ढगाळ हवामानामुळे तापमानात घट

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला (Pre-Monsoon Rain) पोषक हवामान होत आहे. गुरुवारी (ता. १९) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) कमाल तापमानात घट झाली. आज (ता. २१) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान ३० ते ४२ अंशांच्या आसपास होते. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. छत्तीसगडपासून कर्नाटकमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, दक्षिण भारतातील चक्राकार वाऱ्यामुळे अरबी समद्र आणि बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात गुरुवारी (ता. १९) पूर्वमोसमीच्या सरी कोसळल्या. उन्हाच्या झळांनी होरपळ वाढली असतानाच पावसाच्या सरींनी काहीसा गारवा आणला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा जोर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत अधिक होता. कोल्हापुरातील आजरा येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोलापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८, धुळे ४२, जळगाव ४३.७, कोल्हापूर २९.३, महाबळेश्‍वर २७.७, नाशिक ३९, निफाड ३९.६, सांगली ३१.२, सातारा ३५.५, सोलापूर ३५, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३१.५, औरंगाबाद ४०, परभणी ३८.४, नांदेड ३७.२, अकोला ४४.१, अमरावती ४३.२, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४२.५, चंद्रपूर ४२, गोंदिया ४०, नागपूर ३९, वर्धा ३७, यवतमाळ ४३.७.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com