आहे. मात्र शेतीचे रोजचे नियोजन, अन्य व्यवसायाची व्यस्तता सांभाळून दररोज तेवढे किलोमीटर अंतर जाऊन आपले ग्राहक चिलात्रे यांनी तयार केले आहेत. त्यातूनच मागील वर्षी एकरी ८० हजार रुपयांचे, तर दोन एकरांत दीड लाखांहून अधिक उत्पन्नाचा पल्ला त्यांनी गाठला.

Custard Apple Cultivation
Damaged Road : तीन तालुके जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

२००, ३०० ग्रॅमपासून ते ९०० ग्रॅमपर्यंत वजनाचे फळ त्यांना मिळाले आहे. यंदा आत्तापर्यंत एक तोडा झाला आहे. सुमारे एक लाखापर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. अद्याप एक तोडा बाकी आहे. अजून ५० हजारांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची आशा आहे. यंदा अति पावसामुळे राज्यातील सीताफळ उत्पादकांना फटका बसला. चिलात्रे यांचेही नुकसान झाले. पण अन्य पिकांच्या तुलनेत बाग किफायतशीर ठरली.

शिकाऊ वृत्तीतूनच प्रगतीकडे

मिळणारे आश्‍वासक उत्पन्न व बाग व्यवस्थापनाचा अनुभव आल्याने दोन एकरांत नवी लागवड केली आहे. एकूण १० एकरांपैकी बहुतांश क्षेत्र फळबागेखाली आणण्याचे प्रयत्न आहेत. खारपाण पट्ट्यात सीताफळ बाग उभारण्याचे धाडस चिलात्रे यांनी केले. त्यांनी फळबाग छाटणी तंत्र अन्य सीताफळ उत्पादकांच्या संपर्कात राहून तसेच यू-ट्यूबवरील व्हिडिओद्वारे शिकून घेतले.

कपाशीचे त्यांना एकरी सात ते १० क्विंटल उत्पादन मिळते. सीताफळ बागेत आंतरपीक घेतात. यंदा वांगे लागवड केली आहे. आतापर्यंत कृषी विभागाचे कुठलेही सहकार्य वा मार्गदर्शन मिळालेले नाही. आजवर कुठलाही अधिकारी बांधापर्यंत पोहोचला नाही. अशा धडपड्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची अत्यंत गरज आहे.

मंगेश चिलात्रे, ८६६८५२२६९६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com