पर्यावरण संवर्धनासह शेतकरी समृद्धीचा ध्यास

शाश्‍वत ग्राम, शेती विकासासाठी लोकसहभागातून (Public Participation) विकासाचे धोरण राबविणे आवश्यक आहे. यासाठी जलद गतीने तंत्रज्ञान प्रसाराची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने मराठवाडा विभागाची निवड केली.
Sustainable Farming
Sustainable FarmingAgrowon

समाजसेवक मयांक गांधी (Mayank Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’ ही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये पर्यावरण समृद्धीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळवून संस्थेने जल-मृद्‍ संधारण, जमीन सुपीकता, नदी खोलीकरण, रुंदीकरण, बंधारे, शेततळे आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतीपद्धतीवर भर दिला. पर्यावरण समृद्धीसाठी फळबागेतून वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासोबत शेतकऱ्यांच्या अर्थकारणातही चांगले बदल होत आहे.

शाश्‍वत ग्राम, शेती विकासासाठी लोकसहभागातून (Public Participation) विकासाचे धोरण राबविणे आवश्यक आहे. यासाठी जलद गतीने तंत्रज्ञान प्रसाराची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने मराठवाडा विभागाची निवड केली. शाश्‍वत शेती, ग्राम विकासासाठी संस्थेने बीड जिल्ह्याची निवड केली.

२०१६ मध्ये बीड जिल्ह्यातील १५ गावांपासून सुरू झालेले काम आता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूरसह महाराष्ट्रातील अकरा आणि मध्य प्रदेशातील बारा जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. सुमारे वीस हजारांहून अधिक शेतकरी या चळवळीशी जोडले गेले आहेत. एकाच ठिकाणी न थांबता, कमी-अधिक प्रमाणातील यश, अपयशाचा विचार न करता देशातील सुमारे ६ लाख ४० हजारांहून खेड्यांमध्ये शाश्‍वत शेती (Sustainable Farming) , ग्राम विकासाचे ध्येय संस्थेचे ठेवले आहे.

अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राची निर्मितीः

सुधारित तंत्रज्ञान प्रसार आणि शेतकरी प्रशिक्षणासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेने सिरसाळा (ता. परळी) परिसरामध्ये सुमारे २५ एकरांवर प्रशिक्षण केंद्र आणि फळपिकांचे दिशादर्शक मॉडेल असलेल्या केंद्राची उभारणी सुरू झाली आहे. येत्या काळात या ठिकाणी विविध शेतीपद्धतीची ३५ प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत. क्‍यूआर कोडच्या माध्यमातून शेतकरी प्रत्येक फळपीक किंवा शेती पद्धतीची माहिती जाणून घेईल. त्यानंतर तो स्वतःसाठी फळपिकाची निवड करून केंद्रातून प्रशिक्षण घेईल. या केंद्रामध्ये शाश्‍वत शेती (Sustainable Farming) विकासाच्या दृष्टीने संशोधन होणार आहे.

जलसंधारणातून सुरुवातः

‘ग्लोबल विकास ट्रस्ट'ने पहिल्यांदा जल-मृद्‍ संधारणावर लक्ष केंद्रित केले. ‘ग्लोबल परळी’ प्रकल्पाच्या माध्यमातून परळी तालुक्‍यातील बोधेगाव, कावळेची वाडी, वाघाळा, भिलेगाव, परचुंडी, सेलू आदी गावशिवारातून वाहणाऱ्या पापनाशी नदीचे सुमारे १७ किलोमीटरपर्यंत खोलीकरण, रुंदीकरण हे शासन, लोकसहभागातून झाले. या नदीचे २० फूट खोलीकरण आणि १०० फूट रुंदीकरण झाले.

या नदीमध्ये सुमारे १२० रिचार्ज शाफ्ट घेतल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले, परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली. याशिवाय ६२ सिमेंट बंधारे आणि ५ केटीवेअर बांधण्यात आले. या नदीला जोडून असलेल्या छोट्या-मोठ्या ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाची सुमारे ७० किलोमीटरपर्यंत कामे झाली. सेवाकार्याची सुरुवात करताना दुष्काळी पट्ट्यात टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा देखील करण्यात आला. गावशिवारात फळ लागवडीसाठी शाश्‍वत सिंचनासाठी १६४ शेततळी खोदण्यात आली आहेत.

Sustainable Farming
GST On Food: केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचा पाच कोटी व्यवसायिकांना फटका

शेतीसोबत शिक्षणावरही लक्षः

संस्थेने परळी तालुक्‍यातील २१ शाळांमध्ये ‘ई- लर्निंग’ची सोय केली आहे. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासासाठी मदत व्हावी म्हणून ट्रस्टने सुमारे दोन हजार स्टडी लॅंपचे वाटप केले. संगणक साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन परळी तालुक्‍यातील १५ गावांतील जिल्हा परिषद आणि आश्रम शाळांना संगणक दिले आहेत.

प्रबोधनासाठी आधुनिक माध्यमांचा वापरः

शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान (Modern Technology) जलद गतीने पोहोचण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.संस्थेने व्हाट्‌सअप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल मीट, झूम मीटिंगचा वापर करून शेती तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली. आधुनिक समाज माध्यमांचा वापर करून विविध पिकांची लागवड, व्यवस्थापन तसेच फळपिकांची छाटणी, बहर नियोजन, खत-पाणी व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन केले जाते. यासाठी संस्थेने संकेतस्थळ आणि ॲप विकसित केले आहे.

Sustainable Farming
Crop Insurance: वऱ्हाडात ७८ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

ग्लोबल विकास ट्रस्टची महत्त्वपूर्ण कामेः

  • - मराठवाड्यामध्ये २०१९ ते २०२२ दरम्यान १ कोटी ३४ लाख २० हजार ६७२ फळझाडे आणि इतर वृक्षांची लागवड.

  • - महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सुमारे २.५ कोटी वृक्ष रोपांची लागवड.

  • - शेतकऱ्यांना अल्पदरात फळपिकांची दर्जेदार रोपे, कलमांचा पुरवठा.फळपीकनिहाय प्रशिक्षण.

  • - लागवड, व्यवस्थापन, उत्पादन, प्रक्रिया, विक्री आणि निर्यातीविषयी मार्गदर्शन.

  • - शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न पोहोचले १० हजारांवरून ४० हजार ते एक लाखांवर.

  • - जल-मृद्‍ संधारणासाठी ३,४५१ एकरांवर बांधबंदिस्ती.

  • - सेंद्रिय कर्ब वाढीसाठी गांडूळ खतनिर्मिती बेड तसेच गांडूळ बीजवाटप.

  • - १५ गावांमध्ये सुमारे एक हजारांवर सौरऊर्जा पथदिव्यांचे वाटप.

‘‘शाश्‍वत शेती आणि ग्रामविकासातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीच्या बरोबरीने लोकसहभागातून ग्राम विकास आणि पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्य आणि देशाची कृषी नीती ठरविणाऱ्यांना शाश्‍वत शेती आणि ग्राम विकासाचे चांगले परिणाम लक्षात आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

मयांक गांधी (अध्यक्ष, ग्लोबल विकास ट्रस्ट)

‘‘२०१९ मध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहकार्याने मी पेरू लागवड केली. रोपांसोबतच प्रोत्साहनपर मला एकरी दहा हजार रुपये अनुदान मिळाले होते. पेरूचे दोन वेळा उत्पादन घेतले. या बागेत सोयाबीनचे आंतरपीकही घेतले होते. ट्रस्टच्या माध्यमातून गावातील १० शेतकरी फळपिकांकडे वळले आहेत.’’

सुगंध रूपनर (परचुंडी, ता. परळी, जि. बीड)

‘‘मी कपाशी, सोयाबीन, तूर लागवडीतून उत्पन्न आणि खर्चाचं गणितच बसेना. परंतु मयांक गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे २०१८ मध्ये मी एक एकर तुती लागवड केली. सध्या तीन एकरांवर तुती लागवड आहे. आमच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ झाली. गावातील सुमारे ३० शेतकरी रेशीम उद्योग आणि चार शेतकरी फळपिकाच्या माध्यमातून ट्रस्टशी जोडलेले आहेत.’’

बाबूराव सलगर (मल्लनाथपूर, ता. परळी, जि. बीड)

‘‘ग्लोबल ट्रस्टच्या मार्गदर्शनामुळे मी रेशीम शेतीकडे वळलो. हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले. या उत्पन्नातून मी एक एकर डाळिंब लागवड केली. माझ्याकडे ८ एकरांवर तुती लागवड आहे. ‘ग्लोबल परळी’च्या माध्यमातून ठिबक सिंचन यंत्रणा, पाइपलाइन, मोटार, सेंसर तंत्रज्ञान मिळाले. मी आता शेवगा लागवड केली आहे.’’

सुमंत मारोती मुंडे, (रेवली, ता. परळी, जि. बीड)

‘‘माझ्या कुटुंबाची १४ एकर शेती आहे. ट्रस्टच्या मार्गदर्शनाने मी दोन एकरांवर सीताफळ आणि आंतरपीक शेवगा तसेच एक एकरावर केसर आंबा, अर्धा एकर पेरू, अर्धा एकर लिंबू आदी फळपिकांची लागवड केली. यासाठी ट्रस्टने मला आर्थिक मदत केली होती. आंबा आणि इतर फळपिकांत मी मिरची, कांदा आदी आंतरपिके घेतो. ट्रस्टतर्फे सर्व शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन मिळते.

सतीष वारकड (देवठाणा, ता. धारूर, जि. बीड)

संपर्क ः विजय गव्हाणे, ९७६५७८७५३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com